कविवर्य कुसुमाग्रज हे मराठीचे मानबिंदू आहेत. त्यांची साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी पाहता त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, असे प्रतिपादन साहित्यिक नागेश शेवाळकर यांनी केले. ते भारतीय जैन संघटना संचालित माध्यमिक विद्यालय, पिंपरी पुणे यांनी आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रा. दिलीपकुमार देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र कोकणे आणि संजय जाधव उपस्थित होते.
नागेश शेवाळकर यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवनातील काही आठवणींना या प्रसंगी उजाळा देताना एक खंत व्यक्त केली की, आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. आज भ्रमणध्वनीचे युग आहे पण आपण त्यावर संवाद साधताना मराठी भाषेचा वापर करीत नाहीत. इंग्रजी भाषा वापरून मराठीत संवाद साधतो ही परिस्थिती बदलली पाहिजे. आवश्यक नसेल तेव्हा आवर्जून मराठी भाषेत संवाद साधायला हवा.
तसेच शेवाळकर यांनी कुसुमाग्रजांच्या ‘माझं मराठीपण मी शोधलं’ ह्या कवितेचे वाचन केले. भविष्यात कोणते क्षेत्र निवडायचे ते विचारपूर्वक निवडून त्यात यश मिळवण्यासाठी भरपूर कष्ट करुन प्रामाणिकपणे, इमानदारीने यश मिळवा हे सांगताना कॉपी करु नका असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. कॉपी संदर्भातील काही गमतीदार घटना त्यांनी ऐकवल्या. शिक्षण संपले की मुलाखतीचे सत्र सुरु होते. तेव्हा मुलाखतीला ठामपणे आणि आत्मविश्वासाने सामोरे जा हे सांगताना त्यांनी एक गमतीदार किस्साही सांगितला तसेच प्रा. राम शेवाळकर आणि गुरुवर्य नरहर कुरुंदकर यांच्यातील रंगलेल्या मुलाखतीची गोष्ट सांगितली. शेवटी आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक आहे तेव्हा विचारपूर्वक मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही त्यांनी केले.
याच कार्यक्रमात शेवाळकरानी त्यांची विविध विषयांवरील अकरा पुस्तके आणि इतर चार लेखकांची पुस्तके संस्थेला भेट दिली.
प्रा. दिलीपकुमार देशमुख यांनी या प्रसंगी मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्या मागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैष्णवी सूर्यवंशी, सूत्र संचालन राजश्री तांबे, आभार प्रदर्शन अमेय खुर्पे यांनी केले. तर शेवाळकर यांचा परिचय महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ साहित्यिक संपत गर्जे यांनी करुन दिला.
विविध स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नागेश शेवाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विविध मान्यवर, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
खूप खूप धन्यवाद, सर.
अत्यंत आकर्षक , देखण्या स्वरूपात बातमी प्रकाशित केली आहे. आभारी आहे.