जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुरणपूर केंद्रशाळा उक्कलगाव तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, या शाळेत मकरसंक्रांति पर्वानिमित्ताने विद्यार्थ्यांना आनंद मिळावा आणि पतंग उडवण्याचे सुयोग्य कौशल्य प्राप्त व्हावे या हेतूने शाळास्तरावर पतंग महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कोणत्या प्रकारचा मांजा वापरावा, धागा कसा बांधावा, शेपटी कशी जोडावी याबरोबरच मुलांना मांजा बांधणे, पतंग उडवणे, आसरी गुंडाळणे आणि ढील देणे ही कौशल्य शिकविण्यात आली. शनिवारी काही मुले शाळेतील वर्गशिक्षक रज्जाक शेख यांना म्हणाली की “सर आम्हाला सोमवारी सुट्टी द्या, आम्हांला घरीच पतंग उडवायची आहेत.” यावर शिक्षक रज्जाक शेख विद्यार्थ्यांना म्हणाले, “तुम्ही सोमवारी शाळेत या, आपण इथेच सर्व खूप धमाल करू”.
दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुले सोमवारी शाळेत आल्यावर सरांनी गावातील दुकानातून काही पतंग विकत आणले, काही विद्यार्थ्यांच्या घरी अगोदरच खरेदी केलेले पतंग शाळेत मागविण्यात आले अन त्या पतंगाला दोरे लावून सुरू झाली धमाल. शाळेत असलेल्या म्युझिक सिस्टमवर स्वतःचा मोबाईल लावून सोबत “उडी उडी जाये /ढील दे दे रे दे देरे भैया यासारखी पतंग विषेश गीते वाजवण्यात आली. या गीतावर विद्यार्थ्यांनी मनसोक्त नृत्याचा आनंद घेतला.

काहींची पतंग झाडात अडकू लागली, काही तुटली, काही फाटली पण मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बहरत गेला. पतंग उडवताना डोळ्यांची व गळ्याची काळजी कशी घ्यावी याची वेळोवेळी काळजी घेतली गेली. साधारण एक तासांच्या अंतरानंतर मुले थोडीशी थकली. कार्यक्रमात तिळगूळ वाटपाचा उपक्रम घेण्यात आला. मुलांच्या ओठावर तिळगुळाच्या गोडव्याने शाळेतील पतंग महोत्सवाला चार चांद लागले.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800