“कृतज्ञ मी, कृतार्थ मी” हे आत्मकथनपर पुस्तक हाती आले आणि झपाटून वाचून काढले. तसं आत्मचरित्रांची पुस्तके मला जास्त आवडतात.
शिक्षण क्षेत्रात अव्याहतपणे काम करणाऱ्या एका अध्ययन आणि अध्यापनशील शिक्षकाची ही प्रेरणादायी कहाणी आहे.
तसं पाहिलं तर शिक्षणक्षेत्रात अनेक शिक्षक अध्यापनाचे कार्य सातत्याने करीत असतात तेंव्हा या लेखकाचे असे कोणते मोठे कार्य आहे की लोकांनी ते उत्कंठा पूर्ण वाचावे, आणि अनुकरण करावे असे त्यांचे काम आहे कां ? असा प्रश्न हे पुस्तक वाचण्यापूर्वी माझ्या मनात आला. मात्र त्याला या पुस्तकातून चांगल्यापैकी उत्तर मिळाले !
१९७० च्या दशकात शिक्षणाचा प्रसार झाला असला तरी खेड्यामध्ये शिक्षण घेणे अडचणींचे व बरेचसे अवघड होते. अनेक घरातील पहिली पिढी शिक्षणाकडे वळत होती. ग्रामीण भागातील शिक्षणाच्याबाबतीत प्रतिकूल परिस्थितीतही उच्च शिक्षणाची उमेद काही ठिकाणी पहावयास मिळाली. या उमेदीची परिणती उच्च शिक्षण घेऊन आपला ठसा उमटविण्यात झाली अशा यशस्वी व्यक्तींमध्ये या आत्मचरित्राचे लेखक
डॉ. भिवा गोबजी वाघ यांची गणना निश्चितच होऊ शकते. रूरल ते ग्लोबल असा एक व्यापकपट घेऊन आयुष्याची सुविहीत मांडणी करणाऱ्या एका शास्त्रप्रिय शिक्षकाचा हा जीवनपट म्हणजे एक चांगल्या कादंबरीचा विषय होईल.
जीवनाच्या वळणवाटांवर भेटलेली अनेकविध माणसं या शिक्षणप्रवाहात येतात. कधी ती अनुभव देतात तर कधी नातं निर्माण करतात. त्यांचा अत्यंत साध्या सोप्या भाषेत गुंफलेला शेला म्हणजे हे पुस्तक होय.
आपल्या नोकरीची सुरुवात, वाघ यांनी मध्यप्रदेश राज्यातील अंबिकापूर येथे आकाशवाणी केंद्रात इंजिनिअर असिस्टंट म्हणून केली. ते शहर आता छत्तीसगड राज्यात गेले आहे. तेथून त्यांची काही वर्षानंतर महाराष्ट्रात जळगाव आकाशवाणी केंद्रात बदली झाली. त्यांना मुळात शिक्षण क्षेत्रात सेवा करण्याची इच्छा होती.
जळगांव आकाशवाणी केंद्रात अडीच तीन वर्षे काम केल्या नंतर त्यांनी केंद्र शासनाच्या या महत्त्वाच्या नोकरीला रामराम ठोकून शिक्षणक्षेत्रात सेवा निवृत्ती पर्यंत विविध पदांवर आपल्या कामाचा ठसा उमटविला.
वाघ सरांनी शिक्षण क्षेत्रातील ३६ वर्षात नासिकच्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून १७ वर्ष तर उच्च शिक्षण समन्वयक म्हणून के के वाघ एज्युकेशन संस्थेत तीन वर्षे सेवा केली.
नासिकच्या नवजीवन शिक्षण संस्थेत प्रमुख सल्लागार म्हणून त्यांनी काम केले.
एम् एस्सी नंतर ते एम फिल, पी एच डी झाले. दक्षिण कोरियातील सायन्स व टेक्नॉलॉजी संस्थेत वर्षभर प्रशिक्षण घेतले. डॉ. वाघ यांचा शिक्षण क्षेत्रातील व्यासंग लक्षात घेऊन पुणे विद्यापीठात विविध अभ्यासक्रम समितीत तज्ञ सदस्य म्हणून तर काही अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी विज्ञान शाखेतील विविध अभ्यासाची सतरा पुस्तके आणि बरेचसे संशोधन पेपर्स लिहिले आहेत.
अमेरिकेत न्युयाँर्क अँकेडमीचे सदस्य तसेच इंडियन जर्नल आँफ रिसर्च स्टडीजच्या आणि अँपलाइड सायन्सच्या नियतकालिकात संपादकीय सल्लागार
बोर्डाचे सदस्य म्हणून डॉ. वाघ यांनी कार्य केले आहे हे सर्व या पुस्तकात ओघाने दिले आहे.
अमेरिका, चीन, जपान, न्युझिलंड, दक्षिण कोरिया, सिंगापूर इत्यादी ठिकाणी संयोजित विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय परिषदात भाग घेऊन त्यांनी संशोधनात्मक प्रबंध सादर केले आहेत.
या आत्मकथनात डॉ. वाघ यांनी शिक्षणाबरोबरच कौटुंबिक जीवनही चांगल्याप्रकारे रेखाटले आहे. शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांचे शेतीविषयक प्रेम उपजत आहे. शेतकऱ्यांची शेती करतांना होणारी ओढाताण त्यांनी स्वतः अनुभवली आहे त्यावर त्यांनी उपाययोजना शोधली आहे.
आकाशवाणीत नोकरी करत असतांना त्यांनी
पदव्युत्तर शिक्षणाची कांसही धरून पुढे शिक्षण क्षेत्रातील नोकरीतही उच्च शिक्षण संपादन केले. डाँक्टरेट मिळवली हे विशेष !, आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी अनेक संस्थांचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. स्वताःची प्रगती करत असतांना आई वडिलांची काळजी, भावांचे व इतर नातेवाईकांचे शिक्षण आणि आपल्या मुलांना उच्च शिक्षित करणे या बाबीही यशस्वीरीत्या पार पाडल्या.
प्राचार्य झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. स्वतः ग्रामीण भागातून आल्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांपुढील अडचणींची कल्पना असल्याने त्यांना मदत करण्याकडे त्यांचा कल राहिला.
वैयक्तिक नातेसंबंध, मित्र आणि हितचिंतक याविषयी त्यांनी मनमोकळेपणाने अगदी नावासकट वर्णन केले आहे.
विशेष म्हणजे या आत्मकथनात त्यांनी गुण आणि दोषांचे त्याचप्रमाणें चुकांबद्दल प्रामाणिकपणे कथन केले आहे. खेड्यातून आलेल्या, कुठलीही सहज सुविधा न मिळालेला पण शिक्षणाच्या प्रेमापोटी एका विशिष्ट पदापर्यंत पोहचलेला आपल्या सारखा माणूस तयार करण्याची एक प्रकारची कृतज्ञताच त्यांनी आत्मकथातून ग्रथित करण्याचा प्रयत्न केला आहे. कृतज्ञ असल्याशिवाय कृतार्थाकडे वाटचाल होऊ शकत नाही. ही कृतज्ञता गांव, व्यक्ती, कुटुंब आणि देश अशा सर्वांबद्दल सांगण्याची कहाणी म्हणजे हे पुस्तक आहे !
– लेखन : सुधाकर तोरणे, निवृत्त माहिती संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800