Friday, November 22, 2024
Homeसाहित्य'कुटुंब रंगलंय काव्यात' ( ३१ )

‘कुटुंब रंगलंय काव्यात’ ( ३१ )

पूर्वनियोजित कार्यक्रम करून ठरल्याप्रमाणे मी आणि सुरेश देशपांडे आम्हीं दोघे अहेरीला पोहोचलो. मा. धर्मरावबाबा अत्राम हे आदिवासी माडिया व गोंड संस्थानचे राजे, आणि त्यांचे संस्थानही अहेरीलाच होते. पत्रकार असल्याने त्यांची सुरेश बरोबर मैत्री होती म्हणून आम्ही दोघे राजांच्या वाड्यावरच गेलो.

सुरेशने माझा त्यांच्या बरोबर परिचय करून दिला. चहा-पाणी गप्पा झाल्यावर माझे ‘ओंकार काव्य दर्शन’ शालेय कार्यक्रम राजेंनी त्यांच्या शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाळेत आयोजित करावेत, ही इच्छा धर्मरावबाबांना सुरेशने बोलून दाखवली आणि लगेच त्यांनी होकारही दिला. संपूर्ण दिवस त्यांच्या शाळांमध्ये जाऊन आम्ही मुख्याध्यापकांना भेटलो व माझ्या कार्यक्रमाच्या तारखा ठरवल्या.

तत्पूर्वी माझ्या अहेरीतील एकपात्री कार्यक्रमाच्या आयोजकांना आम्ही पोहोचल्याचे सांगितलेच होते.! त्यांच्या विश्राम गृहात आमची राहण्याची व्यवस्था अगदी चोख केली होती. संध्याकाळी आम्ही तेथे पोहोचलो.
अहेरी गावात व परिसरात प्राचार्य सरांनी माझ्या एकपात्री ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ कार्यक्रमाची जोरदार प्रसिद्धी केली होती. आम्ही कॉलेजच्या हॉलवर पोहोचलो तेंव्हा रसिकांनी तोबा गर्दी केली होती. स्टेजवरील सर्व व्यवस्था अगदी चोख होती. प्राचार्य सरांनी आमचे स्वागत केले आणि टाळ्यांच्या कडकडाटात मी स्टेजवर गेलो.

अहेरी सारख्या आदिवासी गावात मराठी कवितेवर प्रेम करणाऱ्या रसिकांनी हॉल तुडुंब भरला होता. श्री सरस्वतीच्या मूर्तीची पूजा व दीपप्रज्वलन झाल्यावर सरांनी प्रथम माझा परिचय करून दिला आणि शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानधनाचे पाकीट देऊन सत्कारही केला. प्रास्ताविकात सर्व रसिकांचे स्वागत करून सरांनी सर्व रसिक व माईक माझ्या स्वाधीन केला. माता सरस्वतीची प्रार्थना सादर करून मी माझा एकपात्री कार्यक्रम सुरू केला. रेस्ट हाऊसवर झालेल्या रिहर्सल मुळे तबलजी उत्तम तबला साथ करीत होते. सादर होणाऱ्या प्रत्येक कवितेला रसिक भरभरून दाद देत होते, त्यामुळे कार्यक्रम सादर करताना मला विशेष आनंद होत होता.

सुरेश देशपांडे सुद्धा कार्यक्रमाचा अनुभव घेत होता. माझा एकपात्री उत्तरोत्तर रंगत गेला. ‘बलसागर भारत होवो ‘ या साने गुरुजींच्या कवितेने मी माझ्या कार्यक्रमाची सांगता करताच रसिकांनी स्टेजवर एकच गर्दी केली. सर्व रसिक आमचा निरोप घेऊन निघून गेल्यावर आम्ही पुन्हा रेस्ट हाऊसवर पोहोचलो तेंव्हा रात्रीचे दोन वाजले होते.जेवण झाल्यानंतर ‘उद्या दुपारी कॉलेजच्या कार्यक्रमासाठी मी घ्यायला येतो,’ असे सांगून प्राचार्य सर निघून गेले.

‘उद्या सकाळी गाडी घ्यायला येईल, आपल्याला आलापल्लीचे डीएफ्ओ डोर्ले साहेबांनी नाश्ता करायला बोलवले आहे.’ असे मला सुरेशने सांगितले आणि आम्ही रात्री तीन वाजता झोपी गेलो. आम्ही सकाळी ८ वाजता तयार झालो तेंव्हा डोर्ले साहेबांची गाडी आलेलीच होती. साहेबांच्या घरी स्वतः डोर्लेसाहेबांनी आमचे स्वागत केले. खास आमच्या भेटीसाठी बोलावलेल्या ‘बल्लारपूर पेपर मिल’च्या (बिल्ट) डीएफ्ओ साहेबांचा डोर्ले साहेबांनी आमच्याशी परिचय करून दिला तेंव्हा काल रात्रीच्या माझ्या कार्यक्रमाची त्यांनी खूप स्तुतीही केली. गरमागरम मेथीच्या थेपल्यांचा नाश्ता व चहा झाल्यावर डोर्ले साहेब आम्हाला म्हणाले, ‘आज दुपारच्या कार्यक्रमानंतर आमच्या वन विभागाच्या आणि बिल्टच्या रसिक कुटुंबांसाठी आज रात्री एक कार्यक्रम आयोजित करुया कां ?’ मी पण त्यांना होकार दिला आणि आम्ही त्यांचा निरोप घेतला.

पत्रकारितेच्या कामासाठी सुरेश तसाच चंद्रपूरला परत गेला आणि साहेबांच्या गाडीने मला अहेरी कॉलेजवर सोडले. दुपारचा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम सुद्धा अतिशय बहारदार झाला. रात्रीच्या कार्यक्रमातील कवितांपेक्षा वेगळ्या आणि तरूण वर्गाला भावतील अशाच दर्जेदार कविता कॉलेजच्या कार्यक्रमात मी सादर केल्यामुळे प्राध्यापक मंडळी सुद्धा बेहद्द खूष झाली. रात्री आलापल्लीचा कार्यक्रम आणि नंतर तीन चार दिवस धर्मरावबाबा अत्राम राजे यांच्या शाळांमध्ये माझे शालेय कार्यक्रम आयोजित झालेले असल्याने नंतर मी अहेरीत मुक्काम करून राहिलो होतो.
क्रमशः

विसुभाऊ बापट

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट, दादर, मुंबई
(सादरकर्ते – कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. 🌹खूप सुंदर अनुभव आणि गाढा अभ्यास 🌹
    धन्यवाद सर

  2. विसुभाऊ, तुमच्या जीवनातल्या या सगळ्या रोचक कथा वाचायला खूप छान वाटतात. त्या तुमच्या आवाजात ऐकायला अधिक मजा येईल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments