Wednesday, September 17, 2025
Homeलेखकुटुंब रंगलंय काव्यात : लेख - १२

कुटुंब रंगलंय काव्यात : लेख – १२

नासिक जिल्ह्यातील कार्यक्रम व त्यांच्या प्रसिद्धीचे लोण औरंगाबाद जिल्ह्यापर्यंत पोहोचले आणि डॉ. वझे या रसिकाने ‘कुटुंब बसलंय काव्याला‘ हा माझा एकपात्री कार्यक्रम गंगापूरच्या रसिकांसाठी आयोजित केला. प्रवरा व गोदावरी नद्यांच्या संगमावर वसलेल्या, पेशवाई पासूनचा इतिहास लाभलेल्या गंगापूरच्या दर्दी रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिल्याने माझा कार्यक्रम खूप रंगला. त्या प्रयोगाला जायकवाडी प्रकल्पावर इंजिनियर म्हणून काम करणारे श्री. विलास पत्की साहेब हजर होते. माझा एकपात्री कार्यक्रम त्यांना अतिशय आवडला. ते मला तडक पैठणला घेऊन गेले.

पैठणच्या एकनाथ महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तिथेच एकनाथांनी लिहिलेल्या भारूड या काव्य प्रकाराची पुस्तके मला मिळाली. तिथून आम्ही जायकवाडी प्रकल्पाच्या रेस्ट हाऊसवर पोहोचलो. माझ्या निवास, भोजनाची व्यवस्था सरांनी तेथे केली होती. “बापट सर, उद्या रात्री ९ वाजता इथल्या रसिकांसाठी मी आपला कार्यक्रम आयोजित करतोय. उद्या सकाळी मी आपल्याला घ्यायला येतो, आपण आमच्या घरी जाऊया” असे सांगून पत्की साहेब निघून गेले. त्या रेस्ट हाऊसवरील माझी व्यवस्था त्यांनी फार अप्रतीम केली होती.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी विलास पत्की साहेब मला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी रेस्ट हाऊसवर आले. “हे प्रा.बापट, ‘कुटुंब बसलंय काव्याला’ हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम आपण आज रात्री ९ वाजता आपल्या हॉलमध्ये आयोजित करतोय. त्यासाठी सर्वांनी सहकुटुंब यावे, असे आव्हान करायचे आहे. आणि सर हे आमचे मराठे साहेब.!” सोबत आलेल्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देत पत्की साहेब पुढे म्हणाले, “आमचे हे मराठे साहेब प्रचंड रसिक आहेत. येथील जलविद्युत प्रकल्पाचे ते चीफ इंजिनियर आहेत. ‘कोयनानगरचा जलविद्युत प्रकल्प’ यांनीच तयार केला.

असा जलविद्युत प्रकल्प तयार करणारे महाराष्ट्रातील ते एकमेव इंजिनियर असल्याने इथल्या जलविद्युत प्रकल्पाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर जायकवाडी धरणाची (नाथ सागर) संपूर्ण जबाबदारी चीफ इंजिनियर म्हणून मी सांभाळतोय.”

त्यानंतर सकाळचा नाश्ता, चहा पत्की साहेबांच्या घरी दुपारचे जेवण मराठे साहेबांच्या घरी करून आम्ही रेस्ट हाऊसवर परतलो. ‘सर, आता आपण थोडा आराम करा. आम्ही आपल्या रात्रीच्या कार्यक्रमाची तयारी करतो. आणि आपल्याला हॉलवर घेऊन जाण्यासाठी साडेआठ वाजता गाडी पाठवतो, आपण हॉलवर या, आपल्या स्वागतासाठी आम्ही तिथे आहोतच.!’ असे सांगून दोघेही निघून गेले.

नाथसागरच्या दर्दी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जसा मिळत गेला तसा माझा तिथला कार्यक्रम रंगत गेला. सर्व रसिकांनी कार्यक्रमाची भरभरून स्तुती केली. मराठे व पत्की साहेब तर कार्यक्रम ऐकून भारावले होते. पुन्हा रेस्ट हाऊसवर पोहोचल्यावर ते मला म्हणाले, ‘सर, आता तुम्ही चार पाच दिवस इथेच मुक्काम करायचा. दिवसभर आमच्या साईट वर फिरायचं आणि रात्री कवितांचा आनंद घ्यायचा.’ दोघांनी केलेल्या आग्रहाखातर मी पुढील चार दिवस तिथेच रहायचे ठरविले.

दुसऱ्या दिवशी सकाळी जेंव्हा मी पत्की साहेबांबरोबर नाथसागरच्या मुख्य भिंतीवर गेलो तेंव्हा तेथील गोड्या पाण्याचा साठा पाहून अवाक् झालो. दूर दूर पर्यंत पाण्यावर विसावलेले क्षितीज दिसत होते… किनारा दिसत नव्हताच.!“सर प्रतिवर्षी हिवाळ्यात हा गोड्या पाण्याचा समुद्र समजून येथे समुद्र पक्षी येतात. ते पक्षी- सौंदर्य पाहण्यासाठी तुम्हाला परत इथे यावे लागेल !” धरणाच्या भिंतीवरून पुढे चालताना साहेब माहिती देत होते.

“धरणाच्या उजव्या बाजूला जलविद्युत निर्मिती प्रकल्प मराठे साहेब उभा करतायत तर धरण दरवाजांच्या… नदीच्या… डाव्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेवर वृंदावन गार्डनची प्रतिकृती उभी करायचे काम सुरू झाले आहे. खास म्हैसूरला जाऊन मी वृंदावन गार्डनची संपूर्ण माहिती, कांही फोटो घेऊन आलोय आणि बजेटसह सर्वच गोष्टी शासनाने मंजूर करून दिल्या आहेत.” नाथसागर परिसर आणि वृंदावन गार्डनची प्रतिकृती असलेले ‘संत ज्ञानेश्वर उद्यान’ फिरण्यात दोन दिवस कसे गेले ते समजलेच नाही.

शेवटच्या दिवशी मी मराठे साहेबांबरोबर धरणाच्या भिंतीवरून चालत उजव्या बाजूला तयार होत असलेला जलविद्युत प्रकल्प पहायला गेलो. धरण भिंतीपेक्षा पाच सहापट खोल व मोठ्या व्यासाची विहीर तिथे तयार केली होती. बाजूला आणखी एक विहीर तयार केली होती. त्याबद्दल विचारताच मराठे साहेब म्हणाले, “कोयना जलविद्युत प्रकल्प तयार करतांना चिपळूणच्या बाजूला असलेला मोठा डोंगर पोखरून आम्ही मोठा बोगदा (टनेल) तयार केला आहे. त्यातच वीज निर्मिती करणारी मशिनरी बसवली.

त्यामुळे नैसर्गिक रीतीने धरणातील पाणी मोठ्या फोर्सने मशिनमध्ये सोडले.. वीज निर्मिती करून पुढे ते पाणी वाशिष्ठी नदीत सोडले. इथे तशी सोय नसल्याने ही मोठी विहीर तयार करून वीज निर्मिती करणारी मशीन्स त्यात बसविली आहेत. धरणाला जोडलेल्या एका मोठ्या पाईपमधून पाणी मोठ्या फोर्सने मशीन मध्ये येईल…. दिवसा मशीन क्लॉकवाइज फिरून वीज निर्मिती करून पाणी पुढच्या विहिरीत साठवले जाईल. निर्माण होणारी वीज संपूर्ण महाराष्ट्राला पुरेल. रात्री हे मशीन अँटी क्लॉकवाइज फिरून विहिरीतील पाणी परत धरणात जाईल, त्या पाण्याचा पुन्हा एकदा वापर करता येईल..! ” मराठे साहेबांनी दिलेली माहिती ऐकून मी अक्षरशः अवाक झालो आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला सलाम केला.

मराठे साहेबांच्या नंतर हा प्रकल्प बंद पडला, संत ज्ञानेश्वर उद्यान आज ओसाड झालंय, ही खंत आज मनाला बोचते आहे.

प्रा विसूभाऊ बापट

– लेखन : प्रा विसूभाऊ बापट
(सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. जशी अमृतमय आहे
    प्रा.विसुभाऊंची वाणी
    तितकीच गोड आहे
    त्यांची सुलभ सुंदर लेखणी

    आवाजातली लय आणि ताल
    नाथसागरच्या सुरेख वर्णनातही आहे
    विसुभाऊंच्या काव्य सादरीकरणाची जादू
    त्यांच्या रसाळ मधुर लेखणीतही आहे

    कुटुंब रंगलं काव्यात या बरोबरच
    त्यांची लेखणीसुद्धा मनाला भावली
    कोटी कोटी मराठी मने धन्य झाली
    आयुष्यभर विसुभाऊंनी तळमळीने उत्साहाने
    अगदी झपाटून माय मराठीची सेवा केली

    मराठी भाषा पंधरवडा निमित्त
    प्रा.विसुभाऊ बापट यांना मानाचा मुजरा
    स्विकारावा विसुभाऊ हा प्रेमाने भारलेला
    काव्य रुपी शब्द सुमनांचा गजरा

    आपलं मनःपूर्वक करतो
    हार्दिक अभिनंदन
    देवी शारदेच्या कृपेने जीवनी आपुल्या
    फुलत राहो आनंदाचं सौख्याचं नंदनवन

    राजेंद्र वाणी
    दहिसर मुंबई 🙏🌹

  2. मला हे सदर वाचायला खुप आवडते. बापटांचा त्यांच्या कार्यक्रमाबद्दल माहिती मिळतेच शिवाय प्रवासातले वर्णन व त्या विभागातली माहिती/ वर्णन पण सहज सुलभतेने लिहीलेल असते. प्रकल्प बंद पडला व उद्यान ओसाड पडले हे वाचून मात्र वाईट वाटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं