रसिक वाचकहो…….
कोल्हापूरच्या ‘गोपाळ कृष्ण गोखले’ कॉलेजमधून मी अर्थशास्त्र विषयात एम ए केलं. दै.सत्यवादी मध्ये आठ वर्षं सहसंपादक म्हणून नोकरी करीत असतानाच मी मराठी कवितेचा विशेष अभ्यास केला. प्रसिद्ध गायिका, गोखले कॉलेजच्या लायब्रीयन श्रीमती रजनी करकरे यांनी अभ्यासासाठी आवश्यक ती कवितांची पुस्तके मला उपलब्ध करून दिली. देवल क्लब मधील नीळकंठबुवा चिखलीकर, अनंतबुवा लिमये यांच्याकडे उपान्त्य विशारद पर्यंतचे गाण्याचे शिक्षण मी घेतले तर माईणकर बुवांकडे मी हार्मोनियम वाजवायला शिकलो.
गण गौळण हे काव्यप्रकार तिथल्या कलापथकांमध्ये गाऊन त्यांची माहिती मिळवली, यासाठी कविवर्य जगदीश खेबूडकर यांचे विशेष सहकार्य मला लाभले. ‘ओंकार काव्य दर्शन’ या शालेय कार्यक्रमाची निर्मिती मी कोल्हापुरातच केली आणि शुभारंभाचा प्रयोग भवानी मंडपा जवळच्या ‘मेन राजाराम हायस्कूल’ मध्ये केला. एकूणच मी कोल्हापुरात घडलो, म्हणूनच ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या माझ्या एकपात्री कार्यक्रमाचा तपपूर्ती समारंभ आम्ही कोल्हापूर शहरातच घ्यायचे निश्चित केले.
कोल्हापूर महापालिकेचे माजी महापौर रा.ल.जोशी, चंद्रशेखर बटकडली, कवी अशोक भोईटे, प्रेस-फोटोग्राफर राजा उपळेकर गोपाळ कुलकर्णी, या आणि इतर सर्व जुन्या मित्रमंडळींची समिती स्थापन करून औदुंबरचे सुप्रसिद्ध कवीवर्य सुधांशू यांना तपपूर्ती समारंभाचे अध्यक्षपदासाठी निमंत्रित करायचे सर्वानुमते ठरले. “औदुंबर वरून नेण्या-आणण्याची व्यवस्था तुम्ही गाडीने करणार असाल तर मी येतो,”असे सुधांशूंनी सांगितले आणि ती जबाबदारी मित्र बाळ कालेकरने स्वीकारली. माजी महापौर जोशी सरांनी “राजर्षी शाहू सभागृह” स्पॉन्सर केले. (म्हणजे माझा एक कार्यक्रम आयोजित करून त्याचे मानधन दिले.)राजाभाऊ देवधर यांनी पेण वरून गणेश मूर्ती स्पॉन्सर केल्या, आणि तपपूर्ती कार्यक्रमा निमित्त जिल्ह्यातील कवींसाठी कविता वाचन स्पर्धा व निमंत्रित कवींचे संमेलन अशा एकदिवसीय संमेलनाच्या बातम्या सत्यवादी, पुढारी, सकाळ, नवसंदेश या स्थानिक दैनिकात प्रकाशित झाल्या आणि या संमेलनाला जिल्ह्यातील कवी मंडळींनी उत्तम प्रतिसाद दिला.
‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा माझा एकपात्री कार्यक्रम सुरू करून दि. २६ जानेवारी १९९३ रोजी १२ वर्षे पूर्ण होणार होती. म्हणूनच हा तपपूर्ती समारंभ आयोजित करण्याचे आम्ही सर्वांनी ठरविले. पद्मा टॉकीज जवळ असलेल्या आनंद माने यांनी त्यांच्या “हॉटेल आनंद कोझी” मधील कांही खोल्या कांहीं दिवस मला कमी भाड्यात दिल्या व आठदिवस तिथे राहूनच आम्ही कार्यक्रमाची सर्व तयारी केली. पूर्वी ठरल्याप्रमाणे मित्र बाळ कालेकर कवी सुधांशूंना गाडीने घेऊन आला आणि मान्यवरांनी सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन करून संमेलनाची थाटात सुरुवात झाली. शाहू सभागृहात पत्रकार, कवी व रसिकांनी गर्दी केली होती. संपूर्ण संमेलनात प्रत्येक कवींचे गुलाब-पुष्प देऊन स्वागत कराण्यासाठी स्वतः सुधांशु जातीने बसले होते. प्रथम २५ ते ३० नवोदित कवींची कविता वाचन स्पर्धा संपन्न झाली. मध्यंतरात सर्वांचे चहापान झाले आणि नंतर निमंत्रितांचे कवी संमेलन होऊन पसायदानाने या एकदिवसीय संमेलनाची सांगता झाली.

सर्वच वृत्तपत्रांनी तपपूर्ती समारंभाचे भरभरून कौतुक केले आणि माझ्या एकपात्री कार्यक्रमाला कोल्हापूरकरांच्या खूप शुभेच्छा मिळाल्या, त्यामुळेच माझ्या एकपात्री कार्यक्रमाने आज चाळीस वर्षां मध्ये ३०६७ प्रयोग हा पल्ला मी गाठू शकलो आहे.
कवीवर्य सुधांशूंची एक अपरिचित कविता आमच्या खास रसिक वाचकांसाठी देत आहे.
“सासर ना ते माहेर, आई तुझीच गं पुण्याई,
स्वर्ग सुख तिथे उणे, सांगायला शब्द नाही..१
कांही तरी नको बाई, असं विचारूस आई,
किती यांचे गुण सांगू, किती वर्णू चतुराई…२
सासू आता खरं सांगू, तुझंच गं दूजं रूप,
रागावू नको हवं तुज विसरते आपोआप…३
किती जपतात मज, तळहातीचा की फोड,
साऱ्यांना मी हवी हवी, गोड पायरीची फोड…४
किती कौतुक करावं, माझं लहान थोरांनी,
संकोचतो माझा जीव, यांच्या अशा वागण्यानी…५
आई तुझ्या लेकीची या, नको मुळी चिंता करू,
आहे सुखात नांदत, तुझं लाडकं लेकरू….६
कां गं ओलावले डोळे, हळवी तू भारी बाई,
काय पहा माया तरी, आनंदात रडू येई….७
क्रमशः

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट, दादर, मुंबई.
(सादरकर्ते – कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
कुटुंब रंगलंय काव्यात चा प्रवास आणि कविवर्य सुधांशू यांची कविता दोन्ही खूप छान!👌🌹👌
वाह, खूपच छान…!