Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यकुटूंब रंगलंय काव्यात ( ५० )

कुटूंब रंगलंय काव्यात ( ५० )

नागपूरच्या धरमपेठ कन्या विद्यालयाच्या प्रांगणात १९८४ सारी गझलसम्राट सुरेश भट यांच्या गझल सादरीकरणाचा कार्यक्रम मी ऐकायला गेलो होतो. भटांच्या गझलांचे निरूपण प्राचार्य राम शेवाळकर सर करीत होते, हा एक दुग्धशर्करा योग होता. कार्यक्रम अतिशय अप्रतीमच झाला, त्याची सांगता झाल्यावर जमा झालेले कांही लाख रुपये भटांनी सीताबर्डीतील ‘मातृसेवा संघा’ला दिले, मी यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला, आणि माननीय सुरेश भट यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या माझ्या एकपात्री कार्यक्रमाचे असेच मदतीसाठी करायचे अशी खूणगाठ मी मनाशी बांधली.

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी गावातील आशा जरातेच्या ‘हार्ट ऑपरेशनच’च्या मदतीसाठी, आणि मनोरमाबाई पोरेड्डीवार डीएड कॉलेजच्या सहकार्याने मी माझा एकपात्री प्रयोग सादर केला, आणि जमा झालेला अकरा हजार रुपयांचा निधी जराते कुटुंबाला दिला. हा मदतीसाठी कार्यक्रम सादर करायचा, सामाजिक बांधिलकी जपायचा माझा पहिला प्रयत्न यशस्वी झाला.

दि.३० सप्टेंबर १९९३ रोजी भूकंपाचा प्रचंड मोठा धक्का लातूरला बसला आणि जिल्ह्यातील किल्लारी सह अनेक गाव-खेडी जमिनदोस्त झाली. येथील भूकंप ग्रस्तांच्या मदत करण्यासाठी केवळ महाराष्ट्रातून व भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून अनेक संस्था पुढे सरसावल्या होत्या. त्यात आपणही एक खारीचा वाटा उचलावा, असे मनात आले आणि उस्मानाबादचे निवासी उपजिल्हाधिकारी माननीय भारत सासणे व सहाय्यक जिल्हाधिकारी माननीय भूषण गगराणी यांच्या सहकार्याने मी माझा एकपात्री कार्यक्रम सादर करून जमा झालेली रक्कम जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे दिली होती.

२००५ साली मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ढगफुटी झाली आणि सगळीकडे हाहाकार झाला, मुंबईतही महापूर येवून प्रचंड नुकसान व जीवितहानी झाली होती. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे त्यावेळचे अध्यक्ष श्री.मच्छिंद्र कांबळी यांनी दादरच्या शिवाजी मंदिर येथे (नाट्यगृह विनामूल्य मिळवून) आठ दिवस आठ नाटकांचे प्रयोग ‘मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्त निधीसाठी’ करायचे ठरवले होते. त्यानंतरचा ९ वा दिवस बुधवार दि.०५/०८/२००५ मी शिवाजी मंदिर ॲडव्हान्स भाडे भरून बुक केले. मित्र धनंजय बरदाडे व मित्र आनंद खेडकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन धडाडीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना गाठून मी सर्व हकीकत सांगितली आणि त्यानंतर त्यांचे मित्र पंकज छगनराव भुजबळ आणी महात्मा फुले सोसायटी  यांच्या सहकार्याने शिवाजी मंदिर येथील माझा एकपात्री कार्यक्रम यशस्वी झाला. ‘मुख्यमंत्री पूरग्रस्त निधीसाठी’ जमवलेले २,५०,०००/- रुपये आम्ही मा.उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील… आबांकडे सुपूर्त केले.

‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या माझ्या एकपात्री कार्यक्रमाचा १८५७ वा प्रयोग दादरच्या स्वा.सावरकर स्मारकाच्या मदतीसाठी मा. विक्रमजी सावरकर यांनी आयोजित केला होता. त्यावेळचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त मा.जयराज फाटक यांच्या अध्यक्षतेखाली सादर झालेल्या या प्रयोगाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या रामदास पाध्ये, केसरी पाटील, अभिजित पाटील यांनी प्रचंड दाद तर दिली होतीच शिवाय स्मारकाला आर्थिक मदतही केली होती.

भारतीय जनता पार्टीचे राजेश शिरवाडकर यांनी भाजपा दक्षिण मध्य मुंबईचे अध्यक्ष श्री. अनिल ठाकूर यांची माझी भेट करून दिली आणि त्यांच्या सहकार्याने माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात ‘केरळ पूरग्रस्तांच्या’ मदतीसाठी “कुटुंब रंगलंय काव्यात”चा एकप्रयोग सादर करून कांही रक्कम (आयोजकांनी रक्कम सांगितली नाही) महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीला मी दिली होती.

सुप्रसिद्ध समाज सेविका अनुताई वाघ यांच्या आदेशानुसार वाडा, मोखाडा, जव्हार तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळांपासून मा.प्रकाश बाबा आमटे यांच्या ‘लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा’ येथील आदिवासी आश्रमशाळेपर्यंत १२०० वर शाळांमध्ये माझा ‘ओंकार काव्य दर्शन’ शालेय कार्यक्रम, सरस्वती मातेच्या कृपेने मी विनामूल्य सादर केला आहे… आजही करतो आहे.

याशिवाय रिमांड होम, बालिकाश्रम, अंधशाळा अशा कित्येक ठिकाणी माझे शालेय कार्यक्रम मी विनामूल्य सादर केले आहेत, आजही करतो आहे. दोन हजार सालापासून आनंद खेडकर, धनंजय बर्दाडे, दिनेश तारवी आदि मित्रांच्या सहकार्याने वर्षातून एकदा दुर्गम आदिवासी पाड्यावर मी आणि सौ.उमा (जमा केलेले) कपडे, साड्या, भांडी इत्यादि वस्तूंचे वाटप करून येतो.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावर कपडे,साड्या वाटप करताना सौ.उमा विसुभाऊ बापट १ जुलै २०१८

१ एप्रिलला माझा वाढदिवस असतो, पण एप्रिल-फूलचा तो दिवस असल्याने कुणाला हे खरं वाटतच नाही. म्हणूनच त्यादिवशी सौ.उमा, कन्या तन्वी यांच्यासह मी गाडी करून एखाद्या वृद्धाश्रमात जातो… वर्षभर आलेल्या व साठवून ठेवलेल्या शाली देवून तिथल्या वृद्धांचा सत्कार करतो, त्यांना माझा एकपात्री कार्यक्रम विनामूल्य ऐकवतो, आणि संपूर्ण दिवस त्यांच्या सहवासात घालवतो. ती सर्व वृद्ध मंडळी खूष होऊन भरभरून आशिर्वाद देतात. तिथून मिळालेला आत्मानंद, ऊर्जा वर्षभर कार्यक्रम सादर करण्यासाठी आम्हाला उपयुक्त ठरते.

याच बळावर गेली ४० वर्षे मी रसिकांची कुटुंबं … कवितेत रंगवत, आनंद वाटत फिरतो आहे. मला प्रचंड रसिकाश्रय आहे परंतु राजाश्रय मात्र मिळालेला नाही.

विसुभाऊ बापट

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट, दादर, मुंबई
(सादरकर्ते -‘कुटुंब रंगलंय काव्यात’)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments