आबा डोंगरे, अंबादास देवळे, ह्या नागपुरातील दै. लोकमतच्या संपादकीय विभागात कार्यरत असलेल्या दोन दिग्गज व्यक्ती होत्या. दै.लोकमतचे मालक जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या उपस्थितीत लोकमतच्या संपादकीय विभागातील सर्व रसिकांसाठी “कुटुंब रंगलंय काव्यात” हा माझा एकपात्री कार्यक्रम आयोजित केला. तेथील दर्दी रसिकांची मिळणारी दाद कार्यक्रम खोलवर गेली. स्वतः बाबूजींची दादही मिळतच होती, त्यामुळे माझा तो प्रयोग सुद्धा तुफान रंगला.
बाबूजींच्या सांगण्यानुसार दुसऱ्या दिवशीच्या लोकमत मध्ये माझ्या एकपात्री कार्यक्रमाची भरभरून स्तुती लिहून आली. इतकेच नव्हे तर दै. तरूण भारत, दै. हितवाद (इंग्रजी वृत्तपत्र) या दोन्ही दैनिकांचे प्रतिनिधी लोकमतच्या माझ्या प्रयोगाला हजर असल्यामुळे त्या दोन्ही वृत्तपत्रानी सुद्धा माझ्या एकपात्री कार्यक्रमाला भरपूर प्रसिद्धी दिली. आणि नागपुर मधील सर्व पत्रकार मित्रांनी व वृत्तपत्रांतून झालेली प्रसिद्धी संपूर्ण विदर्भात सर्वदूर पोहोचल्याने विदर्भातील कार्यक्रम सहजपणे ठरत गेले.
शालेय ‘ओंकार काव्य दर्शन’ आणि ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या एकपात्री कार्यक्रमांच्या बातम्या गझलसम्राट सुरेश भट (दादा) यांच्या पर्यंत पोहोचल्या होत्या. नागपूर आकाशवाणीचा एक लेखक व कवी बळवंत लामकाणे (नायक) यांनी माझा लोकमत मधील कार्यक्रम अनुभवला होता, आणि धन्तोलीतील रामकृष्ण मठाजवळच्या सुरेश भटांच्या घराजवळच ते रहात होते. सुरेश भटांना भेटण्याची माझी इच्छा बळवंतरावांना सांगितली आणि त्यांनी मला भटांचा नंबर दिला. एक दिवस मी दादांना फोन करून माझे नाव सांगताच दादा समोरून बोलले, “बापट, भटांच्या घरी कधी येताय ? तुमच्या बद्दल वृत्तपत्रात खूप चांगलं वाचलंय., केंव्हाही घरी या.” असं दोन तीन वेळेला घडलं. दादांना येतो म्हणून सांगितलं आणि ऐनवेळी शालेय कार्यक्रमासाठी बोलावणे आल्याने मी त्यांच्याकडे जाऊ शकलो नाही.
एक उत्कृष्ठ बासरीवादक व काटोल येथील डी.एड्. कॉलेजचे अध्यापक देशमुख सर यांच्या डी.एड्. कॉलेजवर भावी शिक्षकांसाठी कार्यक्रम करून मी दुपारच्या वेळेस नागपूरला परतलो. प्रचंड भूक लागली असल्याने सदर भागातील हॉटेल मध्ये थोडे खाऊन गोपाळ कृष्ण लॉजवर जायचे, असे ठरवून मी सदरलाच उतरलो. एका हॉटेल मध्ये जावून फ्रेश झालो, आणि खाण्याची ऑर्डर देणार तेव्हढ्यात माझ्या पाठीवर एकाने थाप दे मला सांगितले, “समोर दादा बसले आहेत व ते तुम्हाला बोलावतात.!” मी क्षणाचाही विलंब न करता दादांच्या जवळ गेलो.
दादांनी खुणेनेच मला समोरच्या खुर्ची वर बसायला सांगितले व मला म्हणाले, “बाबासाहेब, तुम्ही मला दोन तीन वेळा येतो म्हणून फोन केलात आणि आले नाहीत. आम्ही वाट पाहिली. आता कधी येणार ? ते सांगा. आता जर आला नाहीत तर परत माझ्याकडे यायचे नाही.!”
तेंव्हा मी आज रात्री आठ वाजता नक्की येतो, असे सांगितले, दादांनी मला खाऊ घातले, आणि मी त्यांचा निरोप घेतला.
त्यादिवशी रात्री बरोब्बर आठ वाजता मी दादांच्या घरी पोहोचलो आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. तो दिवस माझ्या कायमचा लक्षात राहील कारण त्यादिवशी गझलसम्राट सुरेश भट यांची माझी पहिली भेट झाली. त्यानंतर बऱ्याचवेळा मी त्यांच्या घरी गेलो. दादांची भेट माझ्यासाठी एक पर्वणीच असायची.! सुंदर हस्ताक्षर असलेले ताराचंद चव्हाण दादांचे लेखनिक होते. बंडू चक्रधर, प्रदीप निफाडकर, म.भा. चव्हाण, दीपक करंदीकर, या दादांच्या पठ्यांची भेट दादांनी करून दिली होती. शिवाय ए.के. शेख, खावर, सर्वोत्तम केतकर, संगिता बर्वे, या गझलकारांचे पत्ते देऊन दादांनी मला त्यांना भेटायलाही सांगितले होते.
असेच एक दिवस मी दादांची एक गझल त्यांच्या अक्षरात लिहून मागितली. दादांनी ती माझ्या वहीत लिहूनही दिली. त्या गझलेचे कांही शेर असे आहेत…
“शेवटी वेदमंत्रांनी अन्याय एवढा केला,
मशहूर ज्ञानया झाला गोठ्यातच जगला हेला ।।
ही कुण्या राजधानीची कापती अजुन खिंडारे,
का कुणी कलंदर येथे गुणगुणत सुळावर गेला।।
घासते घरोघरी भांडी स्वप्नांची राजकुमारी,
वणवणतो पोटासाठी हा राजपुत्र अलबेला।।
पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना,
कोणीच विचारित नाही माणूस कोणता मेला।।

– लेखन : प्रा विसुभाऊ बापट.
(सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात, मुंबई)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800