Tuesday, September 16, 2025
Homeसाहित्य'कुटुंब रंगलंय काव्यात' ( २१ )

‘कुटुंब रंगलंय काव्यात’ ( २१ )

माझे यवतमाळचे तबलावादक दीपक देशपांडे अवधूत वाडीत राहतात. त्यांच्या शेजारीच सहस्रबुद्धे सरांचे मोठ्ठं घर अंगण आहे. सर एका शाळेचे मुख्याध्यापक असल्याने त्यांच्या शाळेतील व कांही इतर शाळांतील कांही कार्यक्रम ठरवूनच मी नागपूरला पोहोचलो होतो. कोराडी विद्युत प्रकल्पाच्या निवासी वसाहतीत ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ चा एक प्रयोग, तिथल्या शाळेत आणि कामठी, कन्हान, या गावातील शाळांमध्ये शालेय कार्यक्रम सादर करून पुढील कार्यक्रमांसाठी पुन्हा यवतमाळ शहरात परतलो. एसटी स्टँड समोरच्या राम निवास लॉजवर मुक्काम व शेजारीच असलेल्या वृंदावन हॉटेल मध्ये चहा, नाश्ता, भोजनाची व्यवस्था अशा लॉजवर मी उतरलो. सहस्रबुद्धे सरांनी ठरविलेल्या शालेय कार्यक्रमांबरोबर बापूजी अणे विद्यालयातही दोन्ही सत्रात माझे शालेय कार्यक्रम ठरलेले होते. तेथील कार्यक्रम झाल्यानंतर बाजूलाच राहणाऱ्या अॅड. भाऊसाहेब पाटणकर यांना मी भेटायला जायचे ठरविले होते.

बापूजी अणे विद्यालयातील दोन्ही कार्यक्रम फारच चांगले झाले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, व सर्व कर्मचारी यांना माझा ‘ओंकार काव्य दर्शन’ कार्यक्रम खूपच आवडल्या कारणाने मला मानधनही चांगले मिळाले. शाळेतील कार्यक्रमाचे प्रशस्तीपत्र घेऊन मी ठरविल्याप्रमाणे टिळक वाडीतील भाऊसाहेबांच्या घरी पोहोचलो.

समोरचं अंगण पार करून मी त्यांच्या दाराशी जाऊन म्हणालो, “भाऊसाहेब आहेत कां घरात ? “तेंव्हा गोरंपान, उंच, धिप्पाड, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, अशा भाऊसाहेबांनी पुढं येऊन माझं हसत हसत स्वागत केलं. मी माझं नांव सांगितलं, थोडक्यात परिचय आणि भेटायचं प्रयोजन सांगताच मला बाहेरच्या खोलीत बसायला सांगत ते मला म्हणाले,  “विसुभाऊ, थोडावेळ बसा. आत आमच्या दाते कॉलेजचे प्राचार्य कुंटे सर आले आहेत. मी त्या कॉलेजचा ट्रस्टी आहे. त्यांच्या बरोबरचे काम आटोपतो आणि मग आपण बोलूया.!” भाऊसाहेब आतल्या बैठकीच्या खोलीत निघून गेले. एका वयस्कर बाईंनी मला पाणी व नंतर चहा आणून दिला, तो घेऊन आतली मिटिंग संपण्याची वाट पहात मी बाहेरच बसून राहिलो.

रंगात आलेल्या आतल्या गप्पा मला ऐकायला येत होत्या. मधेच भाऊसाहेबांच्या मोठ्या हसण्याचा आवाजही येत होता. मी माझ्या जवळील कवितांची वही चाळत बसलो होतो. जवळ जवळ तीन तासांच्या प्रतिक्षे नंतर आतून कुंटे सरांचा आवाज आला, “भाऊसाहेब, तुम्हाला भेटायला आलेले बाहेर बसले आहेत. त्यांना आत बोलवा, मी निघतो आता.!”
‌ त्यांनी बोलावताच मी आत गेलो. दोघांनाही माझा परिचय करून दिला आणि या कुंदेंदु…. ची समश्लोकी ऐकवून कुटुंब रंगलंय काव्यात’ या माझ्या कार्यक्रमाची माहिती दिली….. कुंटे सर निघून गेले आणि आमच्या मराठी शायरी बद्दल गप्पा सुरू झाल्या.

भाऊसाहेब वकील होते, त्यांना शिकारीचा छंद होता. संस्कृत व मराठी भाषेवर प्रचंड प्रेम आणि प्रभुत्व असणाऱ्या भाऊसाहेब पाटणकरांनी शायरी हा काव्यप्रकार मराठी मध्ये आणला तो संस्कृत मधून.! त्या रात्री भाऊसाहेब शायरी बद्दल ‌दिलखुलास बोलले.. शायरीची व्याख्या व त्यांनी निरनिराळ्या विषयांवर लिहिलेले शेर आणि गप्पांमध्ये ‌पहाटेचे चार कधी वाजले ते दोघांनाही समजले नाही.
‌दोस्तहो व मैफिल ही त्याची दोन पुस्तके त्यांनी मला दिली ‌आणि मी त्यांचा निरोप घेतला.

त्यानंतर बऱ्याचदा मी त्यांच्या कडे जाऊन आलो पण शायरी साठी भाऊसाहेबांच्या घरी रात्रभर झालेल्या गप्पा मी कधीही‌ विसरू शकणार नाही. त्यांचे कांही शेर असे आहेत…
‌ ऐंसे नव्हे की शायरी आम्हीच आहे निर्मिली ।
‌ कमलांतरी भ्रमरादिकांनी आधीच आहे निर्मिली ।।
‌ पाठ पहिल्या शायरीचे त्यांनी खरे आम्हा दिले ।
‌ फक्त त्यांच्या गुंजनाला शब्द मी माझे दिले ।।

प्रा विसूभाऊ बापट

– लेखन : विसुभाऊ बापट, मुंबई
‌(सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात’)
‌ – संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments