अमरावती शहरातील श्री.मनोहर कवीश्वर हे एक प्रस्थापित व सुप्रसिद्ध कवी होते. कांहीं दिवस मुंबईत राहून अमरावतीला परतलेल्या कवीश्वर सरांची एक कविता त्यावेळी खूप गाजत होती.
‘माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा |
भोगी म्हणुनी, उपहासा मी, योगी कर्माचा ||’
स्वतः मा. सुधीर फडके यांनी स्वरबद्ध करून गायलेली कविता लिहिणाऱ्या कवीश्वरांना त्यांच्या ‘नमुना’ बिल्डिंग मध्ये मी भेटायला गेलो.
त्यांच्या कवितांचा रसिक म्हणून सरांनी माझे खास वर्हाडी पद्धतीने स्वागत केले. प्रमाण मराठी बोलीत कविता लिहिणारे कवीश्वर सर वर्हाडी बोलीतही चांगल्याच कविता लिहीत होते. संगिताची उत्तम जाण असल्याने त्यांच्या कविता चांगल्या चाली घेऊनच जन्माला येत होत्या. त्या कविता गाऊन सादर करण्याचा सरांचा एक कार्यक्रम ते विदर्भ परिसरातील रसिकांसाठी सादर करीत होते. त्यांच्या कांहीं कविता मी माझ्या “कुटुंब रंगलंय काव्यात’ कार्यक्रमात सादर करण्यासाठी संकलित केल्या आणि त्यांचा निरोप घेतला.
अमरावतीच्या रसिकांसाठी वनिता समाजाच्या वतीने त्यांच्या हॉलमध्ये माझा एकपात्री कार्यक्रम संपन्न झाला. त्या प्रयोगाला तबला साथ करणारा योगेश ठाकरे अचलपूर गावात राहणारा, त्याच्या आग्रहामुळे मी त्याच्याबरोबर अचलपूरला गेलो. त्याचे वडील तेथील विदर्भ मिलमध्ये नोकरीला होते. त्यांच्या कॉर्टरमध्ये माझा एकपात्री प्रयोग मी सादर केला. त्या कार्यक्रमाला निमंत्रित केलेल्या राजा धर्माधिकारी, राजा तारी, अनिल पाटील, गौतम गुळघे या वर्हाडी कविता लिहिणाऱ्या कवींशी माझी चांगली मैत्री झाली. त्यांच्या कविता मी माझ्याकडे संकलित केल्या, आणि त्यांच्या सहकार्याने अचलपूर, परतवाडा व मेळघाट परिसरातील सर्व शाळांत माझे ‘ओंकार काव्य दर्शन’ हे शालेय कार्यक्रम मी सादर केले.
‘देवून देतो जीव, आता लय झाली थट्टा |
काहून मले देवानं, केला असा गिट्टा ||’
जबरदस्त कल्पना-विलास असलेली धर्माधिकारी यांची गाजलेली हास्य कविता तर त्यांनी मला लिहून दिलीच शिवाय ‘शेक लागला बुढ्याले’, ‘हनुमानाची नौकरी’, व ‘लाहोरले आता बस न्हाई रनगाडा धाडा लागते’ या राजकीय व्यंग कविता त्यांनी मला माझ्या एकपात्री कार्यक्रमात सादर करण्यासाठी लिहून दिल्या, हा त्यांचा मोठेपणाच म्हणावा लागेल. आजही या कविता मी माझ्या कार्यक्रमात त्यांच्या नावाने सादर करतो आणि रसिक त्यांना प्रचंड दाद देतात.
‘पिंट्याचे बाबा नाही आले अजून’, ‘माझ्या नवऱ्यानं ढोसलिया दारू’ या गौतम गुळघेंच्या कविता त्यावेळी मी लिहून घेतल्या. राजा तारी यांनी लिहिलेली विडंबन कविता गदिमांच्या ‘ओटीत घातली मुलगी विहीणबाई’ या कवितेवर लिहिलेली असून वाचकांना ती नक्कीच आवडेल.
‘झोपेत चावते मुलगी विहीणबाई,|
सांभाळून राहणे हीच विनवणी पायी ||
लाडकी लेक ही आमुची जरिहो असली,
झोपेत आम्हाला बऱ्याचदा ती डसली,
परि खरे सांगतो अपाय कांहीं नाही,
सांभाळून राहणे हीच विनवणी पायी..||. या व अशा चांगल्या चांगल्या कवितांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा माझा जागतिक एकपात्री कार्यक्रम आपण आयोजित कराल, हीच अपेक्षा.!

– लेखन : विसुभाऊ बापट, मुंबई
(सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.