‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या माझ्या एकपात्री काव्य नाट्यानुभवाचा १५०० वा महोत्सवी प्रयोग सलग ११ तास सादर करायचा, त्यात एकाही कवितेची पुनरुक्ती करायची नाही, असे ठरवून मी आणि माझी सर्व मित्र मंडळी तयारीला लागलो. कारण मला मराठी कविता सादरीकरणाचे वर्ल्ड-रेकॉर्ड करायचे होते. “मराठी कवितेचा रेकॉर्ड ब्रेक प्रयोग” जागतिक स्तरावर पोहोचवायचा होता. ४५ तास सादर करू शकेन एवढ्या कविता तर माझ्या मुखोद्गत होत्याच, पण त्यापैकी कोणत्या कविता घ्यायच्या, त्या कविता कोणत्या क्रमाने सादर करायच्या, हे मी प्रथम ठरवलं.
३१ मे २००३ या दिवशी हा प्रयोग करण्याचं निश्चित झाल्यावर मुंबईच्या विलेपार्ले येथील ‘दीनानाथ नाट्यगृह’ आम्हीं २४ तासांसाठी ॲडव्हान्स भाडे भरून बुक केले. पोलिस परमिशन, तिकिटे व सन्मानिका छापणे इत्यादि महत्वाचे सोपस्कार पूर्ण केले. संपूर्ण प्रयोग ११ तास मी उभे राहूनच सादर करणार होतो. त्यासाठी माझे मित्र डॉ.रमेश यादव यांनी ‘पंचकर्म’, माॉलिश वगैरेंच्या सहाय्याने आणि मित्र डॉ.आशुतोष नाडकर्णी यांनी, आयुर्वेदिक काढे, गोळ्या व व्यायाम करायला लावून माझे वजन कमी केले. माझ्या तब्बेतीची संपूर्ण काळजी या दोघांनी घेतली.
पत्रकार परिषद, पेपर जाहिरात, बोर्डस्, थोडे स्पॉन्सर, नेपथ्य, स्टेज व्यवस्था या सर्व गोष्टी माझ्या मित्र मंडळींनी जबाबदारीने पार पाडल्या. त्यावेळचे ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे’ अध्यक्ष मा. मच्छिंद्र कांबळी यांनी प्रयोगाला अध्यक्ष म्हणून येण्याचे मान्य केले, तर उद्घाटक म्हणून माझी आई सौ.अनुराधा व वडील श्रीधरपंत बापट यांना मी बोलावून घेतले. ठरल्याप्रमाणे बरोबर सकाळी ८ वा. मी प्रयोग सुरू केला. आणि हा प्रयोग यशस्वी होताच सर्व मित्र मंडळी स्टेजवर आली. माझ्यावर पुष्पवृष्टी केली, पेढे भरवले, सर्वांनी अगदी भरभरून कौतुक केले. मित्र नीतीन केळकरांनी तर स्टेजवर येऊन मला कडकडून मिठी मारली. ११ तासांचा हा प्रयोग यशस्वी झाला. सर्वच वृत्तपत्रांनी भरभरून लिहिले. आणि २००६ च्या “लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्” मध्ये : कुटुंब रंगलंय काव्यात’ या माझ्या एकपात्री कार्यक्रमाची नोंद झाली .
आता वेध लागले आहेत ते मराठी कविता “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये पोहोचविण्याचे ! मराठी रसिकांचे आशिर्वाद तर पाठीशी आहेतच !!!

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट, दादर, मुंबई.
(सादरकर्ते – ‘कुटुंब रंगलंय काव्यात’)
– संपादन : देवेंद्र भुजब. ☎️ 9869484800
