आज कृष्ण जन्माष्टमी आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख….
भारत देशाच्या इतिहासात संपूर्ण वेगळे व्यक्तिमत्त्व आहे, ते म्हणजे कृष्ण.
मथुरेत ज्या आईची सात लहान मुले जन्मताच मारली गेली आणि आता हा आठवा हि असाच जाणार अश्या भीतीत जन्माला आलेले निर्भर बालक म्हणजे कृष्ण….
दैवगती आणि नियतीने जो गोकुळात लहानाचा मोठा झाला, द्वारकेत जो नावारूपाला आला असा द्वारकाधीश…
सांदिपनी ऋषीच्या आश्रमात विद्यार्थी बनून जो सुदामासोबत राहिला, आपली गुरुदक्षिणा पूर्ण करून गुरुकडून “मातृ हस्तेन भोजनम” म्हणजे मी कधीही जेवेन तर मला कोणीही आईच्या मायेने जेवण बनवून देईल असा वर मागणारा कृष्ण.
इतर साध्या माणसांसोबत राहणारा कृष्ण, राजनीतिज्ञ असणारा, दिर्घदृष्टी असणारा कृष्ण जो कुटील नाही पण चतुर आहे, पिंपळ वृक्षासारखा एकटा असा कृष्ण… रथांगपाणी असा कृष्ण आणि पारिजात दारात लावून फुले पाडणारा कृष्ण किती रूपे, किती प्रतिमा……
कोणतीही गोष्ट मग ते प्रेम असो, कला वा मैत्री यांना कमजोर होवू न देणारा उलट या बाबी आपले आपली बलस्थानं कशी होतील हे पाहणारा कृष्ण.
कुरुक्षेत्रावर कर्णाला भेटून द्रौपदी हि तुझी होईल असे ऐन युद्धात सांगणारा, कोणाला काय हवे हे जाणणारा, माणसे ओळखणारा असा कृष्ण. वस्त्र देणारा आणि घेणारा असा सारंगपाणी ज्याची अनेक रुपं आणि रंग अगणित असा ………..
गंभीर नसणारा, हसणारा, आणि अनेक रूपे दाखवणारा उत्सव करणारा ज्याला एकदम श्रेष्ठ अश्या गोष्टी आवडतात असा. त्याला प्रिय काय तर लोणी…. गरब्यात रमणारा, बासरी वाजवणारा असा मुरारी……..
गुजरातमधील शामलाजी, डाकोर, नाथद्वारामधील श्रीनाथजी, पुरी येथील जगन्नाथ, पंढरपूरचा विठ्ठल असे विविध स्वरूप………..
ज्याला जसा हवा तसा देव कृष्ण… तुम्हाला हवा तसा तयार होणारा देव…… म्हणजे देव लहान हवा तर तर बाळकृष्ण आणि देखणा, बुद्धीमान हवा असेल तर योगेश्वर ! वैजयंती माला धारण रुक्मिणी कांत..
कृष्ण कधी रागवत नाही आणि बाल स्वरूप देव जसे लहान बाळाचे लाड करतात तसे लाड करून घेतो असा नंदकिशोर. महाभारतात कृष्ण हे पात्र कधी मोठे झाले हे व्यास ऋषी यांना पण समजले नसेल !
कृष्ण कधी अमर होण्याचे वर मागत नाही. उलट तो मागतो तक्षक नावाच्या सर्पाकडून खांडव वन सोडून जाताना “प्रीती पार्थेन शाश्वते” असा वर … पृथाचे पुत्र म्हणजे माणूस मला नेहमी माणसाचे प्रेम मिळो असा देव….. माणसाशी प्रेमाचे नातं बांधणारा असा देव. लोकांना भाव ज्याच्या ठायी येतो असा सगळ्यांना स्वीकार करणारा यादवांचा भाग्यविधाता !! कुब्जाला मनाने आणि शरीराने सुंदर करणारा, घननिळ सावळा, मनमोहन.
