“झाडीपट्टी रंगभूमी”
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंप्री पासून भंडारा जिल्ह्यातील देवर्षी पर्यंत दाट जंगलाचा जो पट्टा आहे त्या जंगल परिसरात आजही चालू असलेल्या नाटक चळवळीला “झाडीपट्टी रंगभूमी” म्हणून ओळखले जाते. तिथल्या कांही गांवात दरवर्षी दिवाळी नंतर बाजार भरायला सुरुवात होते, ‘शंकरपटाची’ सुरुवात १४ जानेवारी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर होते. कास्तकाराच्या (शेतकरी) वावरातील धान तयार होऊन (शेतकऱ्यांचा वावर शेतात असतो म्हणून ते आपल्या शेताला वावर म्हणतात, तर धान म्हणजे तांदूळ !) प्रत्येकाच्या घरात आलेले असते. थोडा पैसा गाठीशी आलेला असतो. १४ जानेवारी पर्यंतचा त्या कास्तकारांचा सगळाच वेळ वावरातील कष्टात गेलेला असतो, त्यानंतर त्यांना थोडा विरंगुळा, थोडे मनोरंजन पाहिजे असते. म्हणूनच तिथे शंकरपट-नाटकांची सुरुवात होते.
आजूबाजूच्या खेडेगावातून एकेका घरात शेकडो पाहूणे आलेले असतात. प्रत्येक घराच्या दारात मोठमोठ्या हंड्यात चून-भात तयार (झणझणीत पिठलं-भात) केला जातो. समोरच्या वावरात सर्वांची जेवणं होतात. नंतर तरूण मुला मुलींना दाखवण्या-बघण्याचे कार्यक्रम होतात, बोलणी होतात, लग्नं ठरतात.
त्यानंतर बैलगाड्या शर्यतीची धूम सुरू होते. विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतात. रात्री जेवण झाल्यावर जंगल- वाटेने आपापल्या घरी परतणे शक्य नसते, त्यामुळे सर्वांना तिथेच थांबावे लागते, पण येवढ्या सगळ्या पाहूणे मंडळींची मुक्कामाची व्यवस्था कशी होणार? म्हणून नाटकाचे आयोजन केलेले असते. त्यावेळी त्या गावात चार-पाच नाटकं ‘हाऊस फुल्ल’ होतात.
प्रत्येक नाटक संगीत नाटकच असले पाहिजे आणि ते रात्रभर चालले पाहिजे, हा दंडकच असतो. पायपेटी व तबला वाजवणारे झाडीपट्टीचे, तयारीने वाजवणारे कलाकार असतात. गाणारे नायक, नायिका, कलाकार मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरातून बोलावून घेतले जातात. त्यांना भरपूर मानधन तर देतातच शिवाय त्यांची चांगली बडदास्त ठेवली जाते. नाटकातील बाकीचे कलाकार स्थानिक आणि हौशी असतात. नाटकातील संवाद कुणालाही पाठ नसतात, संपूर्ण नाटक प्रॉम्टिंगवरच सादर केले जाते. नाटकाच्या प्रॉम्टरने सांगितलेला संवाद स्पष्टपणे प्रेक्षकांना ऐकायला येतो, नंतर स्टेजवरील कलाकार तोच संवाद सादर करतो. अशाप्रकारे प्रत्येक संवाद रसिकांना दोनदा ऐकायला मिळतो. संपूर्ण नाटक पाठ असलेले कांहीं दर्दी रसिक नाटकातील संवादाचे समोरूनच प्रॉम्टिंग करताना मी पाहिले आहे. नाटकाच्या प्रत्येक अंकानंतर एका रुपया पासून शेकडो रुपये कलाकाराला प्रेक्षक बक्षिस म्हणून देतात आणि कलाकाराने ते स्टेजवर येऊनच स्वीकारावे लागते. यामध्ये तास दीड तास सहज निघून जातो. नंतर पुढचा अंक सादर केला जातो. चांगल्या गाण्याला ‘वन्स मोअर’ ही मिळतात व ते नाट्यगीत दोन तीन वेळा सादर होते.
अशाप्रकारे तो नाट्यप्रयोग संपूर्ण रात्रभर चालतो. पहाटे पहाटे नाटक संपते, आणि चहापाणी झाल्यावर सर्व पाहुणे मंडळी आपल्या परतीच्या प्रवासाला निघतात.
क्रमशः

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट. मुंबई.
(सादरकर्ते – कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
