नाशिकच्या ज्या लॉजवर माझा मुक्काम होता त्या लॉजचे घाबरेघुबरे झालेले मॅनेजर एक दिवस सकाळी धावतच माझ्याकडे येऊन मला म्हणाले, “अहो बापट सर, दोन पोलीस तुम्हाला हुडकत आलेत, ताबडतोब चला.” खरेतर हे ऐकून मीही घाबरलोच ! तसाच कौंटरवर गेलो तर खरंच दोन पोलीस माझ्या समोर उभे होते. ते मला म्हणाले, “आमच्या सीपी साहेबांनी तुम्हाला बोलावले आहे. लगेच चला.”
“अहो पण मी काय केलंय ? माझा गुन्हा काय ? साहेबांनी मलाच बोलावलं ना ?” माझा प्रश्न.
“हो तुम्हालाच बोलावलंय ! कशाला ? ते आम्हाला माहीत नाही ! चला आमच्या बरोबर !” या पोलीसांच्या उत्तरावर मी कांहीही न-बोलता त्यांच्या बरोबर निघालो व जीपमधे बसून त्यांच्या कार्यालयात पोहोचलो.
एका पोलीसाने साहेबांच्या कक्षाचा दरवाजा उघडला. समोर उभ्या असलेल्या साहेबांनी माझे स्वागत केले, “या बापट सर, मी सुधाकर जोशी. इथला पोलीस कमिशनर. बसा.”
मी साहेबांसमोरच्या खुर्चीत बसलो. त्यांनी केलेल्या स्वागतामुळे माझा जीव थोडा भांड्यात पडला. “बापट सर, तुमचा कालचा कार्यक्रम फारच चांगला झाला. मी खूप अेंजॉय केला. आपण काल या कुन्देंन्दुचे मराठीकरण ऐकवले, ते फार अप्रतीम आहे. मला ते लिहून द्याल कां ?”
त्यांनीच दिलेल्या कागदावर मी सरस्वती स्तोत्राचे मराठी भाषांतर.. समश्लोकी.. लिहून दिली.
“जी चंद्रासम शुभ्रकांती विलसे, जी
शुभ्रवस्त्रा असे।
वीणेने कर दोन शोभति जिचे, जी श्वेतपद्मी वसे।।
ब्रह्मा-विष्णु-शिवादि देवहि जिला, भावे सदा वंदिती।
माझे रक्षण श्रीसरस्वति करो, अज्ञान नाशूनि ती।।”
समश्लोकी वाचून साहेब खूष झाले. मी दिलेला कागद त्यांनी बाजूला ठेवला. टेबलच्या ड्रॉवरमधून बाहेर काढलेला दुसरा कागद मला देत ते मला म्हणाले, “सर, तुम्ही मला एक समश्लोकी दिलीत तशी मी ही एक समश्लोकी तुम्हाला देतोय. पहा कशी वाटते.” ती समश्लोकी अशी…
“ल्याली निर्मल शुभ्रवस्त्र बसली, जी श्वेतपद्मासनी।
शोभे ऊज्वल गौरवर्ण नटली, वीणा करी घेऊनी।।
नाचे चित्रमयूर पायतळि हा, जी रंगली गायनी।
देवो सन्मति ती सरस्वति आम्हा, विद्या कलादायिनी।। ”
या बैठकीनंतर जोशी साहेबांबरोबर माझी चांगली मैत्री जमली. नंतर त्यांच्या पोलीस विभागात माझा एक कार्यक्रमही मी सादर केला.
ओंकार काव्य दर्शन हा शालेय आणि कुटुंब रंगलंय काव्यात असे दोन्ही कार्यक्रम सादर करत मी नाशिक जिल्ह्यात फिरत होतो. असाच माझा एक कार्यक्रम मनमाडच्या रेल्वे कॉलनीमध्ये ठरला. रेल्वे स्टेशन जवळच्या राधिका हॉटेल मध्ये त्यांनी माझी रहायची व्यवस्था केली होती. तिथला कार्यक्रम यशस्वीपणे सादर झाला आणि मी मुक्कामासाठी रात्री दीड वाजता हॉटेलवर पोहोचलो. हॉटेल मॅनेजर बरोबर माझ्या गप्पा चालू होत्या. त्याचवेळी आणखी एक कलाकार व्यक्ती हॉटेलवर पोहोचली.
ज्यांना गुरूस्थानी मानून मी माझा एकपात्री कार्यक्रम सुरू केला ते प्रा. सदानंद जोशी त्यांचा “मी अत्रे बोलतोय” हा एकपात्री कार्यक्रम मनमाड शहरात सादर करून तिथे पोहोचले. खाली वाकून मी त्यांना नमस्कार केला आणि माझा परिचय पण करून दिला.
“अरे व्वा, कुटुंब रंगलंय काव्यात कार्यक्रम तुझा आहे होय. नाशिकमध्ये तुझे व तुझ्या कार्यक्रमाचे चांगले नांव आहे, तुझ्या कार्यक्रमावर रसिक खूष आहेत, तुझ्या कार्यक्रमाला चांगली प्रसिद्धी पण मिळाली आहे. एकपात्री कार्यक्रम समर्थ पणे सादर करणारे ताकदीचे कलाकार मराठी रंगभूमीवर खूपच कमी आहेत, तेंव्हा तू माझ्या बरोबर मुंबईला चल !”
“सर मी मुंबईला येईन….. पण इतक्यात नाही. कारण मला संपूर्ण महाराष्ट्रात फिरून कवी आणि कविता संकलित करायच्या आहेत. अजून कवितांचा अभ्यास करायचाय आहे.! त्यानंतरच मी मुंबईला येईन… त्यावेळी मला सहकार्य कराल नां ? ” जोशी सरांनी मला होकार दिला आणि आम्ही राधिका हॉटेलवरील आपआपल्या खोलीत गेलो.
मनमाड मध्ये झालेली भेट हा एक योगायोग होता पण ती भेट माझ्यासाठी खूपच महत्त्वाची ठरली. कारण त्यानंतर ज्यावेळी मी मुंबईला आलो, त्यावेळी प्रा. सदानंद जोशी सरांनी मला सर्वतोपरी मदत केली, त्यानंतर मी मुंबईत स्थिर झालो. मला, माझ्या कार्यक्रमांना भरपूर प्रसिद्धी मिळाली, माझा कार्यक्रम मी सातासमुद्रापार असलेल्या मराठी रसिकांच्या सेवेत सादर करू शकलो.

– लेखन : प्रा विसुभाऊ बापट
(सादरकर्ते-कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
अतिशय छान लेख
बापट यांचा कार्यक्रम रंगतोच.पण मुलाखतही रंगली छान! त्यांना भेटल्यासरखे वाटले.
कुटुंब रंगलंय… Great!
अतिशय सुंदर ,मनोरंजक लेख.
सामान्य माणूस आणि पोलीस यांच्या भेटीत एका बाजूला भयच असते..पण बापटांची सुरवात भयापासून झाली
तरी समारोप मैत्रीत झाला हे फारच गंमतीदार
या कुन्देदु ची समश्लोकी आवडली.