Thursday, February 6, 2025
Homeलेखकुटुंब रंगलंय काव्यात - भाग - ६

कुटुंब रंगलंय काव्यात – भाग – ६

भद्रकाली भागातील ‘गुजरात लॉजवर’ मुक्काम ठोकून नाशिक जिल्ह्यातील कार्यक्रम करायचे मी ठरविले. शिवाय नाशिक जिल्ह्यातील अनेक कवींच्या कविता मला संकलित करायच्या होत्या.

नाशिक मुक्कामात श्रीरामपूरच्या आगाशे सरांनी सांगितलेल्या बिटको हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना श्री.पी.आर. कुलकर्णी सरांना मी प्रथम भेटलो. सर स्वतः एक विलक्षण कवी व कवितेवर प्रचंड प्रेम करणारे होते. त्यामुळेच त्यांनी बिटको हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी दोन्ही शिफ्टमध्ये माझे दोन कार्यक्रम आयोजित केले व चांगले मानधनही दिले. एका शाळेचे मुख्याध्यापक, चांगले कवी आणि शिवाय कवींच्या प्रसिद्ध कवितेतील पहिल्या ओळी नंतर स्वतःची एक ओळ लिहून विनोद निर्मिती करणारे कवी म्हणून कुलकर्णी सर नाशिकच्या साहित्य वर्तुळात प्रसिद्ध होते. वानगीदाखल याओळी ….
“घरात हसरे तारे असता, पाहु कशाला नभाकडे ?
तारांगण घर होण्याआधी, करू पाळणा बंद गडे।” किंवा
“मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे।
दाबयंत्रा खाली खडीच्या, कां वृथा मी चेंगरावे ?”

अशा पी.आर.कुलकर्णी सरांनी आणि मी मिळून बिटको हायस्कूलच्या हॉलमध्ये नाशिक जिल्ह्यातील कवींसाठी कविता वाचन स्पर्धा व कवी संमेलन आयोजित केल्यामुळे कवीं प्रमाणे रसिकांनी पण गर्दी केली होती. पारितोषिक प्राप्त तीन कवींना मी पुस्तके प्रायोजित केली होती. कवींच्या कविता मला संकलित करता याव्यात, म्हणूनच सरांनी हा प्रयत्न केला होता.

“शाळा सुटली पाटी फुटली,
आई मला भूक लागली।।” अशी गाजलेली बालगीतं, ‘अमृताची गोडी, तुझ्या भजनात।’, ‘विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरीश, प्रभु आले मंदिरी।’, ‘श्रीरामाचे दर्शन घडले।’ अशी अनेक गाजलेली भक्तिगीते ज्यांनी लिहिली असे सदस्य, नाशिक मधील सुप्रसिद्ध कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. आम्ही आयोजित केलेल्या स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. प्रा.अनघा थत्ते, पंढरीनाथ सोनवणे, अरुणा कुलकर्णी, प्रमोद खेडलेकर, संतोष हुदलीकर, दशरथ सोनार आदि नाशिक मधील प्रसिद्ध कवींच्या कविता मी संकलित करू शकलो व त्यांच्या बरोबर माझी चांगली मैत्री झाली.

प्रसिद्ध व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार, उत्कृष्ठ फोटोग्राफर व सर्पमित्र आण्णा लकडे या दोन दर्दी रसिकांशी माझी घट्ट मैत्री या कवी संमेलनातच झाली. नंतर ज्ञानेश भाऊंच्या घरात झालेल्या बैठकीत त्याची व्यंगचित्रे मला जवळून अनुभवता आली.

सराफामधील बालाजी मंदिर जवळ असलेला अण्णांचा फोटो स्टुडिओ म्हणजे आमचा ठिय्याच झाला. परिसरात कुठेही साप निघाला की आण्णांना
बोलावणे यायचे आणि काहीवेळा मी ही त्यांच्या बरोबर जायचो. आण्णा साप पकडून जंगलात सोडून यायचे. पण सापाला कुणी मारलं तर आण्णांना ढसाढसा रडतांना मी पहिलं आहे.
“किनाऱ्यावर क्षितिज विसावले,
हे किनाऱ्याचं वात्सल्य ?
की क्षितिजाचा थकवा.?”

अशा मुक्त छंदातल्या सुंदर कविता लिहिणाऱ्या अनघा थत्ते यांनी तर मला मुलगा मानले होते. नाशिकमधील शासकीय अध्यापक महाविद्यालयात त्या मराठी शिकवत होत्या आणि प्रतिभावंत प्राध्यापिका म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती होती. त्यामुळेच शालेय व कुटुंब… चे कार्यक्रम ठरविण्यासाठी त्यांनी मला खूप मदत केली.

प्रमोद खेडलेकर काळाराम मंदिराजवळ रहायचा, त्याच्या मुळेच काळ्या रामाची सेवा मला करायची संधी मिळाली व गीत रामायणातील कविताही मला सादर करता आल्या. प्रमोदची बहीण प्रतिभा गाणारी होती, शिवाय संपूर्ण खेडलेकर कुटुंबच रसिक होते. परिणामी त्यांच्या घरी कवी गोष्टी व गाण्याच्या तालमी होत होत्या.

तिथेच लैला-मजनूचा कवी म्हणून ओळख असलेल्या दशरथ सोनारांच्या कविता मला मिळाल्या व अरुणाच्या कांही कविताही मी माझ्या कडे संकलित केल्या. त्यांची एक कविता रसिक हो खास आपल्या साठी….
‘रंग गंध मी दिले फुलांना, तार्यांना मी तेज दिले।
जलाशयांना तरंग दिधले, वार्याला मी गीत दिले।
ज्याने ज्याने जे मागितले, त्याला ते ते सर्व दिले।
हळूच माझे मन वसले की, सांग मला तू काय दिले।।
क्रमश:

प्रा विसूभाऊ बापट

– लेखन : प्रा विसुभाऊ बापट
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी