“येन्न रे बापू, खेन्न रे गोया.
आता काहुन म्हन्ते, पुत्ला डोया ||”
ही वर्हाडी कविता वर्ध्याच्या प्राचार्य दे.गं. सोटे यांनी लिहिलेली असून त्यांनी ‘वर्हाडी इनटू मराठी’ असा एक शब्द-कोश तयार केला आहे. वर्हाडी कविता सादर करण्यासाठी त्या शब्द-कोशाचा निश्चितपणे उपयोग होईल…..अशी माहिती विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथून घेऊन मी सोटे सरांची भेट घेण्यासाठी वर्धा शहरातील त्यांच्या ‘स्वावलंबी अध्यापक विद्यालयात’ पोहोचलो.
माझ्या दोन्ही कार्यक्रमांची वृत्तपत्र प्रसिद्धी सरांपर्यंत पोहोचली असल्याने त्यांनी त्यांच्या प्राचार्य केबिनमध्ये माझे स्वागत केले. मी माझी ओळख करून दिली. सोटे सरांच्या अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मी माझा ‘ओंकार काव्य दर्शन’ हा शालेय कार्यक्रम सादरही केला. शेजारीच असलेल्या ‘स्वावलंबी अध्यापक महाविद्यालयाचे ‘प्राचार्य विद्याधर उमाठे त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. सर्वांनी चांगला प्रतिसाद दिल्याने तो प्रयोग छानच रंगला आणि दुसऱ्याच दिवशी ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा माझा एकपात्री कार्यक्रम सादर करण्यासाठी उमाठे सरांनी त्यांच्या अध्यापक महाविद्यालयात निमंत्रित केले. माझ्या कार्यक्रमांमुळे त्यासोबतच माझी चांगली मैत्री झाली. त्यारात्री त्यांच्या कविता घेण्यासाठी सोटे सरांच्या घरी बसायचे ठरवले.
भगतसिंग चौकातील सोटे सरांच्या घरी मी रात्री नऊ वाजता पोहोचलो तेंव्हा उमाठे सरांसह अनेक काव्य रसिक तिथे जमले होते. उमाठे सरांनी माझा सर्वांशी परिचय करून दिला आणि सरस्वती स्तोत्राची मराठीतील समश्लोकी ऐकवून मी मैफिल सुरू केली. जमलेली सर्वच मंडळी अतिशय रसिक होती. उमाठे सरांनी त्यांच्या संकलनातील कांहीं कविता ऐकवल्या व शब्दकोश तयार करण्यासाठी सोटे सरांनी घेतलेल्या मेहनती बद्दलही सांगितले. कांही वर्हाडी शब्द नागपूर परिसरात कसे बोलले जातात, त्यावर हिंदी भाषेचा प्रभाव कसा असतो, तेच शब्द अकोला, अमरावती परिसरात कसे-कसे बोलले जातात, अस्सल वर्हाडी म्हणी, वाक्प्रचार व त्यांचे अर्थ याबद्दलची सविस्तर माहिती आम्हाला सोटे सरांनी सांगितली… व मला एक शब्द-कोश भेट दिला. “काहून गा गुलाब पटकन फिरला, काय सांगू पाटील तमाखू सरला..” ही कविता सोटे सरांनी ऐकवली मला लिहूनही दिली आणि त्या मैफिलीची सांगता झाली.
वर्हाडी बोलीत कविता लिहिणारे पहिले कवी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्ह्याचे प्रा. पांडुरंग श्रावण गोरे असले तरी वर्हाडी कविता विदर्भात रुजवणारे कवी प्राचार्य दे.गं.सोटेच आहेत, कारण आपल्या वर्हाडी कविता सादरीकरणाचे सोटे सरांचे कार्यक्रम संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध होते. सोटे आणि उमाठे सरांच्या सहकार्याने वर्धा शहर व जिल्ह्यातील कांही विद्यालयातील कार्यक्रम मला मिळाले. याच दरम्यानच्या काळात प्रा. विश्वनाथ कावळे, प्रा. सुनिता कावळे, रामदास कुहिटे, भगवान ठग, सतीश पांडे इत्यादि कवी, मधू दीक्षित, वीणा दीक्षित या कलाकारांच्या बरोबर माझे मैत्रीचे संबंध निर्माण झाले.
जास्तीत जास्त दिवाळी अंकात स्वतःच्या कविता प्रकाशित करण्याचे रेकॉर्ड करणाऱ्या कवी भगवान ठग याला मराठीतील चांगल्या कविता इंग्रजीत भाषांतर करून त्यांचे कवितासंग्रह (प्रसंगी पदरमोड करून) छापण्याचा छंद होता.
रामदास कुहिटे हा सुद्धा असाच वल्ली कवी होता. त्याने मला लिहून दिलेली एक कविता वाचकांसाठी…
“गीता कुणास सांगू, अर्जून आज नाही,
घडतात रोज युद्धे, पण कृष्ण आज नाही.|
अबलेस लूटणारे, ते वीर पाहिले मी,
सीतेस शोधणारा, हनुमान आज नाही.||”
ठग आणि कुहिटे हे दोघे असे वल्ली कवी होते की त्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली वर्धा शहरातील कवींसाठी स्मशानभूमीत कवी संमेलन घेऊन ते यशस्वी केले होते.
क्रमशः

– लेखन : विसुभाऊ बापट. मुंबई
(सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.