Monday, October 27, 2025
Homeबातम्या'कुष्ठरुग्ण : दृष्टीकोन बदलणे गरजेचे' – ॲड प्रमोद ठाकूर

‘कुष्ठरुग्ण : दृष्टीकोन बदलणे गरजेचे’ – ॲड प्रमोद ठाकूर

कुष्ठरोग निवारण समितीच्या पनवेल जवळील नेरे येथील इस्पितळातील बरे झालेल्या रुग्णांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन हा कलुषितच असून अनेकदा त्यांच्या नातेवाईकांनीही या व्यक्तींशी संबंध तोडल्याचे आढळत असल्यामुळे रुग्णांकडे तसेच बरे झालेल्या व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे,असे प्रतिपादन या समितीचे अध्यक्ष ॲड. प्रमोद ठाकूर यांनी व्यक्त केली. ‘श्री गजानन महाराज भक्त मंडळ, वाशी’ तसेच ‘युथ कौन्सिल नेरुळ’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी फराळ वाटप व जीवनोपयोगी चीजवस्तूंच्या वितरण, दिवाळी अंक तसेच ब्रेल लिपीतील पुस्तकांच्या प्रकाशन प्रसंगी ठाकूर बोलत होते.
या वेळी विचारमंचावर पनवेलचे ज्येष्ठ कन्सल्टिंग सर्जन डॉ.अरुण रानडे, ब्रेल पुस्तकांचे लेखक व दै. ‘आपलं नवे शहर’चे उपसंपादक राजेंद्र घरत, आर सी एफ च्या मुख्य महाव्यवस्थापक सौ, नंदा कुलकर्णी, ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ संस्थेचे संस्थापक गणेश हिरवे, ‘ज्येष्ठ नागरिक संघा’च्या रुग्णसेवा केंद्राचे अध्यक्ष रणजीत दिक्षित, ‘श्री गजानन महाराज भक्त मंडळा’चे उपाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, पत्रकार वैभव पाटील हे उपस्थित होते.

या ‘कुष्ठरोग निवारण समिती’च्या कामाला योग्य ते सरकारी पाठबळ मिळत नसल्याची तसेच या जागेवर अनेकांचा डोळा असून कदाचित त्या जागेच्या रक्षणासाठी भविष्यात संघर्ष करावा लागेल असेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

या प्रसंगी ‘जॉय’ या गणेश हिरवे संपादित दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. श्री राजेंद्र घरत यांनी लिहिलेल्या ‘दृष्टीआड सृष्टी’ आणि ‘शाली आणि माली’ या ब्रेल लिपीतील त्यांच्या एकोणतिसाव्या व तिसाव्या पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी पार पडले.

शरीराचा कुष्ठरोग एकवेळ औषधांनी बरा होईल; प़ण मनाच्या कुष्ठरोगाचे काय करणार ? असा प्रश्न यावेळी केलेल्या भाषणात उपस्थित करुन लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये चोर, डाकू, दरोडेखोर, लुटारु, भामटे बिनबोभाट प्रवास करतात; मात्र कुष्ठरोग्यांकडे मात्र अशा प्रवासात तिरस्कृत नजरेने पाहिले जाते असे सांगत आपल्या डोळ्यावर अलीकडेच करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेचा संदर्भ देत घरत म्हणाले की अंधांना किती व कसकशा समस्यांना सामोरे जावे लागते त्याचा अंशतः अनुभव आपल्याला त्यानंतरच्या काळात घेता आला. ब्रेल लिपीतील पुस्तकांसाठी लेखन करताना तो उपयोगी ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.

वृध्दाश्रम व अनाथाश्रम हे जवळजवळ असावेत; जेणेकरुन वृध्दांना नातवंडांच्या भेटीचा आनंद घेता येईल अशी अपेक्षा यावेळी ज्येष्ठ सर्जन डॉ.अरुण रानडे यांनी व्यक्त केली. कट, कमिशनच्या प्रस्थापित रचनेत आपण बसत नसल्याने २७ वर्षे चालवलेले हॉस्पिटल बंद करुन अन्य पर्याय अवलंबले असल्याचे सांगून डॉ. रानडे म्हणाले की बालकांना चांगल्या, सत्वयुक्त अन्नापेक्षा चटपटीत, आजारांना कारण ठरणारे अन्न खाण्याची सवय लागली आहे, ती तोडायला हवी.

यावेळी डॉ. रानडे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. नंदा कुलकर्णी यांनी त्यांनी हाती घेतलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

विजय दाजी सावंत व रमेश सुर्वे या सदस्यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच रणजीत देशमुख यांचा रुग्णसेवेबद्दल सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि नेटके सूत्रसंचालन युथ कौन्सिल, नेरूळ’चे सचिव सुभाष हांडे देशमुख यांनी केले. गजानन महाराज भक्त मंडळाचे उपाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी आभार मानले.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दोन्ही संस्थांच्या सक्रिय सदस्यांनी परिश्रम घेतले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments