“नाट्य संपदा” या संस्थेत मी बसायला सुरुवात केली खरी पण, पणशीकर कुटुंबा बरोबर मी कायमचा जोडला गेलो ते त्यांच्या कुटुंबियांच्या स्नेह मेळाव्यात.! दाजीकांकानी नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या कॅडलरोडच्या घरात “पणशीकर कुटुंब स्नेह मेळाव्यात” माझा ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा एकपात्री कार्यक्रम आयोजित केला. या माझ्या एकपात्री कार्यक्रमाला गान सरस्वती किशोरीताई आमोणकर आल्या होत्या.(पंतांचा मुलगा रघुनंदन त्यांच्याकडे शास्त्रीय गायन शिकत होता.) सर्वच दिग्गज रसिकांसमोर कार्यक्रम सादर करताना खूप मजा आली. सर्वच रसिक भरभरून दाद देत असल्याने माझा तो कार्यक्रम तूफान रंगला आणि या प्रयोगामुळे मी प्रभाकर पणशीकर आणि त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य बनलो. प्रत्यक्ष गान सरस्वतीचे आशिर्वाद मला याच प्रयोगात मिळाले.
त्यानंतर दादरच्या शिवाजी मंदिरची नाट्य संपदाला मिळालेली एक तारीख मला देऊन एस्. पुरुषोत्तम यांच्या ‘आपली रंगभूमीच्या’ वतीने ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ चा पाचशेवा महोत्सवी प्रयोग मी शिवाजी मंदिरात सादर केला. सर्वच वृत्तपत्रांत माझ्या कार्यक्रमावर खूप चांगले लिहून आले, प्रसिद्धी मिळाली.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त फक्त त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘मातोश्री’ वर माझा एकपात्री कार्यक्रम एस्. पुरुषोत्तम यांनी आयोजित केला होता. त्यावेळी साहेब मला म्हणाले, “विसुभाऊ, तू बहिणाबाईंच्या कविता चांगल्या सादर करतोस, असे पुरुषोत्तम म्हणत होते. बहिणाबाईंचा मुलगा सोपान माझ्याकडे यायचा. त्यांच्याकडून बहिणाबाई ऐकल्या होत्या. तो गेल्यावर मला त्या कविता ऐकायला मिळाल्या नाहीत, तेंव्हा आज बहिणाबाईंच्या कविता जरा जास्त ऐकव.” साहेबांच्या आदेशानुसार मी त्यादिवशी बहिणाबाईंच्या खूप कविता सादर केल्या.
ईशस्तवन, याकुन्देन्दू ची समश्लोकी, ऊन ऊन खिचडी, माहेरची ओढ, आत्मा म्हणतो, बालकविता, वात्रटिका, लोचटिका, बहिणाबाईंच्या कविता, देशभक्तीच्या कविता, गीत रामायणातील कविता, प्राचीन व अर्वाचीन कविता, माय मराठीचा अभिमान सांगणाऱ्या कविता मी सादर करीत गेलो…दाद मिळत गेली….आणि तो प्रयोग तूफान रंगला. हिंदुहृदयसम्राटांनी माझ्या एकपात्री कार्यक्रमाला भरभरून आशिर्वाद दिले. नाट्यसंपदेत मराठी रंगभूमीवरील दिग्गज कलावंतांचा सतत राबता होता. नाट्यसंपदेचे मॅनेजर श्याम जोशी प्रत्येक कलाकाराशी माझा परिचय करून द्यायचे. मराठीचा छोटा गडकरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाळ कोल्हटकर यांच्या बरोबरही माझा असाच परिचय झाला, भेटी होत राहिल्या. अशाच एका दिवशी मी बाळासाहेबांना म्हणालो, “आपल्या नाटकातील कांही कविता मी माझ्या एकपात्री कार्यक्रमात आपल्या स्टाईलने सादर करतो, आपली एक कविता मला आपल्या हस्ताक्षरात पाहिजे आहे” त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी त्यांना त्यांच्या कविता सादर करून दाखवल्या. त्यांच्या बरोबर माझी घट्ट मैत्री झाली.
‘वेगळं व्हायचंय मला’ या बाळासाहेबांच्या मुंबई दूरदर्शनवर सादर झालेल्या नाटकात त्यांनी मला विनायक विघ्ने ही भूमिका करायची संधी दिली, इतकेच नव्हे तर “शिवराय कवी भूषण” या नाटकात मी भूषणाची भूमिका करायची, असे ठरले, तालमी सुरू झाल्या आणि छोट्या गडकरींना देवाज्ञा झाली. या नाटकाचे आमचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. माझ्याकडे त्यांच्या हस्ताक्षरात संकलित असलेली कविता मी नेहमीच सादर करीत असतो. त्यामुळे ते सतत माझ्या बरोबर असतात. यातील पहिल्या दोन ओळीतून रसिकांना दोन अर्थ मिळतात.
“निवृत्तीच्या मार्गावरुनी ज्ञानदेव चालले,
सोपानाच्या मागे मागे मुक्तीची पाऊले ।
निर्माल्यातुन जणू उगवली चार सुगंधित फुले,
अवतीभवती सज्जन म्हणती,अहो ही संन्याशाची मुले ।।”
क्रमशः

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट. दादर, मुंबई
(सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800