Tuesday, September 16, 2025
Homeलेख'कुटुंब रंगलंय काव्यात' (१४)

‘कुटुंब रंगलंय काव्यात’ (१४)

ठाणे जिल्ह्यातील ‘वाडा’ गावात प्राचार्य रानडे सरांच्या घरी झालेल्या बैठकीत RSS च्या नागपुरातील कांही रसिकांना भेटायला सरांनी मला सांगितले होते. पैकी एक रसिक तेलंगसर नागपूरच्या मेडिकल चौकात असलेल्या ‘नवयुग विद्यालयाचे’ मुख्याध्यापक होते, त्यांना मी दुसऱ्याच दिवशी जाऊन भेटलो. माझा परिचय करून दिला. आमगावच्या रानडे सरांनी ‘भेटायला सांगितले, म्हणून आलो.’ असे सांगितले. त्याचप्रमाणे अनुताईंपासून नाशिक बी.एड. कॉलेजच्या प्रा.अनघा थत्तें पर्यंत सर्वांनी दिलेली प्रशस्तीपत्रे तेलंग सरांना दाखवली. ती प्रशस्तीपत्रें कौतुकाने पहात सर मला म्हणाले, “विसुभाऊ, तुम्ही अर्थशास्त्राचे प्राध्यापक होता, अनुताईंच्या अध्यापक विद्यालयात तुम्ही पाठ घेतलेत, तसा एक पाठ आमच्या १० वीच्या वर्गावर घ्या. तो मी पाहतो आणि मगच तुम्हाला आमच्या शाळेत तुमचा कार्यक्रम करायचा की नाही ? ते ठरवतो. ! चालेल कां ?” मी त्यांना लगेच होकार दिला.

सरांनी १० वीचे सर्व विद्यार्थी एकत्र केले आणि आम्ही वर्गावर गेलो. तेलंग सरांनी माझा परिचय करून दिला व ते मुलांच्या बरोबर बाकावर जावून बसले आणि मी पाठ सुरू केला. “माहेरची ओढ” ही गदिमांची, माझ्याकडे त्यांच्याच अक्षरात संकलित असलेली कविता, “उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार” ही कवितेची व्याख्या समजावून सांगत मी मुलांना शिकवली. कविता चालीवर म्हणून घेतली व त्या कवितेवर प्रश्न लिहून दिले, उत्तरे लिहायला सांगितली, आणि म्हणालो, “पाठ्येतर कवितेवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा, असा एक प्रश्न बोर्डाच्या परिक्षेत असतो, त्या प्रश्नाची तयारी आत्ता सहजपणे झाली.” सर्वांनी कविता म्हणतच माझा तास संपला. आम्ही मुख्याध्यापकांच्या कार्यालयात पोहोचलो.

मी घेतलेल्या पाठावर तेलंग सर बेहद्द खूष झाले होते. म्हणूनच त्यांनी नवयुग विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी दोन्ही सत्रात माझे दोन कार्यक्रम निश्चित केले. ठरलेल्या दिवशी सकाळच्या पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी माझा शालेय ‘ओंकार काव्य दर्शन’ कार्यक्रम सादर करायला सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी मी हजर झालो. सर्व विद्यार्थी रांगेत उभे राहिले, सर्व शिक्षक आले. तेलंग सर माझ्यासह शिक्षकांबरोबर उभे राहिले. पी.टी.च्या शिक्षकांनी दिलेल्या ‘दक्ष…आरम’ या ऑर्डर ऐकून मी आश्चर्य चकित झालो. नवयुग विद्यालय ही संघाची शाळा, संघाची शिस्त आणि संघ शाखेच्या ऑर्डर इथे दिल्या जातात, हे रानडे सरांनी सागितलेले मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. प्रार्थना संपली, उपविश ऑर्डर मिळताच सर्व विद्यार्थी शांततेने खाली बसले, शिक्षक… आम्ही खुर्च्यांवर बसलो. बाजूला टेबलवर हार्मोनियम, दोन माईकची व्यवस्था केलेली होती. तेलंग सरांनी माझा परिचय करून दिला आणि मी कार्यक्रमासाठी उभा राहिलो.

पाचवी ते सातवी बालभारतीच्या पाठ्यक्रमातील व पाठ्येतर कविता पेटीच्या साथीने कांही कविता गायन करून तर कांही कविता साभिनय सादर करीत… कवितेची व्याख्या समजावून सांगणारा माझा शालेय कार्यक्रम जबरदस्त झाला.

दुपारच्या सत्रातील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पाठ्यक्रमातील कवितांचा माझा कार्यक्रम दुपारच्या मोठ्या सुट्टीनंतर शाळा सुटेपर्यंत झाला.

पहिल्या सत्रातील माझा कार्यक्रम आवडल्याने दुसऱ्या सत्रातील कार्यक्रमाला तेलंग सरांनी इतर शाळांमधील शिक्षकांना सुद्धा निमंत्रित केले होते. सरांनी हा कार्यक्रम रेकॉर्ड करून घेतला. असे नवयुग विद्यालयातील माझे दोन्ही शालेय कार्यक्रम तूफान झाले. मानधनसुद्धा बऱ्यापैकी मिळाले. एकंदरीत ‘ओंकार काव्य दर्शन’ या शालेय कार्यक्रमाने नागपुरातील माझ्या कार्यक्रमांची सुरुवात खूपच चांगली झाली.

प्रा विसूभाऊ बापट

– लेखन : प्रा विसुभाऊ बापट
(सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments