Sunday, July 6, 2025
Homeसाहित्य'कुटुंब रंगलंय काव्यात' ( २२ )

‘कुटुंब रंगलंय काव्यात’ ( २२ )

नागपूरच्या वृत्तपत्रातील प्रसिद्धी पाहून भंडारा शहरातील म.गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपालांनी त्यांच्या रसिक वाचकांसाठी ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा माझा एकपात्री कार्यक्रम आयोजित केला. तो भंडारा शहरात सादर झालेला माझा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर श्रीमती माधुरी सुतोने यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यासाठी माझा ‘ओंकार काव्य दर्शन’ हा शालेय कार्यक्रम आयोजित केला.

सुतोने मॅडमना आवडलेली ‘रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला’ ही कविता मी त्यांना लिहून दिली. त्यांनी शाळेच्या स्नेहसंमेलनात याच कवितेवर मुलांचा वैशिष्ट्यपूर्ण ‘टॅब्लो डान्स’ सादर केला होता. सुतोने मॅडम यांच्या सहकार्याने भंडारा शहरातील बहुतेक शाळांमध्ये मी माझे शालेय कार्यक्रम सादर केले. म.गांधी वाचनालयात सादर केलेला एकपात्री प्रयोग व नंतर शाळांमधील माझे शालेय कार्यक्रम यांच्या प्रसिद्धीमुळे हिरामण लांजे या कवी, झाडी बोली भाषांचा अभ्यासक व रसिक मित्राने ते काम करीत असलेल्या ‘जवाहर नगर आयुध निर्माणीच्या वसाहतीतील रसिकांसाठी माझा एकपात्री कार्यक्रम आयोजित केला होता.

तुमसर, भंडारा रोड, पवनी, लाखांदूर, देवरी, लाखनी, साकोली, या सर्व गावातील शाळांमध्ये माझे दोन्ही कार्यक्रम सादर केले. मार्तंड नावाचा माझा एक नकलाकार मित्र देवरीत नोकरी करत होता. देवरी परिसरात त्याचे नकलांचे कार्यक्रम गाजले होते. त्याच्या सहकार्याने, आदिवासी देवरी‌ विभागांतील आश्रम शाळांतून मी माझे शालेय कार्यक्रम विनामूल्य सादर करून सडक अर्जुनीला पोहोचलो. तिथे दुपारी शालेय कार्यक्रम व रात्री शिक्षक पालकांसाठी मी माझा एकपात्री प्रयोग सादर केला.

त्या प्रयोगाला मोरगाव-अर्जुनीचे सरपंच आले होते, त्यांनी त्यांच्या गावातील रसिक वर्गासाठी माझा एकपात्री प्रयोग सादर करायला मला दुसऱ्याच दिवशी निमंत्रित केले. रात्री नऊ वाजता कार्यक्रम सुरू करायचा म्हणून सायंकाळी सातच्या सुमारास मी सरपंचांच्या वाड्यावर पोहोचलो. ते घरी नव्हते, गोंदियाला गेले होते. त्यांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजन केलेलेच नव्हते. मोरगाव-अर्जुनीचा असा एक वेगळाच अनुभव गाठीशी बांधून मी भंडारा मुक्कामी परतलो. ठरवून रद्द झालेला हा एकमेव प्रयोग !

वाडा गावात भेटलेल्या प्राचार्य रानडे सरांनी गोंदिया गावातील संघ स्वयंसेवक सुरेश आकांत सरांचा पत्ता दिला असल्याने मी आकांत सरांच्या शाळेत पोहोचलो. गोंदिया शहरातील सर्व शाळांत ‘ओंकार काव्य दर्शन’ हा शालेय कार्यक्रम सादर करण्यासाठी आकांत सरांनीच मला सहकार्य केले. गोंदियात नावाजलेल्या मेडिकल स्टोअर्सचे मालक श्री. मधू व्यवहारे यांच्या बरोबर माझी मैत्री आकांत सरांमुळेच झाली. त्या दोघांनीच माझा एकपात्री कार्यक्रम ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ गोंदियाच्या रसिकांसाठी आयोजित केला होता.

गोंदियाचा तो प्रयोग करून मी सालेकसा गावात पोहोचलो. भंडारा जिल्ह्यातील…आजच्या गोंदिया जिल्ह्यातील शेवटचे तालुक्याचे गाव सालेकसा! त्यानंतर द्रुग गावापासून मध्यप्रदेश सुरू होतो. माझा शालेय कार्यक्रम तिथे सादर करून पुढील कार्यक्रमांसाठी मी रानडे सरांच्या आमगावला गेलो. रानडे सरांनी सांगितलेल्या सर्व शाळांत आणि ज्युनिअर कॉलेज मधील माझे कार्यक्रम यशस्वी झाले. तिथे गोपालदास जयस्वाल नावाच्या हिंदी कवीची‌ भेट झाली. सोनारकाम हाच व्यवसाय असलेले ‘बेदिल’ या टोपणनावाने हिंदीत लिहिलेल्या गोपालदास जयस्वाल यांच्या कविता अतिशय अप्रतीम आहेत, त्याचा कविता संग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे. त्यांनी मला त्यांच्या अक्षरात लिहून दिलेली “विदेशी पर्यटकसे मुलाकात” ही दीर्घ कविता अप्रतीम आहेच शिवाय त्यावेळचे वास्तव रसिकांपर्यंत पोहोचवणारी…. विचार करायला लावणारी आहे.

“कल मैंने देखा‌ एक झीलके किनारे बैठे,
विदेशी पर्यटकको निराश,..
तो पहुंच गया उसके पास … पूछा…
आप क्यूँ है इस तरह उदास? … तो बोला..
‘हिन्दुस्थान एक सोनेकी चिडिया है,
वसुंधरा कां ताज है,
जहाँ सत्य, धर्म, अहिंसाका‌ राज है.’
दरअसल ऐंसा मैंने किताबोंमें पढा था.!”

ही कविता दीर्घ असल्याने इथे देवू शकत नाही.
ज्या रसिकांना ती संपूर्ण पाहिजे असेल त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा.

प्रा विसूभाऊ बापट

– लेखन : विसुभाऊ बापट. मुंबई
(सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments