नमस्कार मंडळी.
काही अपरिहार्य कारणांमुळे गेले दोन आठवडे
“कुटुंब रंगलंय काव्यात” प्रसिध्द होऊ शकले नाही.
या लेख मालेतील पुढचा भाग आज वाचू या…
– संपादक
मा.बाबा आणि प्रकाश आमटे यांच्या “लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा” आदिवासी आश्रमशाळेत ‘ओंकार काव्य दर्शन’ हा माझा शालेय कार्यक्रम सादर केला आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली. कसनसूर, जारावंडी अशा ३६ आदिवासी पाड्यावरील आश्रमशाळेत मी माझे शालेय कार्यक्रम विनामूल्य (अगदी बसभाडे सुद्धा पदराच्या पैशांतून खर्च करून) सादर केले, अर्थात मित्र सुरेश देशपांडे सावली सारखा माझ्याबरोबर होता.
कांहीं आश्रमशाळेत पोहोचण्यासाठी, रस्ता नसल्याने चार -पाच किलोमीटर चालत जाऊन आम्ही माझे शालेय कार्यक्रम सादर केले. त्यानंतर कांही दिवसांनी, “मुंबई पुण्याकडचे विसुभाऊ बापट आपल्या आदिवासी आश्रमशाळेत येतात आणि मुलांना चांगल्या चांगल्या कविता ऐकवून जातात,!” अशी नोंद तेथील आदिवासी लोकांनी घेतली असल्याचे आमच्या पत्रकार संघात समजले.
असाच एक “जिवती” हा आदिवासी पाडा आमचे डीएफ्ओ मित्र एस्.एस्.एन राव यांनी दत्तक घेतल्याचे समजले. त्यांच्या आग्रहाने एक दिवस आम्ही त्या पाड्यावर जायचे ठरवले. राव साहेबांच्या गाडीतून जाताना त्यांनी त्या पाड्याबद्दल आम्हाला माहिती दिली. त्यावेळी ते म्हणाले, “हा आदिवासी पाडा चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालुक्यातील आहे, ही गोष्ट राजूरा तहसीलदारांना सुद्धा माहिती नाही. या तालुक्यातील “माणिकगड सिमेंट फॅक्टरीच्या पलिकडे दोन तीन डोंगर पार केल्यानंतर हा आदिवासी पाडा येतो. तिथे पोहो़चण्या साठी महाराष्ट्रातून रस्ताच नाही, तर कांही किलोमीटर आंध्रप्रदेशात जाऊन परत एक मोठा ओढा ओलांडून महाराष्ट्रातील त्या पाड्यावर जायला कच्चा रस्ता आहे, असा हा पाडा मी दत्तक घेतला आहे.”
अशी माहिती घेत आम्ही त्या आदिवासी पाड्याकडे जायला आंध्रप्रदेशातून असलेल्या रस्त्याला लागलो. मोठा ओढा ओलांडला आणि शहाबादी फरशा रचून तयार केल्यासारखे उंचच उंच डोंगर आम्हाला दिसू लागले. पैकी एका डोंगर उतारावर कांही आदिवासी कामगार काम करतांना दिसल्याने राव साहेबांनी आमची गाडी तिथेच नेऊन थांबवली आणि आम्ही एका आदिवासी जवळ गेलो. फक्त छिन्नी हातोड्याच्या सहाय्याने तो तेथील डोंगरातून फरशीचे तुकडे काढून ठराविक चौकोनी आकाराचे बनवत होता. ‘या प्रत्येक कामगाराला दिवसाचा रोज केवळ ९० पैसे इतकाच दिला जातो”, हे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले. घरी बसण्यापेक्षा ९० पैसे मिळतात, यावरच ते कामगार खूष असतात, असे आम्हाला रावनी सांगितले. तिथून गाडी त्यांनी सरळ पाड्यावर नेली, त्यांनी दत्तक घेतलेल्या त्या पाड्यावरील आदिवासींनी आमचे स्वागत केले.
शहाबादी फरशांच्या उंच डोंगरांनी पाडा वेढलेला होता, एका डोंगरामागे माणिकगड सिमेंट फॅक्टरीचा धूर दिसत होता. डोंगरांच्या मध्यात त्या आदिवासींची शेती सद्धा होती, तोच त्यांचा रोजीरोटीचा व्यवसाय होता. ते पावसाच्या पाण्यावरचे भाताचे एकच पीक घेऊ शकत होते. पावसाळा संपल्यानंतर जमिनीत मुरलेल्या पाण्यावर त्यांना दुसरे पीक एरंडाचेच घ्यावे लागत होते. पावसाळा संपल्यानंतर त्यांच्या हाताला कामच नव्हते. मग शेतात पिकलेला तांदूळ वर्षभर पुरवून खायचा आणि डाळ-मिठा पासून लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू जवळच्या आंध्रप्रदेशातील गावात भरणाऱ्या बाजारात एरंड विकून मिळालेल्या पैशातून खरेदी करायच्या, असेच त्यांचे जीवन होते. पाड्यावर शाळा नाही, त्यामुळे सगळेच अशिक्षित.! कष्ट करायची तयारी असूनही हाताला काम नव्हते.
असा हा आदिवासी पाडा राव साहेबांनी दत्तक घेतल्यानंतर पाड्यावर दहा कूपनलिका बांधल्या आणि त्यांचा पाण्याचा प्रश्न प्रथम सोडवला. बल्लारपूर पेपर मिलशी बोलणी करून पाड्याच्या चारी बाजूला असलेल्या डोंगर उतारावर बांबू लागवड करण्याचे कंत्राट मिळवून दिले. वन विभागाच्या वतीने सागवान आणि इतर वृक्ष लागवडीचे व वृक्षांची जोपासना करण्याचेही कंत्राट त्यांना दिले.
शिक्षणाचे महत्व सांगून त्यांच्या मुलांसाठी जिल्हा परिषदेची चौथी- पर्यंतची शाळा सुरू करून दिली. तेथील आदिवासी लोकांचे जगणे सुसह्य व सुखाचे करून दिले. हे सर्व प्रत्यक्ष पाहून, अनुभव घेऊन आम्ही चंद्रपूरला परतलो.
आदिवासींसाठी जीव ओतून काम करणारा राव साहेबांसारखा दुसरा शासकीय अधिकारी माझ्या पाहण्यात अजून तरी आलेला नाही, म्हणूनच मी कधीही विसरू शकत नाही अशा एस्.एस्.एन्. राव साहेब यांना त्रिवार वंदन.!

– लेखन : प्रा. विसुभाऊ बापट. मुंबई.
(सादरकर्ते – कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800