मित्र चंद्रनिवास दायमा बरोबर एक व्यक्ती मला भेटायला आली. चंदू ने त्यांची ओळख करून दिली… “बापट सर, हे म.कृ. आगाशे… ज्या शाळेत परवा आपला शालेय कार्यक्रम झाला, त्या शाळेत मराठीचे शिक्षक आहेत. शिवाय श्रीरामपुरातील सुप्रसिद्ध लोकमान्य टिळक वाचनालयाचे ते ट्रस्टी म्हणूनही काम पाहतात. त्यांना तुमच्याशी कांही बोलायचे आहे.!”
आगाशे सरांशी परिचय झाला, नंतर ते मला म्हणाले, “बापट सर, श्रीरामपूर परिसरात तुमचे बरेच कार्यक्रम झाले….. कार्यक्रमाला प्रसिद्धी पण खूप मिळाली आहे. तेंव्हा आमच्या वाचनालयाच्या मदतीसाठी आपला ‘कुटुंब बसलंय काव्याला’ हा एकपात्री कार्यक्रम आयोजित करुया कां.? आमच्या वाचनालयाचे रसिक वाचक तिकिटे घेतीलच. आम्ही तुम्हाला मानधन म्हणून रु.५००/- देऊ. तुम्ही तबला, पेटी व साथीदारासह येऊन कार्यक्रम करायचा. वाचनालयाच्या सभागृहात कार्यक्रमाच्या आयोजनाची सर्व व्यवस्था आम्ही पाहू.! ”
आगाशे सरांच्या या प्रस्तावाला मी लगेच मान्यता दिली… कारण माझा पहिला कार्यक्रम मी तिकीट लावून सादर करणार होतो ! आम्ही दोघेही कामाला लागलो. थत्ते नावाच्या एक संगीत शिक्षिका माझ्या चांगल्या परिचयाच्या झाल्या होत्या. चांगल्या कविता निवडून त्या चालही छान लावायच्या… त्यामुळेच त्यांच्या कुटुंबाशी माझे सूर जुळले होते.
“सहा ऋतू हे वर्षामधले,
सजली धरणी तयांमुळे ।।”
या कवितेतील सहा कडवी त्यांनी सहा रागात बांधली होती. वाचनालयाच्या कार्यक्रमाचे ऐकून त्याही खूष झाल्या.
हेमंत दिवटे नावाचा एक तबलावादक थत्ते बाईंच्या मुळेच मला तबला साथ करायला तयार झाला. त्याचे मानधन ठरले, आणि थत्ते बाईंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या घरीच आमची तालीम सुरू झाली. आगाशे सरांनी सुध्दा गावात बोर्ड लावले, तिकीटे छापून विक्रीसाठी प्रयत्नही सुरू केले.
“बापट सर, SORRY पाच रुपयाचं तिकीट असूनही कुणी ते घ्यायला तयार नाहीत. ‘मराठी कविता पैसे देऊन काय ऐकायच्या.?’ असंच प्रत्येक जण म्हणतोय. त्यामुळे आपला कार्यक्रम होऊ शकत नाही.! “आगाशे सरांच्या या बोलण्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिकीट विक्री करून होणारा माझा पहिलाच कार्यक्रम रद्द होणार होता.
लहानपणी मी कीर्तनाला जायचो……कीर्तनाच्या शेवटी भाविकांसमोर आरतीचे तबक फिरवले जायचे…. भाविक स्वेच्छेने त्यात पैसे टाकून आरती घ्यायचे. तबकात जे जमलेले असतील ते कीर्तनकारांचे मानधन असायचे.! ही घटना डोळ्यासमोर ठेवूनच मी आगाशे सरांना म्हणालो, “सर, कार्यक्रम जर विनामूल्य आयोजित केला तर रसिक येतील कां ? जमलेल्या रसिकांना कार्यक्रमाच्या मध्यंतरात व शेवटी आवाहन करायचे…. बॉक्स मध्ये जे जमतील ते आपण घेऊयात.” ही माझी कल्पना सरांना खूप आवडली आणि या पद्धतीने कार्यक्रम करायचे निश्चित केले.!
कार्यक्रम विनामूल्य जाहीर झाला. रसिक सहकुटुंब एकत्र आले. रसिकांनी (विनामूल्य म्हटल्यावर) हॉलमध्ये प्रचंड गर्दी केली. माझ्या सादरीकरणावर माझा विश्वास होता.
कवींच्या शब्दांची ताकद मला चांगलीच माहिती होती, श्रीसरस्वती मातेचा आशिर्वाद, गुरुंची कृपा यामुळे माझा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला. रसिकांनी मुक्त कंठाने भरभरून दाद दिली. मध्यंतरात व कार्यक्रमाच्या शेवटी आगाशे सरांनी रसिकांना केलेल्या आवाहनालाही रसिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. त्यामुळे बॉक्स मध्ये जमलेल्या पैशातून माझे मानधन घेऊन उरलेले पैसे आम्ही वाचनालयाच्या मदतीसाठी त्यांच्या कडे सुपूर्द केले.
या कार्यक्रमामुळे, कार्यक्रम आयोजित करायची नवीन कल्पना मला मिळाली होती. एखाद्या छोट्या गावातील रसिकांपर्यंत कार्यक्रम पोहोचविणे, त्यातून थोडे मानधन मिळविणे व पुढील गावाकडे निघणे असा माझा उपक्रम सुरू झाला. असे कुटुंब…..चे कार्यक्रम आणि शालेय कार्यक्रम सादर करीत…..भेटणार्या नवीन कवींच्या कविता संकलित करीत…… मी नाशिक गाठले.

– लेखन : प्रा विसुभाऊ बापट
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800