तू हयात असताना
सतत राबता असायचा
येणाऱ्या जाणाऱ्यांचा
घर कसं दणाणून जायचं
हास्य विनोद गप्पात
मैफली आणि जेवणावळी
घर कसं बहरुन यायचं.
तुझ्या हास्य विनोदाने
खळखळून हसणारं तुझं घर
आज भकास उदास
तुला न पटणारे अश्रु ढाळत
मुसमुसत बसलंय
कुणी कुणाला धीर द्यावा
सारेच पोरके झालेत.
एका क्षणात सारं
ओरबाडून हिसकावून कसे
परांगदा झाले नशीब
भिंती दारं छप्पर घराचे
भिर भिर शोधताहेत
कसनुसे होऊन
बसतील गपगुमान
पण तिचं काय !!!!!
त्या आणाभाका
सप्तपदीची सात वचने
सारे सारे कसे काय
विसरुन गेला निघून
न सांगता न निरोपता
एका क्षणात अनवाणी
घराबाहेर पडला
तो परतलाच नाही.
तासंतास मंत्रजप
कुठल्या कुठल्या धर्माच्या
त्या प्रार्थना !!!!!
काहीच कसं आडवं
आलं नाही किंवा कसं
अडवलं नाही त्या काळाला
त्या यमराजाला !!!!!
हाकेच्या पल्याडचा
प्रवास एकट्याने
तो ही अनंतकाळाचा
लोकं म्हणतात
संपलंय वास्तव्य तुझं
कसं शक्य आहे
तुझा वावर आहेच
घरात, तिच्या तनामनात
तिथवर इतर कुणी
येतच नाही
कुणीही येतच नाही.
– रचना : सौ.राधिका इंगळे, देवास, मध्य प्रदेश