काही दिवसांपूर्वी आमच्या घरी खूप चर्चा रंगली होती. विषय होता, कृत्रिम बुद्धिमत्ता…! इतक्या लवकर कृत्रिम बुद्धिमत्तेचा धुमाकूळ सुरू होईल असे मला वाटले नव्हते. आपल्या नातवंडांसाठी एक वेडी आशा घेऊन मी बसले होते. पण आता चित्र स्पष्ट दिसत आहे. येत्या 8, 10 वर्षातच हा ज्ञानरुपी राक्षस ? अनेकांना गिळंकृत करेल अशी भीती वाटते. मग ते क्षेत्र कोणतेही का असो.
घरी चर्चा करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातील होते. त्यात संगीतकार, अमेरिकेत राहून भारतासाठी स्वस्त इंक्युबेटर बनवणारे इंजिनियर, आय आय टी चे संचालक, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, सी ए., बँक मॅनेजर, डॉक्टर असे विविध नातेवाईक होते.
मी शिक्षण क्षेत्रातील असल्याने साहजिकच मला त्यात जास्त रस. खरेच, चॅट जीपीटी मुळे मुलांनी लिहिलेल्या कविता, निबंध यामुळे शिक्षक कितपत मुलांचे मूल्यमापन करू शकतील ? एका क्षणात मोठमोठ्या परिच्छेदाचा अनुवाद अगदी साध्या मोबाईल मध्ये देखील करता येतो हे बघूनच अवाक होते मी. मग आता अनुवादकाची गरज काय असे प्रश्न पडतात. आधीच आपण बघितले आहे की कोरोना काळात अनिवार्यच असल्यामुळे किती तरी मुले नंतर मोबाईलला वश गेली. काहींना इतके व्यसन जडले की पालकांना समुपदेशकांकडे धाव घ्यावी लागली. हा एकलकोंडेपणा वाढीस लागेल का ? का त्याचे फायदे अधिक होणार ?
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षकांजवळ मुलांचे हावभाव, आवाज, त्यांची टाईप करण्याची विशिष्ट शैली यांचे विश्लेषण करण्याची क्षमता वाढेल आणि त्याप्रमाणे त्याची भावनिक अवस्था तो ओळखून तसे अभ्यासक्रम बनवू शकेल हे खरे होईल का ? आपल्या देशातील लोकसंख्या आणि गावागावात न् पोचलेले नेटवर्क, याचे काय ? मुलांची भावनिक क्षमता जाणून घ्यायला जर कृत्रिम बुद्धिमत्तेची गरज असेल तर शिक्षक, शिष्य यांचे नाते कसे असेल ? शिक्षकांची गरज उरेल का ? मुलांची सर्वच माहिती जर शाळांजवळ असेल तर आजकालच्या खासगी शाळा त्याचा दुरुपयोग तर करणार नाही ना ?
डॉक्टर्सना वेगळीच काळजी वाटते. इतके परिश्रम करून, 10 वर्षे त्यात घालून जर आपले काहीच महत्व उरणार नसेल तर काय उपयोग ? यात मोठं मोठ्या हॉस्पिटल्स चे चांगलेच फावणार.कारण आरोग्य सेवेच्या नावाखाली भारतातील 150 कोटी लोकांचा डेटा त्यांच्याजवळ असेल आणि ते त्याचा दुरुपयोग करणार नाही हे कशावरून ? तुम्हाला फोन येईल, तुम्ही या रोगाचे बळी होणार आहात ताबडतोब इस्पितळात भरती व्हा. माणूस त्याला शरण जाणार कारण तुमचे इन्श्युरन्स चे प्रीमियम वगैरे सारेच त्यांच्या हातात !
अर्थात आपल्या देशात अजून तरी लहान इस्पितळात असे सर्व करणे फारच खर्चिक असेल. आपण अजून ही केमिस्टकडे जाऊन स्वतः औषधे घेतो. पण पुढे काय ? आपली फॅमिली डॉक्टर ही संज्ञा तर आधीच संपुष्टात आली आहे.डॉक्टर – रुग्ण नातेसंबंध जवळ जवळ संपतीलच आणि आपल्या देशाची गरीबी तो ही मुद्दा आहेच. या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक डॉक्टर्सच्या नोकऱ्या जाणार, सेवा खंडित होणार हे निश्चित.
अमेरिकेत वकिली करणारा भाचा आधीच म्हणाला, नवनवीन टूल्स निघाल्यामुळे काही प्रमाणात वकिलांचे प्रस्थ कमी झाले आहे. आपल्या येथे तर अनेक कोर्टात हातात कागद, स्टॅम्प पेपर घेऊन फिरणारे वकील मी बघितले आहेत. आता चॅट जीपीटी मुळे ड्रॅफ्टिंग वगैरे कामांसाठी त्यांची गरजच भासणार नाही असे दिसते.
अर्थात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नव्या संकल्पना रुजू होतील, नवे अभ्यासक्रम येतील ही शक्यता आहे. माझ्या परिचयातील दोन तरुण मुली कार्पोरेट लाँ मध्ये सध्या खोऱ्याने पैसा ओढत आहेत. हे पूर्वी कुठे होते ? SUPACE आणि SUVAS. या टूल्समुळे सामान्य बाबींसाठी वकिलांची गरज भासणार नाही असे ती म्हणते. म्हणजे पुनः भीतीच की !
आजकाल सर्वच उद्योग क्षेत्रात इंजिनियर्स हवे असतात. कोडिंग, डिकोडिंग इतर कामे करण्यासाठी. पण आता ते सुद्धा अपुरेच पडेल. त्यामुळे तशी नवीन विचारसरणी येतेय. मी वर जरी दोन तीनच क्षेत्रांबद्दल लिहिले असले तरी सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा विस्तार केवढा मोठा आहे, हे सगळे समजतात. अगदी शेअर बाजार, शेती पासून संगीत, चित्रकला पर्यंत कुठलाही विषय त्याला वर्ज्य नाही. संगीतकार शंकर महादेवन यांना हा प्रश्न विचारला होता पण त्यांचे म्हणणे पडले की, प्रत्येक संगीतकाराची शैली वेगळी असते. ते कृत्रिम बुद्धिमत्त्ता कसे करणार ? पण शास्त्रज्ञ म्हणतात की, हाच मूलभूत फरक आहे. एक डॉक्टर अभ्यास करून, आपल्या बुद्धीचा वापर करून निदान करेल तोवर कृत्रिम बुद्धिमत्ता असंख्य डॉक्टर्सच्या मदतीने चुटकी सरशी अचूक निदान करू शकेल. एक गायक आपला रियाज करून कला सादर करेल तोवर हे तंत्रज्ञान अनेक गायकी, शैली यांचा मिलाफ करून उत्कृष्ट गीत सादर करू शकेल. लोक कोणाकडे जातील, अचूक निदान करणाऱ्याकडे की एका डॉक्टरकडे ?
या आभासी सत्यामुळे आपल्या लहान पिढीचे कसे नुकसान होतेय हे सर्व मान्य करतात पण ते हतबल आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या आत्मवृत्तात किती आधीच लिहिले होते की, येणारा काळ कठीण असेल. हे तंत्रज्ञान तुमच्या फोटोंचा कसा, कधी उपयोग करेल कळणार नाही. पुढाऱ्यांसाठी त्रास होईल आणि ते कसे ट्रोल केले गेलेत हे आपण वाचलेच. आपल्याच पाल्याचे नुकसान करणारेही मी बघितले.
व्हाट्सएपच्या काही चित्रकला ग्रुपची मी सदस्य आहे. त्यात येणारी, स्वतःच्या नावाने किंवा मुलांच्या नावाने दिलेली चित्रे बघून मी थक्क होत असे. पण एकाने लिहिले की, ही चित्रे कृत्रिम बुद्धिमत्तेने बनविली आहेत. कशासाठी हा खोटा कौतुकाचा अट्टाहास ? आता तर मला कुठलाच व्हिडीओ खरा वाटत नाही. हे ही एक प्रकारचे वैषम्यच ना ?
कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकत नाही ? तुम्ही इच्छा धरा की मी पॅरिस मध्ये फिरतेय आणि तसा हेडसेट लावताच 5 मिनिटात तुम्हाला खरोखर असे वाटू शकते की तुम्ही पॅरिस मध्ये फिरताय ! तुम्हाला वाटले की माझ्या मनगटावर सोनेरी, डायमंड चे रेडो कंपनीचे घड्याळ असते तर ? तुम्हाला अशा संवेदना लाभतील की हातावर खरे घड्याळ दिसेल .
अशा अनेक गप्पा रंगल्यात. आभासी जग आणि वास्तव जग मिसळणारे पण ए आर सेट मिळतात, भाऊ सांगत होता आणि मी मनातल्या मनात पुटपुटत होते, ही सर्व माया ब्रह्म सत्य जगत मिथ्या…तो हसू लागला आणि आम्ही विषयच बदलला. Darvin refuted by Yahya khan ..या पुस्तकातील “माया” प्रकरणावरच बोलू लागलो. असो…
विस्तार भयास्तव अधिक लिहीत नाही. माझा प्रश्न एवढाच की खरोखर भविष्य भयावह आहे का ? आपले तर आयुष्य गेले, आपल्या मुलांचेही बरेच सुखकर झाले. नातवंडांचे काय ? तसे तर मला “नया दौर” सिनेमा आठवतो. त्यात टांगा आणि मोटार याबद्दल छान कथा होती. तात्पर्य तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या वाढतात की कमी होतात हा खूप जुना वाद आहे. काही जण म्हणतात नव्या नोकऱ्या वाढतात. पण पूर्वीपेक्षा त्या नक्कीच कमी असतात. आपल्या येथे अजूनही प्लम्बर, सुतार, गवंडी, मजूर मिळतात. अमेरिकेत आताच त्याची वानवा आहे. शास्त्रज्ञ सांगतात, यांची कामे अजून तरी सहजासहजी कृत्रिम बुद्धिमत्तेला जमलेली नाहीत. ते तो अजून शिकतोय.
बघू या पुढे काय काय होते ते !
तुकाराम महाराज म्हणतात तसे, “जे जे होईल ते ते पाहावे”
किंवा …कालाय तस्मे नम: !
— लेखन : सौ. स्वाती वर्तक. खार (प), मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Very well Penned….