औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर व पैठणचे कार्यक्रम करून मी नासिकला परतलो. नाशिक शहर आणि जिल्ह्यातील शालेय ‘ओंकार काव्य दर्शन’, व ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ चे ठरलेले कार्यक्रम मला करायचे होते.
त्याप्रमाणे नाशिकचे ‘मेरी सीडीओ’, ‘देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ’, मालेगाव येथील ब्राह्मण संघ, घोटी सांस्कृतिक मंडळ, इगतपुरी सार्वजनिक वाचनालय, ओझर मिग वसाहत, नाशिक-रोडची शासकीय सिक्युरिटी प्रेस, कळवण सार्वजनिक ग्रंथालय, एकलेहरे थर्मल पॉवर स्टेशन वसाहत, निफाड शुगर फॅक्टरी, मनमाड रेल्वे वसाहत, चांदवड सांस्कृतिक केंद्र, सिन्नर सार्वजनिक ग्रंथालय, अशा विविध ठिकाणी माझे एकपात्री कार्यक्रम संपन्न झाले. संतोष हुदलीकर तबला साथीला होताच. याशिवाय अनेक शाळांमध्ये माझे शालेय कार्यक्रमही झाले.
आता मला पुढचे वेध लागले होते. प्रा. सदानंद जोशींना सांगितल्या प्रमाणे अनेक कवी, अनेक काव्यप्रकार त्यांच्या व्याकरणासह संकलित करायचे होते. त्यामुळे नाशिकमध्ये अडकून मला चालणार नव्हते. ज्या नाशिककर रसिकांनी आपुलकीने प्रेम दिले… परशुराम सायखेडकर नाट्यगृहाने माझ्या एकपात्री कार्यक्रमाला “कुटुंब रंगलंय काव्यात” हे नांव दिले…. अनेक कवी व कलाकारांनी मला आपला समजून प्रेम दिले… त्या सर्वांना मी नाशिक सोडून जाणार, हे समजल्यावर दुःख होणार होते. म्हणूनच कुणालाही न-सांगता एका रात्री नाशिक-रोड स्टेशनवरून मी ‘हावरा एक्स्प्रेस’ पकडून नागपूरला रवाना झालो.
आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ कवी अनील (दशपदी व मुक्तछंद), सुरेश भट (गझल व हजल), भाऊसाहेब पाटणकर (मराठी शायरी व गझल), प्रा.विठ्ठल वाघ व प्राचार्य दे.गं. सोटे (वऱ्हाडी कविता), या कवींनी मराठीत आपले नवे काव्यप्रकार निर्माण केले व रुजवले, त्यांना भेटून त्या काव्यप्रकारांचे व्याकरण मला माझ्या एकपात्री कार्यक्रमासाठी जाणून घ्यायचे होते. शिवाय मनोहर कवीश्वर, प्रा. मधुकर केचे, प्राचार्य राम शेवाळकर, श्रीकृष्ण राऊत, नारायण कुलकर्णी-कवठेकर, बाबा आमटे, प्रा. सुरेश द्वादशीवार, ग्रेस वसंत निनावे, इत्यादि विदर्भातील कवींच्या कविता मला संकलित करायच्या होत्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य कार्यालय नागपुरातच असल्याने त्यांचीही मदत मला होईल, याची खात्री होती. शिवाय “आदिवासी आश्रम शाळा” विदर्भात भरपूर आहेत, अशी माहिती वाडा गावातील कार्यक्रमा नंतर रानडे सरांनी मला दिली होती, त्याही शाळांमध्ये कार्यक्रम करायला अनुताईंनी मला सांगितले होते. या कारणांसाठी मी नाशिकहून नागपूर या महाराष्ट्राच्या उपराजधानीत जाण्याचा निर्णय घेतला होता.
नागपुरात राहून मी विदर्भ फिरायचे ठरवले होते.
परंतु नागपुरात माझ्या कुणीही परिचयाचे नव्हते, कविता संकलित करण्यासाठी, विदर्भातील रसिकांपर्यंत माझा एकपात्री कार्यक्रम आणि शालेय कार्यक्रम पोहोचवण्यासाठी मला नागपुरात जाणे आवश्यक वाटले. हावरा एक्सप्रेसने मी नागपूर स्टेशनवर उतरलो आणि बाहेर येताच माणसाने चालवायची सायकल रिक्षा मी तिथे पहिल्यांदा पाहिली. या सायकल रिक्षाचा अनुभव घेण्यासाठी मी एका रिक्षावाल्याला गाठलं. तोच माझा नागपुरातील पहिला परिचित माणूस.! मी माझी अडचण त्याला समजावून सांगितली आणि तो मला कॉटन मार्केट परिसरातील म.फुले मार्केटच्या भव्य इमारतीत घेऊन गेला.
इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर तीन चार लॉज होती. पैकी “गोपाळ कृष्ण लॉज” वर तो मला घेऊन गेला. तेथील मॅनेजरने मला एक कॉट आणि बाजूला थोडी रिकामी जागा असलेली एक खोली महिना १५० रुपये भाड्याने दिली. नागपुरातील माझ्या दुसऱ्या परिचित व्यक्तीने माझी तिथे राहण्याची चांगली व्यवस्था करून दिली आणि मी नागपुरात मुक्काम ठोकला.

– लेखन : प्रा विसुभाऊ बापट.
(सादरकर्ते-कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
उत्तमातलं उत्तम काव्य थोरांपासून शालेय मुलांपर्यंत ,अगदी आदीवासी आश्रम शाळेतल्या मुलांनाही ते ऐकवण्यासाठी
विसुभाऊंची कुटुंब रंगलंय् काव्यात या कार्यक्रमाद्वारे चाललेली धडपड प्रशंसनीय आहे.काव्यांतून ते समाजावर संस्कारही
घडवत आहेत.खूप चांगला ऊपक्रम आहे हा!!