मराठी साहित्याच्या दरबारातील ज्येष्ठ साहित्यिक कै.वि वा शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कौटुंबिक जीवनात ‘तात्या’ या नावाने म्हणून ओळखले जाणाऱ्या वि वा शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ ला पुणे येथे झाला.पण लवकरच तात्या नाशिकजवळच्या निफाड तालुक्यातील शिरवाड या मूळ गावी स्थायिक झाले. दोन चार वाकडय़ातिकडय़ा रेघा माराव्यात तसे दोन चार रस्त्यांचे हे गाव. शिरवळपासून पाच मैलांवर असलेल्या पिंपळगाव बसवंत येथे वकिली करणाऱ्या रंगनाथ शिरवाडकर यांच्या सात मुलांपैकी गजानन म्हणजेच कुसुमाग्रज हे नंबर दोनचे. १९२०/२१ च्या सुमारास शिरवाडकरांच्या घराण्यातील भाऊबंद वामनराव यांचे निधन झाल्यावर त्यांच्या पत्नीने कुसुमाग्रजांच्या वडिलांना विनंती केली की तुमचा दुसरा मुलगा गजानन मला दत्तक द्या. वडिलांनी ही विनंती मान्य केली व गजानन रंगनाथ शिरवाडकर दत्तक होऊन विष्णू वामनराव शिरवाडकर झाले. पण दत्तक विधान नावापुरतेच. दुर्दैवाने या दत्तक आईचेच लवकर निधन झाल्यामुळे तात्यांना घर मात्र बदलावे लागले नाही. मग प्राथमिक शिक्षण पिंपळगावमध्ये व माध्यमिक शिक्षणासाठी ते नाशिकला न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाले. १९२९ साली तात्या मॅट्रिक पास झाले ही बातमी अंथरुणावर खिळलेल्या आईला समजताच तिचा निस्तेज चेहऱ्यांवर समाधानाची एक लहर चमकून गेली व त्यानंतर काही दिवसांतच तिने शेवटचा श्वास घेतला. वडिलांचेही 1941साली पिंपळगावला दु खद निधन झाले. वडील भाऊ आधीच गेल्याने इतर सहा भावंडांची जबाबदारी तात्यांवर आली.
तात्यांच्या वडिलांना साहित्याचे चांगलेच आकर्षण होते त्या काळात त्यांच्या घरात केसरी, नवाकाळ, आनंद येत. अनेक पुस्तकेही यायची त्यामुळे लहानपणापासूनच तात्यांच्या मनात वाचनाची आवड निर्माण झाली. तात्यांचे एक मामा कादंबरीकार तर दुसरे कवी होते त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन तात्या कविता करू लागले. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील कविता ‘बालबोधमेवा’ या मासिकाचे संपादक देवदत्त नारायण टिळक यांनी प्रसिद्ध केल्या.
बीए झाल्यावर पुढील दहा पंधरा वर्षे तात्यांच्या जीवनात युद्ध पर्वच होते ब्रिटिशांचे राज्य असल्याने सरकारी चाकरी करायची नाही हा निश्चय कायम होता. मुंबईत सिनेमाचे दार ठोठावले, पण गुजराती, पारशी, पंजाबी यांचे प्राबल्य असलेल्या या व्यवसायात त्यांना तिथे कोणी पायही ठेवू दिला नाही. पुण्याला जाऊन प्रभात मध्येही प्रयत्न केले पण तेथेही निराशाच पदरी पडली त्याचवेळी नाशिकला दादासाहेब फाळके यांचे शिष्य शिंदे यांनी गोदावरी सिनेटोन नावाची कंपनी सुरू केली त्यात काम मिळाले. एका चित्रपटात लक्ष्मणाचा रोलही केला. पण कंपनी फार काळ टिकली नाही व तात्या मुंबईला परतले.
लाखो लोकांच्या मुंबईत तात्या एकटेच होते ना कोणाची ओळख ना खिशात पैसा होता. दिवसा नोकरीच्या शोधात वणवण फिरावे व रात्री कुठेतरी आसरा घ्यावा अशी परिस्थिती होती. याच खडतर काळात त्यांनी अनुभवली ती सामान्य माणसाच्या जीवनातील आग. त्यांच्या काव्यांमधून दुर्बलता बद्दलची जी सहानुभूती दिसते त्याचे कारण हे त्यांचे उमेदवारीच्या काळातले दिवस .नंतर त्यांना धनुर्धारी मासिकात नोकरी मिळाली दादरमध्ये राहावयास खोली मिळाली आयुष्याला थोडे स्थैर्य आले .तात्यासाहेबांच्या अनेक कविता या काळात जन्मल्या त्यांच्या कवितांचा पहिला काव्यसंग्रह विशाखा याच काळात प्रसिद्ध झाला.त्याला प्रस्तावना लाभली होती वि स खांडेकरांची.
विशाखाने साहित्य क्षेत्रात क्रांतीची राळ उठवून दिली. भारलेपण म्हणजे काय हे त्या काळात खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळाले ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार ‘या कवितेने समाजमन पेटून उठले होते .गर्जा जयजयकार ने जितकी क्रांती घडवली तितकेच ‘काढ सखे गळ्यातले चांदण्याचे हात’ या कवितेने मनाचा हळुवार कोपरा हळवा केला .’उठा उठा चिऊताई’ सारखी बालकविता लिहिणाऱ्या तात्यासाहेबांनी ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ ही गहन कविताही लिहिली .विशाखाचा प्रभाव तत्कालीन साहित्यिकांवर ही पडला. पू लं देशपांडे म्हणतात, “फलज्योतिष्य माणसाचे जन्मनक्षत्र पाहतात मला या शास्त्रातले अजिबात गम्य नाही .त्यामुळे माझे जन्म नक्षत्र मला ठाऊक नाही.परंतु माझे तारुण्य जन्माला आले ते कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याच्या आकाशात सोडलेल्या विशाखा नक्षत्रावर”.
स्वातंत्र्यापूर्वीचा तो भारलेला काळ होता .तसाच खांडेकर फडके यांच्या साहित्याचा प्रभाव असलेलाही.भगतसिंग राजगुरू, चंद्रशेखर आझाद यासारख्या क्रांतिकारकांचा बलिदानाने समाजात प्रक्षोभ उसळला होता. “विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची” असे म्हणणारे तात्या अन्यायाचा प्रतिकारार्थ होणाऱ्या आंदोलनात नेहमीच भाग घेत असत. अस्पृश्यांना काळाराम गोरा राम मंदिर खुले करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली .स्वातंत्र्य चळवळ संयुक्त महाराष्ट्र आंदोलन व गोवामुक्ती आंदोलनाशी त्यांचा निकटचा संबंध होता. धगधगत्या क्रांती पर्वाचा प्रवास सुरू होता त्यातूनच त्यांचे जीवनलहरी, किनारा, मराठीमाती, वादळवाट हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कविता म्हणजे छंदबद्ध रचना, लयदार मांडणी, श्रीमंत कल्पनाविलास, चपखल शब्द योजना आणि सूक्ष्मनिरीक्षण यांचा आविष्कार आहे. म्हणूनच तर ते आपल्या कवितेविषयी म्हणतात ‘तुम्ही जेव्हा माझ्या कवितेशी बोलता तेव्हा माझ्याशी बोलू नका, कारण माझ्या कवितेत मी असेन बराचसा बहुधा पण माझ्या बोलण्यात मात्र तुम्हीच असाल पुष्कळदा”.
कवी म्हणून कुसुमाग्रजांची वाटचाल सुरू असताना साहित्य संघाच्या डॉक्टर भालेराव यांच्या आग्रहामुळे तात्यासाहेब नाटकाकडे वळले. ऑस्कर वाइल्ड यांच्या एका गाजलेल्या नाटकावरून ‘दूरचे दिवे’हे नाटक त्यांनी लिहीले. मग सुरू झाला तो नाटककार वि वा शिरवाडकर यांचा नाटय़प्रवास. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, राजमुकुट, आनंद ,कौंतेय, एक होती वाघीण, ययाती आणि देवयानी, बेकेट यासारखी नाटके जन्माला आली. पण या सर्वांवर कडी करणारे व मराठी माणसाच्या मनात मानाचे स्थान असलेले नाटक शिरवाडकरांनी लिहिले ते म्हणजे नटसम्राट.
मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते नानासाहेब फाटक यांच्यासाठी किंग लियरचे रुपांतर करण्याची योजना त्यांच्याकडे आली. रुपांतर करता करता एक वयोवृद्ध नटसम्राट शिरवाडकरांच्या मनात उभा राहिला व हळू हळू साकार झाली ती आप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा. एकेकाळी रंगभूमीचा सम्राट असलेल्या कलावंतांची वृध्दापकाळात होणारी शोकांतिका हा नटसम्राट चा विषय प्रेक्षकांना भावला. नटसम्राट ने वृद्धत्वाच्या समस्यांना आणि त्यांच्या आयुष्यातील उत्तरकाळाला न्याय मिळवून दिला असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
“खळखळू द्या अजय शृंखला हातापायात,
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात,
कशास आई भिजवी सी डोळे, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषःकाल”
आपल्या कवितेत असा आशावाद व्यक्त करणाऱ्या या कवीला १९८७ चा भारतात साहित्यासाठी देण्यात येणारा सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.१९६५ सालापासून स्व.श्रीमती रमा जैन यांच्या प्रेरणेने या पुरस्कार प्रदानास प्रारंभ झाला.पण हा पुरस्कार मराठी भाषेला तब्बल नऊ वर्षानंतर 1974 साली कै. वि स खांडेकर यांच्या रूपाने मिळाला. त्यानंतर 13 वर्षानंतर वि वा शिरवाडकर यांना.
त्या वर्षी ज्ञानपीठ प्रवर परिषदेच्या निवड समितीचे अध्यक्ष होते माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव.आपल्या मनोगतात ते म्हणतात,”उनकी कविता ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ने अनेक स्वतंत्रता सेनानी को उत्साहित किया।उसके प्रेरक शब्द ऊस समयके प्रत्येक मराठी भाषिकोंके ओठोपर थिरकते थे।ऊस संकलन की बहुतसी कविताओमे हमारे स्वतंत्रता संग्राम की मुखर अभिव्यक्ती हुई है।मराठी के रसिक अपनोको संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, केशवसुत के
चिरऋणी तो मानते आये है,अब वे कुसुमाग्रज को भी इसी श्रेणी मे रखते है।जिन्होने अपने पुर्वजोंसे प्राप्त जीवन मूल्योकी विरासत को संवारा-संजोगा है।”
ज्ञानपीठ पुरस्काराचा वितरण सोहळा हा एरव्ही दिल्लीत होत असतो.पण तात्यासाहेबांच्या इच्छेनुसार मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात हा सोहळा दिमाखात पार पडला.तात्यासाहेबांवर आणि त्यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी रसिकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.दुसऱ्या दिवशीच्या झाडून साऱ्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर ठळक मथळ्याखाली फोटोसकट सविस्तर बातम्या झळकल्या.नाशिकला तात्या साहेबांच्या घरी पेपर टाकणाऱ्या मुलाने त्या दिवशीची सगळी वर्तमानपत्रे एकत्र करून ती रंगीत रिबीणीने बांधली व त्यावर गुलाबाचे फुल चिकटवून तात्यासाहेब झोपेतून उठण्यापूर्वीच त्यांच्या खोलीत ठेवून दिले.तात्यासाहेब उठल्यावर त्या गुलाबाचा दरवळ संपूर्ण खोलीत पसरला होता.तो सुवास होता मराठी माणसांच्या तात्यासाहेबावरील स्नेहाचा, प्रेमाचा.
याच स्नेहापोटी1989 साली तात्याना पहिल्या मराठी जागतिक संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी केलेल्या अध्यक्षीय भाषणात तात्यासाहेबांनी मराठीच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा मुद्दा मांडला होता. ‘मराठी भाषा ही डोक्यावरती सोनेरी मुकुट व अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत अजूनही मंत्रालयाच्या दारात उभी आहे. ‘असे मराठी भाषेचे यथार्थ वर्णन करणाऱ्या तात्यासाहेबांच्या विधानात आज बत्तीस वर्षानंतर जराही फरक पडलेला नाही. आजही मराठीची स्थिती अशीच खालावलेली आहे.
कविवर्य वसंत बापट यांनी त्यांच्या खालील कवितेत व्यक्त केलेले विचार हे प्रत्येक मराठी माणसाने कुसुमाग्रज या कविवर, वि वा शिरवाडकर नावाच्या नाटककारावर आणि तात्यासाहेब या व्यक्तीवर केलेल्या प्रेमाचे द्योतक आहे. वसंत बापट म्हणतात,
हे कुसुमाग्रज! तुम्ही रहिवासी गगनाचे,
परि कृतार्थ केली तुम्ही मराठी माती
या मातीमधल्या अगण्य अणुरेणू ची
जोडलीत साऱ्या नक्षत्रांशी नाती!
जोडलीत साऱ्या नक्षत्रांशी नाती !

— लेखन : प्रशांत कुलकर्णी. अबुधाबी/पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800