प्रत्येक पुरुष जीवनात ३ स्त्रिया निवडतो. पहिली प्रेमिका नंतर पत्नी आणि नशीबवान असेल तर एखादी सखी. राधा, रुक्मिणी, द्रौपदी या तीन नावांना जी लकाकी आहे त्यात कृष्ण सामावलेला आहे. हि तीनही नावे कृष्णाशिवाय अपूर्ण आहेत, असा कृष्ण.
प्रेमपत्र स्वीकारणारा आणि प्रेमविवाह करणारा, मानणारा, विदर्भाची कन्या गौरीपूजा करणारी रुक्मिणी पळवून नेणारा आणि लग्न करणारा ज्यावर न पाहता रुक्मिणीने विश्वास ठेवला असा रुक्मिणीकांत
आणि महाराष्ट्राचा जावई कृष्ण !
कृष्णावर अनेक बाजुंनी लिहिले गेले आहे. मग ते महाभारत असो वा भागवत.
या कृष्णाचा शेवट हि रोचक आहे. एक मुसळ यादव समुद्रात पूर्ण भुगा करून टाकतात ज्याला दुर्वासांचा शाप असतो. द्वारकेपासून दूर प्रभासपाटण येथे इरको नावाचे गवत उगवते. ज्याचा एक शिकारी बाण म्हणून वापर करतो आणि त्या शिकाऱ्यास झोपलेला कृष्ण हरीण असल्याचा भास होतो. अंगठ्याला तीर लागतो आणि भालका तीर्थ ते देवोत्सर्ग जिथे हिरण्य सरस्वती कपिला तीन नद्यांचा त्रिवेणी संगम आहे अश्या ठिकाणी पिंपळाखाली कृष्ण चालत जातो आणि मुक्त होतो तेव्हा त्याच्यासोबत असतो त्याच्या रथाचा सारथी दारूक. महाभारतात कुरुक्षेत्रावर कौरव पांडव युद्धात
अर्जुंनाचा कृष्ण सारथी झाला आणि महाभारत युद्ध पांडव जिंकले असा सारथी पुन्हा होणे नाही. गोपाल या शब्दाचा अर्थ आहे इंद्रियांचे पालन करणारा असा तो गोपाल. अनेक जन गायींचे पालन करणारा तो गोपाल असे म्हणतात.
असा कृष्ण जो सतत पुढे जाणारा आहे मागे न फिरणारा आहे. प्रेमाची वेगळी ओळख निर्माण करणारा राधेपासून दूर असून प्रेम करणारा, मनात तिची आठवण ठेवणारा असा राधाकृष्ण !
नरसी मेहता, मीरा, रसखान पठाण, सूरदास यांनी कृष्णावर अनेक पद रचली. अपार शक्ती असणारा स्वाभाविक बोलणारा असा देव असे कृष्णाचे वर्णन या सर्वांनी केले आहे. नरसी मेहता म्हणतात,
“अखंड रुजी हरी ना हातमा
वालो मारो जुवे छे विचारी
देवावालो नथी दुबलो
भगवान नथी रे भिकारी”
अर्थ असा कि सर्व काही त्या कृष्णाच्या हातात आहे. कृष्ण विचार करून प्रत्येकाला काही तरी देतो. तो काही दुबळा नाही कि तुम्ही त्याला लाडू पेढे द्याल आणि प्रसन्न करालच, अरे भक्तांनो तो काही मागणारा भिकारी नाही. तो देव कृष्ण आहे.
आजकाल अनेक जण देवाशी व्यवहार करत असतात. मी दोन दिवे आणि दोन प्रदक्षिणा रोज करेन मला हा फायदा होवू दे, दोन किलो पेढे देईन माझे काम होवू दे, माझे प्रमोशन पहिले होवू दे… अरे काय सुरु आहे हे ?अनेकदा पाहिले आहे कि, परीक्षा असली की मुले देवाला प्रार्थना करतात, मला पास कर ! कसे शक्य आहे हे ? असो. काळ बदललाय. सारे काही इव्हेंट फॉर्म मध्ये साजरे होताना आपल्या उत्सवात भक्ति, समर्पण विसरू नका. तेच खरे भगवंताचे स्मरण असेल.

– लेखन : कमल अशोक, नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800