विदर्भातील ऊन तापायला लागले होते. कडक उन्हाळा नागपूरातही जबरदस्त जाणवू लागला होता. एका दुपारी आबा डोंगरे, अंबादास देवळे, कमलाकर धारप यांच्या बरोबर कवितांवर गप्पा मारत लोकमतच्या संपादकीय विभागात बसलो होतो. तिथे चालू असलेल्या कूलरमुळे बाहेरचा उष्मा अजिबात जाणवत नव्हता. बराच वेळ गप्पा मारताना त्यांच्या कडून अमरावतीतील कांहीं सुप्रसिद्ध व प्रस्थापित कवींचे पत्ते मला मिळाले.
त्यांच्या कविता मला माझ्याकडे संकलित करायच्या होत्या, त्यासाठी मला अमरावतीला जाणे आवश्यक होते. दत्तवाडी व कोंढाळी गावातील शाळेत ठरलेले माझे ‘ओंकार काव्य दर्शन’ शालेय कार्यक्रम करून तसेच पुढे अमरावतीला जायचे ठरवले आणि दुपारी चारच्या सुमारास मी लोकमत कार्यालयातून बाहेर पडलो.
लोकमत चौकातून सीताबर्डीच्या दिशेने उन्हातून चालायला सुरुवात केली आणि कांहीं क्षणातच मला अस्वस्थ वाटायला लागले, तापही भरल्या सारखे वाटू लागले म्हणून मी ऑटोरिक्षा करून महाल परिसरातील महाशब्दे यांचे घर गाठले.
अमर महाशब्दे माझी अवस्था पाहून मला म्हणाला, ‘विसुभाऊ, तुला ऊन लागलं आहे. काळजी करू नकोस, थोड्याच वेळात बरं वाटेल तुला!’ नंतर त्यानी मला कूलरच्या हवेत झोपवलं.वहिनीने कांदा किसून आणला, त्यांचा रस काढून आणला, अमरने तो माझ्या तळपाय, तळहात आणि डोक्यावर लावून चोळला. कसल्याशा होमिओपॅथीच्या गोळ्या खायला देवून झोपवलं, आणि तासाभरात मी एकदम ठणठणीत झालो.
मी त्यांच्या घरी कुठून कसा आलो ते सांगताच अमर म्हणाला, “नागपूरका आप’ ने घी देखा, बडगा नहीं देखा !” तू कूलरच्या थंड हवेतून एकदम उन्हात आलास त्यामुळे तुला ऊन लागले. तू लगेच इथं आलास, लगेच उपचार झाले म्हणून लगेच बराही झालास, अन्यथा हा ‘सनस्ट्रोक’ खूप भयानक असतो. आता लक्षात ठेव उन्हात बाहेर पडताना कांदा बरोबर ठेव, गरम चहा पिऊन व गमछाने कान बांधून बाहेर पड. कूलरच्या थंड हवेतून बाहेर पडल्यावर प्रथम थोडा वेळ बाहेरच्या सावलीत उभा रहा. स्वतःच्या शरीराचे तापमान बाहेरच्या ऊष्णते बरोबर थोडे मिळते जुळते झाले की मग उन्हात जा. उन्हात फिरताना दही, कलाकंद खा. उष्माघात होणार नाही.” या सर्व सूचना पाळण्याचा शब्द देवून मी अमरचा निरोप घेऊन लॉजवर परतलो.
दत्तवाडी, कोंढाळी (नागपूर), तळेगाव, आर्वी, आष्टी (वर्धा) येथील विद्यालयात माझे शालेय कार्यक्रम सादर करून एका संध्याकाळी मी अमरावतीला पोहोचलो. एका लॉजवरची कॉट बुक केली, फ्रेश झालो आणि थोडी पोटपूजा झाली. रात्रीचे नऊच वाजलेले असल्याने केचेसरांच्या घराचा पत्ता मिळतो कां ते पाहण्यासाठी मी राठी नगरला पोहोचलो.
