सकाळी लौकरच नाशिक सोडलं आणि दहाच्या सुमारास जव्हारला पोहोचलो. जवळच असलेल्या बूथ वरून राजगुरू सरांना फोन केला. ते येईपर्यंत थोडा वेळ काढायचा होता. बूथच्या बाजूलाच एक दुकानदार एका आदिवासी व्यक्ती बरोबर बोलत होता….. ‘तुझ्या एका वस्तूच्या बदल्यात मी तुला या चार वस्तू दिल्या, खूष ना ?’
ती आदिवासी व्यक्ती सुद्धा होकार देऊन खूष होऊन निघून गेली. पण तो व्यवहार पाहून माझं डोकं मात्र सुन्न झालं. कारण त्या दुकानदारानं खायचा डिंक घेऊन त्या आदिवासी व्यक्तीला तेवढ्याच वजनाचे कांदे, बटाटे, तांदूळ, गहू अशा चार वस्तू देऊन त्याला अक्षरशः लुबाडलं होतं.
हे सर्व नाटक पहात असतानाच राजगुरू सर माझ्या समोर हजर झाले. त्यांच्या शिपायाने माझी बॅग घेतली व आम्ही त्यांच्या अध्यापक विद्यालयाकडे निघालो.
‘बापट सर, तुम्ही आत्ता पाहिलेली गोष्ट मनावर घेऊ नका. ही आदिवासींची लूट नेहमीचीच आहे. यावर कुणीही बोलू शकत नाहीत.!’ अशा गप्पा मारतच आम्ही त्यांच्या कॉलेजवर पोहोचलो.
कोसबाड डीएड कॉलेज व त्या परिसरातील आदिवासी आश्रम शाळांतील माझ्या शालेय कार्यक्रमांचे रिपोर्ट राजगुरू सरांना मिळाल्या कारणाने माझी ५ दिवस मुक्कामाची व्यवस्था करून त्यांच्या डीएड कॉलेजवर आणि परिसरातील खाजगी माध्यमिक शाळांमध्ये माझ्या शालेय कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी मला नाशिक वरून खास बोलावले होते. या सर्व कार्यक्रमांचे मिळून थोडे फार मानधनही मला मिळणार होते. त्यांच्या कॉलेजचा तो संपूर्ण दिवस प्राचार्य राजगुरू सरांनी माझ्या साठी राखून ठेवलेला होता.
प्राचार्यांच्या कार्यालयात फ्रेश होऊन आमचे चहापाणी होई पर्यंत सरांनी त्यांच्या अध्यापक विद्यालयाच्या दोन्ही वर्गातील भावी शिक्षकांना एकत्रित करायला सांगितले आणि आम्ही त्या वर्गावर गेलो. सरांनी माझा परिचय करून दिला व यथोचित स्वागतही केले आणि त्या विद्यार्थ्यांना माझ्या ताब्यात दिले.
सर्वप्रथम मी त्यांना गदिमांची एक कविता शिकवली… ‘माहेरची ओढ !’ कवितेवर कांही प्रश्न लिहून दिले व उत्तरं लिहायला सांगितली. नंतर बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील कविता… ज्या पुढे त्यांना शिकवायच्या आहेत… त्या कवितांच्या अनुषंगाने… त्या कवितांच्या सादरीकरणातून… कवितेची व्याख्या समजावून सांगणारा “ओंकार काव्य दर्शन” हा शालेय कार्यक्रम मी सादर केला. सर्वच विद्यार्थी, शिक्षक, इतर कर्मचारी माझ्या कार्यक्रमावर बेहद्द खूष झाले.
त्या रात्री माझा मुक्काम राजगुरू सरांच्या घरीच झाला. त्यांच्या घरातील सर्वजण मराठी कवितेचे रसिक असल्याने आमची ती रात्र कविता ऐकण्या ऐकवण्यात गेली. दुसऱ्या दिवसापासून सलग चार दिवस मी रोज दोन कार्यक्रम करायचे असे आयोजन सरांनी केले होते, राजगुरू सरांचा एक माहितगार शिपाई कार्यक्रमांच्या आयोजनासाठी माझ्या बरोबर राहणार होता. त्या भागातील सर्व प्रवास आम्ही एस् टी बसनेच करणार होतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मोखाड्याला निघालो. बस बरीच रिकामी असूनसुद्धा आदिवासी व्यक्तीने हात दाखवला तरी बसचे वाहक-चालक बस थांबवत नव्हते. उलट ज्याठिकाणी त्यांच्या चहा नाष्ट्याची मोफत व्यवस्था होती तिथे मात्र त्यांनी बस थांबवली. आम्ही सुद्धा पाय मोकळे करायला खाली उतरलो. तिथेही एका आदिवासी म्हातारीला आपल्या माणसांनी कसे लुटले ते प्रत्यक्ष पाहिले. ती आदिवासी बाई त्या बसथांब्यावर एक टोपलीभर सिताफळं विक्रीसाठी घेऊन आली. आपल्या सुशिक्षित माणसांनी त्या म्हातारी भोवती गराडा घातला आणि सगळी सिताफळं फुकापासरी भावानं घेतली व गर्दी पसारही झाली. मिळालेल्या पैशात समाधान मानून हात हलवत म्हातारी निघून गेली.
“या भागातले आदिवासी नेहमी असेच लुबाडले जातात आणि आपण कांहीच करू शकता नाही,” सोबतचा शिपाई मला असं सांगत असतानाच आम्ही बसमध्ये बसलो व थोड्या वेळातच मोखाड्याला पोहोचलो.
मुंबई पासून अगदीच जवळ असलेल्या या परिसरातील आदिवासी अर्धनग्न राहतात, अशिक्षित तर असतातच शिवाय अतिशय गरीबही असतात. बिचारे अपरात्री सुद्धा जंगलात फिरून मध, चारोळ्या, खायचा डिंक यासारखा “जंगलचा मेवा” गोळा करून आणतात. एखाद्या प्रसंगी त्यांना जंगली जनावरांशी सामना करावा लागतो. जंगलचा मेवा घेऊन ते तालुक्याला येतात… त्याच्या बदल्यात त्यांना जगण्यासाठी आवश्यक कांही वस्तू पाहिजे असतात. मग आमचा व्यापारी त्यांनी आणलेला मेवा एका तावडीत ठेवतो व दुसऱ्या तावडीत तेवढ्याच वजनाचे गहू, तांदूळ, कांदे, बटाटे यासारख्या तीन-चार वस्तू देऊन त्यांची बोळवण करतो. आदिवासींना फसवतो,….बक्कळ नफा कमावतो… स्वतः गब्बर होतो… पण आदिवासी मात्र गरीबच राहतो.
या पाच दिवसांच्या कार्यक्रम दौऱ्यात वरील सर्व घटना मी प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत. पण हे सर्व पाहण्या शिवाय कांहीही करू शकलो नाही, याची खंत माझ्या मनात आजही सलते आहे… त्रास देते आहे.

– लेखन : प्रा विसूभाऊ बापट
(सादरकर्ते – कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
कार्यक्रमाच्या निमीत्ताने बापट यांना आदीवासींची होणारी लूटमार पहायला मिळाली.संवेदनशील मनाने त्यांनी लिहीलेले हे अनुभव खरोखरच उदास करणारे आहेत.