तीस वर्षांपूर्वी घडलेल्या निसर्गाच्या प्रकोपाची ही हृदयद्रावक घटना.!
३० सप्टेंबर १९९३ ची रात्र! मी, माझे कांही मित्र मिळून पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीचा आनंद घेत लक्ष्मी रोड वरून निघालो होतो. तशी अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच होती. आणि त्याचवेळी कवीमित्र प्रकाश यास बातमी समजली की, “लातूर जिल्ह्यात जबरदस्त भूकंप झाला असून ‘किल्लारीसह‘ अनेक गावं उध्वस्त झाली आहेत.”
बातमी मिळताच आमचा तिथला एक मित्र लातूरला निघाला. आम्ही सर्वजण अतिशय अस्वस्थ मनःस्थितीत माझ्या विश्राम गृहातील खोलीवर पोहोचलो. एव्हाना टीव्हीवर तिथल्या बातम्या येऊ लागल्या होत्या. प्रकाशने ऑफीसवर चार दिवस रजेचा अर्ज पाठवला आणि २ ऑक्टोबर रोजी आम्ही लातूरला पोहोचलो. तिथला माझा रसिक मित्र अजय गोजमगुंडेला गाठून किल्लारीला जाण्याचा आमचा प्रयत्न फोल ठरला. पण प्रत्यक्षदर्शींकडून किल्लारीच्या हृदय-द्रावक घटना आम्हाला समजत होत्या. कांहीं फोटो पहायला मिळत होते.

त्याचा परिणाम कवीमित्र प्रकाश पठारेच्या कवी मनावर होत गेला आणि ही कविता जन्माला आली………
“सारं मातीमोल झालं,
माझं गाव कुठे गेलं..।।धृ.।।
गाव म्हणू कसं याला,
झाला भला डोंगर ।
तश्शी राहिली भाकर,
पोरं दुध नाही पिल्लं.।।१।।
पाय वितळून गेले,
मला घावेना ते घर.।
माय बाप झोपलेले,
नेलं कुशीतलं पोरं.।।२।।
हौशा नवशाने गाव,
आता चांगलं भरलं.।
कुणी दिली मूठमाती,
कुणी सोनं पळविलं…।।३।।
नाही कोंबड्याची बांग,
नाही हंबरली गाय.।
झालं गावाचं स्मशान,
सांगा देव कुठे गेलं..।।४।।
माझं म्हणू मी कुणाला?
नाही कांहीच उरलं.।
माझ्या ओळखीचं गाव,
कुणी उचलून नेलं..।।५।।”
त्यानंतर माझ्या उस्मानाबादच्या कांहीं मित्रांच्या सहकार्याने “कुटुंब रंगलंय काव्यात” या माझ्या एकपात्री कार्यक्रमाचा एक प्रयोग मी ‘किल्लारी भूकंप ग्रस्तांच्या मदतीसाठी’ सादर केला आणि जमा झालेली रक्कम आम्ही जिल्हाधिकार्ऱ्यांना सुपूर्त केली. या प्रयोगासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला जातीने मदत केली म्हणूनच भूकंप ग्रस्तांच्या मदतीसाठी मी ‘खारीचा वाटा’ देऊ शकलो, हे माझे भाग्यच आहे.

लातूर भूकंपात उध्वस्त झालेल्या कुटुंबातील अनाथ मुलांना दत्तक घेऊन तेथील “केशवराज विद्यालय व लायन्स क्लब” यांनी एक शाळा सुरू केली व दुसरी शाळा पिंपरी चिंचवड येथील एका सामाजिक सेवाभावी संस्थेने सुरू केली होती. जानेवारी १९९४ मध्ये या दोन्ही शाळां मधील विद्यार्थ्यांसाठी मी ‘ओंकार काव्य दर्शन’ हा माझा शालेय कार्यक्रम विनामूल्य सादर करून विद्यार्थ्यांना ‘मानसिक धक्क्यातून’ सावरण्याचा प्रयत्न केला होता.
गज़लसम्राट सुरेश भट यांच्या प्रेरणेने आणि मराठी कवींनी दिलेल्या कवितांमुळे मी हे कार्य करू शकलो. या सर्व कवींच्या आणि भूकंप ग्रस्तांच्या मदतीसाठीच्या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या माझ्या सर्व रसिक वर्गाच्या मी सदैव ऋणात राहीन.

— लेखन : प्रा.विसुभाऊ बापट, दादर, मुंबई.
(सादरकर्ते – कुटुंब रंगलंय काव्यात)
— संपादन : देवेंद्र भुजबळ
☎️9869484800