Saturday, July 5, 2025
Homeयशकथाकुटुंब रंगलंय काव्यात - भाग - ११

कुटुंब रंगलंय काव्यात – भाग – ११

एक दिवस प्रा. अनघा थत्तेंनी मला आपल्या बी.एड. कॉलेजवर बोलावून सांगितले, ” विश्वनाथ, मी धुळ्यातील अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्यां बरोबर फोन वर बोलले आहे. हे पत्र घेऊन तू त्यांना भेट. ते तुझा कार्यक्रम त्यांच्या कॉलेजवर ठेवणार आहेत.”  त्यांच्या सांगण्यानुसार मी दुसऱ्याच दिवशी सकाळी धुळे एसटी स्टँड वर उतरलो. रिक्षा करून तडक कॉलेजवर पोहोचलो. चौकशीअंती प्राचार्य त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे पाठ पाहण्यासाठी बाहेर गेले असून दुपारी ४ वाजता भेटतील, असे समजले.
त्या कॉलेज मध्ये आणि धुळे शहरात माझे कुणीही परिचित नव्हते.

पण ४ वाजेपर्यंत वेळ काढणेही गरजेचे होते. आज कार्यक्रम होणार नव्हता पण कार्यक्रमाची पुढील तारीख व वेळ ठरवून नाशिकला परतणे हेच सोइस्कर व योग्य होते. धुळे-नाशिक परतीच्या भाड्यापेक्षा दहा-वीस रुपयेच खिशात बाकी होते. त्यामुळे सरांची भेट झाल्या नंतर तातडीने नाशिकला परत निघणे आवश्यक होते. म्हणूनच बरोबर चार वाजता मी कॉलेजवर पोहोचलो.
“सर अजून परत आलेले नाहीत, थोड्या वेळात येतीलच, तोपर्यंत तुम्ही त्यांच्या कार्यालयात थांबा.” असे सांगून एका प्राध्यापकांनी मला प्राचार्यांच्या केबीन मध्ये बसवले, व ते निघून गेले.

विद्यार्थ्यांच्या पाठांचे निरिक्षण संपवून प्राचार्य परतले तेंव्हा साडेपाच वाजले होते. ‘मी सर्व काम संपवून येतोच तोपर्यंत बसा,’ असे सांगून प्राचार्य गेले ते एक तासानंतर परतले. “नमस्कार तुम्हाला खूप वेळ थांबायला लागलं, सॉरी सर.” म्हणत प्राचार्य माझ्या समोर बसले. मी माझा परिचय करून दिला आणि थत्ते मॅडम चे पत्र त्यांना दिले. माझ्या कार्यक्रमाची पुढील तारीख ठरवून मी सरांचा निरोप घेवून बाहेर पडलो तेंव्हा सांयकाळचे सात वाजून गेले होते.

तडक स्टँडवर पोहोचलो व नाशिकला जाणाऱ्या बसची चौकशी केली, तर आता एकदम रात्री ९ वाजता मुंबईला जाणारी रातराणी बस असल्याचे समजले. साध्या बस पेक्षा रातराणी बसचे भाडे जास्त होते आणि तेवढे पैसे माझ्या खिशात नव्हते. त्यामुळे रात्री बसस्टँडच्या मुंबई फलाटावरच रात्र काढावी लागणार होती. बसभाड्या शिवाय थोडेच पैसे खिशात होते. त्यामुळे फक्त चहा पाव खावून ती रात्र मुंबई फलाटावरच जागून काढली आणि सकाळच्या गाडीने नाशिक साठी निघालो.

या घटनेनंतर बरीच वर्षे लोटली. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून, कविता संकलित करून मी मुंबईला स्थिर झालो. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही माझ्या कार्यक्रमांना प्रसिद्धी मिळाली. सतत कार्यक्रम होऊ लागले, चांगले मानधनही मिळू लागले. चंद्रपूर जिल्ह्यातील असेच कांही कार्यक्रम संपवून दुसऱ्या दिवशी सकाळच्या कार्यक्रमासाठी मुंबईला पोहोचणे आवश्यक होते. त्यामुळे चंद्रपूरहून टॅक्सी करून नागपूर व तिथून सकाळी गीतांजली एक्सप्रेस पकडून मी मुंबई साठी निघालो. माझा हा दौरा धुळे जिल्हा माहिती अधिकारी मित्र अविनाश सोनवणे यांना माहिती होता.

परिणामी त्यांनी माझ्याशी मोबाईल वरून संपर्क साधला. “विसुभाऊ, गीतांजली ने आज तुम्ही निघाले आहात, जाताजाता जर भुसावळला उतरून धुळ्याला माझ्या कार्यालयात आलात तर आपल्याला जे आदिवासी आश्रम शाळांमध्ये कार्यक्रम करायचे आहेत, त्या संपूर्ण कार्यक्रमांची पुढील आखणी करता येईल. माझ्या कडे जेवण करून रात्री रातराणीने निघून उद्या सकाळच्या कार्यक्रमासाठी तुम्ही मुंबईला पोहोचू शकाल.!” या अविनाश सोनवणेंच्या सांगण्यानुसार मी भुसावळला उतरून धुळ्यातील त्यांच्या कार्यालयात पोहोचलो.

धुळे जिल्ह्यातील सर्व आदिवासी आश्रम शाळांमध्ये रोज चार याप्रमाणे कार्यक्रमांची आखणी केली. अनुताई वाघ यांनी दिलेला वसा मी आचरणात आणीत असल्याने या सर्व शाळांमध्ये मी माझे कार्यक्रम विनामूल्य करणार होतो आणि त्यांच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी मित्र सोनवणे यांनी घेतली होती. ठरल्याप्रमाणे रात्रीचे यथेच्छ भोजन अविनाशच्या घरी झाले, आग्रह होत असूनही मुक्काम करणे शक्य नसल्याने सोनवणे साहेब मला बस स्टँड वर रातराणी साठी सोडायला आले. धुळे बस स्टँडच्या त्याच मुंबई फलाटावर मी साहेबांचा निरोप घेत होतो. त्यावेळी मनात विचार आला कांही वर्षांपूर्वी याच फलाटावर मला अर्धपोटी थांबावे लागले होते आणि आज भरल्या पोटी मुक्काम करायचा आग्रह होत असतांना, खिशात पैसे व्यवस्थित होते तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यक्रमासाठी मुंबईला पोहोचणे आवश्यक असल्याने मी रातराणीने मुंबईला निघालो.
क्रमशः

प्रा विसूभाऊ बापट

– लेखन : प्रा विसुभाऊ बापट
(सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. विसुभाऊंची कार्यक्रमाविषयीची तळमळ खरोखरच प्रशंसनीय आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments