“कुटुंब बसलंय काव्याला” या माझ्या एकपात्री कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारांनी भरपूर प्रसिद्धी दिल्यामुळे
शहर व जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये माझ्या शालेय कार्यक्रमासाठी मला बोलावून घेत होते.
बहुतेक ठिकाणी ओंकार काव्य दर्शन तर कुटुंब….. चा
एखादा कार्यक्रम करीत मी नगर जिल्ह्यातील पाथर्डी, श्रीगोंदा, राहुरी, राहता तालुक्यात अनेक कार्यक्रम सादर केले. मानधन जुजबीच मिळत होते, पण खर्च भागात होता.
नगर मधील कार्यक्रमादरम्यान अशाच एका वळणावर कवी अरूण शेवते यांची भेट झाली. त्यावेळी अरूणने लिहिलेल्या “कावळ्याच्या कविता” खूप गाजत होत्या. कवितेमुळे आम्ही एकत्र आलो व आमची घट्ट मैत्री झाली. त्याने विचारल्यामुळेच मेन राजाराम हायस्कूल, कोल्हापूर येथील शालेय कार्यक्रमाच्या शुभारंभानंतर नगर पर्यंतचा प्रवास मी त्याला सांगितला.
रसिकहो तो प्रवास असा..
महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी कोल्हापूर गाठले, कारण मला संगीत व अभिनयाचे शिक्षणही घ्यायचे होते. त्यासाठी मी कोल्हापुरातील देवल क्लब मध्ये प्रवेश घेतला. हे सर्व शिक्षण चालू असतानाच संगीतकार मधू-आनंद यांच्यामुळे सत्यवादीकार बाळासाहेब पाटील यांच्या ‘समुद्र जेंव्हा खवळतो’ या नाटकात नायकाची भूमिका करण्याची संधी मला मिळाली.
बाळासाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे “धन्य झालो मी जीवनी, लाभे वीणा स्वामिनी” या त्यांच्या लाडक्या गाण्याला दोन-दोन वेळा मी वन्स-मोअर घेतला आणि दै. सत्यवादीतील सहसंपादकाची नोकरी मला सहजतेने मिळाली.
तिथे मला खूप शिकायला मिळाले, मराठी भाषेचा विशेष अभ्यास करता आला. विशेष करून मराठी कवितेचा अभ्यासही मी सत्यवादीत काम करीत असतानाच केला. याप्रमाणे माझ्या बरोबरच हे सर्व शिकत होते (आजचे पानीपतकार) विश्वास पाटील.!
किमान शालेय विद्यार्थ्यांपर्यंत कविता व्यवस्थित पोहोचवायच्या उद्देशानेच… मी शिकत असलेल्या कलेचा उपयोग करूनच मी शालेय कार्यक्रम तयार केलेला होता. या कार्यक्रमाचा शुभारंभ झाल्यानंतर (नोकरी, कार्यक्रम, शिक्षण सांभाळत) मी महावीर महाविद्यालय, गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ येथून अर्थशास्त्र विषयात एम्. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १९८०-८१ या शैक्षणिक वर्षात सध्या मी “प्रगती कॉलेज” येथे प्राध्यापक म्हणून नोकरी करीत आहे. शालेय कार्यक्रम तर करीत आहेच शिवाय आता कुटुंब…. चा नवा एकपात्री कार्यक्रम सुद्धा सुरू केलेला आहे. आता फक्त आपल्या मराठी कवितेसाठी कार्य करायचे मी ठरविलेआहे. हे माझे बोलणे ऐकून शेवते सरही अचंबित झाले.
असाच एक शालेय कार्यक्रम सादर करण्यासाठी मी राहता शहरातील ख्रिश्चन मिशनरीज चालवत असलेल्या एका शाळेत पोहोचलो. “बापटसर, सरस्वतीची प्रार्थना वगैरे करून तुम्ही कार्यक्रम सादर करीत असाल तर इथे तुमचा शालेय कार्यक्रम सादर करता येणार नाही… कारण आमच्या शाळेत देव-देवतांचा उल्लेख करता येत नाही.”
सर, आपल्या सांगण्याप्रमाणे सरस्वती प्रार्थना न करताच मी माझा कार्यक्रम सादर करेन… असे कबूल केल्यामुळेच त्यांनी मला कार्यक्रम करायची परवानगी दिली.
नंतर मी त्यांच्या शिक्षकांकडून बालभारतीची पुस्तके मागवली आणि पुस्तके चाळायचे नाटक करीत मी त्या मुख्याध्यापक महोदयांना म्हणालो, “सर, या कविता तुम्ही तुमच्या शाळेत शिकवता.? ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’ ! अहो अशा देवाचा उल्लेख असणाऱ्या कविता तुम्हाला कशा चालतात ? तुम्ही खास पुस्तकं बनवून घेतली पाहिजेत… तुमच्या शाळेसाठी.! ”
“कांहीच शाळांसाठी पुस्तके तयार करणे शक्य होणारे नाही. त्यामुळे देव-देवतांचा उल्लेख असणाऱ्या या रचना आम्हाला कविता म्हणून शिकवाव्याच लागतात..!” मग सर मी पण सरस्वतीची प्रार्थना नव्हे तर कविता म्हणूनच कार्यक्रम करीन…चालेल ना.?” मग सरांना मान्यता द्यावीच लागली. आणि मी …..
हे सरस्वती माता,
तुझीच राहो, सदा आम्हावर,
मंगलमय ममता ।। धृ.।।
अजाण आम्ही मुले माऊली,
तुझी मागतो कृपा साऊली ।
तुझ्या पूजनी तुझीच गाऊ,
गुणगौरव गाथा ।।१।।
विद्या व्रत विद्यार्थी जीवन,
घडो आचरण विशुद्ध पावन ।
आमुच्या साठी सदा वाहु दे,
ज्ञानाची सरिता ।।२।।
या सरस्वतीच्या प्रार्थनेनेच सुरुवात करून माझा शालेय कार्यक्रम सादर केला. इतर शाळांप्रमाणे या शाळेतील
शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी माझ्या या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला, हे सांगायला नकोच !

– लेखन : प्रा विसुभाऊ बापट
(सादरकर्ते-कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800