सुप्रसिद्ध असल्याने केचे सरांचा पत्ता अगदी सहजपणे मिळाला, त्यांचे घर म्हणजे एक बंगलाच होता. फाटका जवळ जाऊन ‘केचे सर इथेच राहतात कां ?’ असे विचारताच प्रथम सरांचा मुलगा समोर आला, ‘मी कवितेसाठी सरांना भेटायला पत्ता हुडकत आलो आहे, आत्ता त्रास देत नाही, उद्या सकाळी परत येतो !’ असे बोलतच होतो तेवढ्यात ‘माझ्या कवितेचा रसिक आलाय का ? ये आत ये !’ असे म्हणत सर स्वतः बाहेर आले, आणि मी त्यांच्या बंगल्यात गेलो.
सर मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले. कपाटात, कपाटावर, खोलीच्या मध्यावरील कॉटवर
सगळीकडेच कागद, वह्या, पुस्तके ठेवलेली होती. सरांनी पहिल्यांदा कॉटवरील पुस्तके कपाटात ठेवली, कॉटच्या दोन्ही बाजूला दोन लोड व मध्यात एक मोठा पाट ठेवला. एका बाजूला मला बसायला सांगितले, कांहीं वह्या, कागद दुसऱ्या बाजूला आणून ठेवले आणि सर आत निघून गेले.
एक मोठं पातेले, त्याच्या झाकणावर दोन स्टीलची भांडी, आणि बाजूला ओघराळे या सर्वांसह सर खोलीत आले. पाटावर पातेले ठेवून सर त्यांच्या जागेवर लोडाला टेकून बसत मला म्हणाले, “हे घरच्या आंब्याचं पन्हं आहे, त्याचा आणि कवितांचा आस्वाद घेत आपण गप्पा मारायच्या.!”
‘माझ्यासमोर सागर,
त्यांनीं आकाश टेकले,
झाली असती त्रिकोणी,
माझे घर आड आले।’
आपल्या कवितेच्या या चार ओळी ऐकवून प्रा. मधुकर केचे सरांनी आमच्या काव्य गप्पांना सुरुवात केली.
“मी स्वतः कवी नाही, पण महाराष्ट्रातील कवींच्या कविता संकलित करून मी त्या त्या कवींच्या नामोल्लेखासह ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या माझ्या काव्य नाट्यानुभवच्या एकपात्री कार्यक्रमात सादर करतो.” ही गोष्ट सरांना विशेष भावली म्हणूनच त्या रात्री केचेसरांनी आपल्या कविता भरभरून ऐकवल्या आणि मला दिल्या सुद्धा ! पहाटेच्या सुमारास पन्हं संपलं पण सरांच्या निरनिराळ्या विषयांवरच्या, कांही छंद-वृत्त बद्ध कवितांचा ओघ चालूच होता.
“लॉजवर कां उतरलास ? तडक माझ्या घरी आला असतास तर फार बरे वाटले असते. खास वर्हाडी पाहूणचार आम्ही नक्कीच केला असता !” असे म्हणत सरांनी माझ्या वहीत, स्वतःच्या अक्षरात आपली एक कविता लिहून दिली आणि मी त्यांचा निरोप घेऊन लॉजकडे निघालो. प्रा. मधुकर केचे सरांनी दिलेली कविता अशी….
|| माय-मराठी ||
करी चेटूक मराठी उभी चंद्रभागे काठी
कसा बाई हिच्यासंगे वेडा झाला जगजेठी
बिघडली हिच्यासंगे दासी नामयाची जनी
सोडोनिया कामधंदा लागे हिच्याच भजनी
खुळे केले पुंडलिका रातंदिन चेपे पाय
वीट फेकून रोखले रुख्मावर रुख्मा माय
हिचे गावंढळ पोरं बोली बोलून बोबडी
ओवीमाजी गोलू पाहे गीता आभाळाएवढी
हिने नागविला तुका हिने गाजविला चोखा
वेदनेला करुनिया रेडा बोलविला मुका
क्रमशः

– लेखन : विसुभाऊ बापट, मुंबई
(सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800