“ग्लोरी ऑफ आलापल्ली” चा प्रत्यक्ष अनुभव घेत आम्ही सायंकाळी लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे उतरलो आणि शेरूसाहेब पुढील प्रवासाला निघून गेले. सुरेश आणि मी धुळीने माखलो होतो. ‘तुम्ही बसने आले नाहीत, त्यामुळे काळजी वाटत होती. आता माझ्याबरोबर आत चला आणि आंघोळ करून तयार व्हा, बाबा तुमची वाट बघतायत.!’ असे म्हणत मित्र भास्कर भटांनी आमचे स्वागत केले.
तिथे आम्हा चार-पाच जणांसाठी एक खोली दिली होती, आम्ही आंघोळी करून तयार झालो आणि भटांबरोबर बाबा आमटें कडे जायला निघालो. अंधार पडला होता, पण बाबांनी त्यांच्या आनंद वनातून आणलेल्या जनरेटरवर दिवे लावून प्रकाशाने तो परिसर उजळून निघाला होता. आदिवासींनी पहिल्यांदा ते दिवे पाहिले होते, त्यामुळे मोठ्या कुतूहलाने आदिवासी मंडळी दिवेच पहात फिरत होती. ‘बाबांना देव मानणारे’ हे सर्व आदिवासी चार-पाच दिवस, कांही किलोमीटर पायपीट करून हेमलकसाला पोहोचले होते. संपूर्ण ‘लोक बिरादरी प्रकल्प’ आदिवासी कुटुंबांनी गजबजून गेला होता. हा विलक्षण अनुभव आम्ही पहिल्यांदाच घेत होतो.
आम्ही बाबांच्या खोलीजवळ पोहोचलो तेंव्हा पाठीच्या दुखण्यामुळे बाहेरच्या अंगणात कॉटवर पहूडलेल्या बाबांनी उठून आमचे स्वागत केले, बाजूला साधनाताई, प्रकाश व मंदाकिनी वहिनी होत्याच.! त्यांच्या बरोबर रात्रीचे जेवण करून आम्ही खोलीकडे परत जाताना ते आदिवासी शेकोटीच्या भोवती फेर धरून, ढोलाच्या ठेक्यावर नृत्य करताना दिसले आणि असे अनेक ग्रुप नृत्य करीत होते.
या आदिवासी नृत्याला “घोटूल” म्हणतात, असे सुरेशने मला सांगितले. प्रत्येक ग्रूप जवळ थांबून घोटूल नृत्याचा विलक्षण अनुभव घेत आम्ही खोलीकडे गेलो. थंडी वाढत होती म्हणून आम्ही गाद्यांवर पहुडलो. अंगावर जुजबी कपडे असलेले आदिवासी त्या थंडीतही नाचत होते. बाहेरून येणाऱ्या त्या आवाजात झोप कधी लागली, ते कळलेच नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तयार होऊन आश्रम शाळेच्या मैदानात गेलो तेंव्हा आदिवासी मंडळींनी मैदान भरून गेले होते. आमटे कुटुंबीय स्टेजवर येताच उभे राहून सर्वांनी त्यांना अभिवादन केले आणि मेळावा सुरू झाला. शाळेच्या शिक्षकांनी व्यवस्थित सजवलेल्या स्टेजवर प्रथम दोन भाषणे झाली. व्दिभाषी ते भाषण गोंडीत भाषांतर करून सांगत होते. त्यानंतर स्वतः बाबा उभे राहिले.
“इंचमपल्ली व भोपालपट्टणम्” या दोन्ही धरणांचा पाणीसाठा आपल्या भागात होईल आणि त्यामुळे ग्लोरी ऑफ आलापल्ली व आपली आदिवासी जमात कशी नष्ट होईल हे बाबांनी सांगितले. ही दोन्ही धरणे होऊ नयेत यासाठी आपल्याला ‘चिपको आंदोलन’ करावे लागणार आहे. झाडाला घट्ट मिठी मारून ‘आधी आम्हाला आणि नंतर झाडांना तोडा’, असे सांगावे लागणार आहे. हे चिपको आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपण आत्ता प्रतिज्ञा घेऊया, असे सांगून बाबांनी आपला उजवा हात पुढे केला, तसा सर्वांना करायला सांगून बाबांनी सर्वांना प्रतिज्ञा दिली. त्यातील प्रत्येक ओळ द्विभाषीने गोंडीत भाषांतर करून सांगितली आणि प्रत्येक आदिवासीने तशी प्रतिज्ञा घेतली. अशा प्रकारे ते सकाळचे प्रतिज्ञा सत्र संपन्न झाले. दुपारच्या जेवणानंतर कांहीं कार्यक्रम पार पडले. संपूर्ण दिवसभर ते आदिवासी बांधव हेमलकसा परिसर पहात फिरत होती. शिक्षकांनी विशेष मेहनत घेऊन बसवलेले आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी जेवणानंतर सादर होणार होते.
– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट. दादर, मुंबई
(सादरकर्ते – कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप खूप सुंदर