प्राचार्य राम शेवाळकर यांच्या लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथील कार्यक्रमाने यवतमाळ जिल्ह्यातील माझ्या कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. त्या कार्यक्रमांना मिळालेल्या प्रसिद्धी मुळेच ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या माझ्या एकपात्रीचे दोन प्रयोग प्रा. अशोक राणा यांनी त्यांच्या यवतमाळ शहरात आयोजित केले होते.
प्रा.राणा यांच्या महाविद्यालयातील पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर यवतमाळ शहरातील दर्दी रसिकांना निमंत्रित करून त्यांनी दुसरा प्रयोग “वा.ना.देशपांडे सभागृहात” आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला श्री. दीपक देशपांडे यांनी उत्कृष्ठ तबला साथ केली आणि तिथून पुढे यवतमाळ शहरातील प्रत्येक कार्यक्रमाला तेच माझे साथीदार होते. या प्रयोगात ‘मुक्त छंद काव्यप्रकार ‘नागपूरच्या आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ कवी अनील यांनी पहिल्यांदा मराठीत लिहिला,’ असे विधान मी केले होते. दीपकरावांची उत्कृष्ठ तबला साथ आणि मातब्बर यवतमाळकर रसिकांची मिळालेली दाद यामुळे ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ चा तो जाहीर कार्यक्रम अतिशय रंगला.
दुसऱ्या दिवशी सकाळी राणा सरांच्या बरोबर मी देशपांडे सरांच्या घरी चहा नाश्त्याला गेलो. ते कै.वा.ना. देशपांडे यांच्या मुलाचे घर होते. त्यांनी माझ्या कार्यक्रमाची भरपूर स्तुती केली आणि आमचे खास वर्हाडी आदरातिथ्यही चांगले केले. गप्पांच्या ओघात देशपांडे सर मला म्हणाले, “विसुभाऊ, खरेतर ‘मुक्त-छंद’ हा काव्यप्रकार प्रथम माझ्या बाबांनी.. वा. ना. देशपांडेंनी प्रथम लिहिला होता. पण या काव्यप्रकारासाठी कवी अनील यांचेच नांव घेतले जाते. त्याऐवजी कै. ना. वा. देशपांडे यांचे नांव येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत.!” त्यांच्या म्हणण्याला होकार देवून आम्ही तिथून निघालो. देशपांडे सरांनी दाखविलेल्या कवितांच्या पुराव्यानुसार वा. ना. देशपांडेच ‘मुक्त छंदात’ कविता लिहिणारे पहिले कवी होते, पण तें फक्त यवतमाळ जिल्ह्यात प्रसिद्ध होते. या उलट आ.रा. देशपांडे यांना ‘मुक्त-छंद-छंद आणि दशपदी’ हे दोन काव्यप्रकार लिहिणारे कवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने मान्यता दिली असल्याने ते काव्यप्रकार लिहिणारे पहिले कवी म्हणूनच अनिलांचा उल्लेख करणे मला क्रमप्राप्त होते. म्हणून मी माझ्या कार्यक्रमात आजही तसाच उल्लेख करतो.
त्या कार्यक्रमानंतर मित्र राणा सरांनी माझ्या कविता संकलनासाठी मदत व्हावी म्हणून एक ‘कवी गोष्टींचा’ कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील शंकर बढे, पत्रकार सुरेश गाजरे, सुभाष परोपटे ( दाभा-पहूर) , नीलकृष्ण देशपांडे (पोहंडूळ) , डॉ. मिर्झा रफी अहमद बेग (नेरपरसोपंत), सौ. आशा दिवाण, शिवाय राऊत(बाभुळगाव), आमदार कवी मानधनाची, त्यांचे पीए गजेश तोंडरे (आमदारांच्या सर्व आश्रम-शाळा सांभाळणारा कवी) या सर्व कवींच्या बरोबर माझी घट्ट मैत्री झाली आणि त्यांच्या कविता मला माझ्या वहीत संकलित करता आल्या.
त्यानंतर मित्र सुभाष परोपटेंनी त्यांच्या दाभा-पहूर गावात ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ चा एक प्रयोग आणि सर्वांचे गेट टुगेदर आयोजित केले होते. तो कार्यक्रम चालू असतानाच, अमरावती शहरात नाटक करीत असताना डॉ. काशिनाथ घाणेकर स्टेजवर कोसळून स्वर्गवासी झाल्याची दुःखद बातमी आली. सर्वांनाच अतिशय दुःख झाले. आम्ही सर्वांनी डॉक्टरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून चालू असलेला कार्यक्रम तिथेच थांबवला.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी सर्वांचा निरोप घेऊन पुढच्या कार्यक्रमांसाठी नागपूरला निघालो.

– लेखन : प्रा विसुभाऊ बापट. मुंबई
(सादरकर्ते-‘कुटुंब रंगलंय काव्यात’)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800