महाराष्ट्र शासनाचे निवृत्त पुराभिलेख संचालक, लेखक डॉ भास्कर धाटावकर हे सध्या कॅनडा, अमेरिका येथे पर्यटन करीत आहेत.
आपल्या न्यूज स्टोरी टुडे च्या वाचकांसाठी त्यांच्या रसाळ लेखणीने पाहू या, या देशांतील विविध पर्यटन स्थळे आणि काही ठिकाणे….
– संपादक
आजच्या रविवारची नियोजित कामे उरकल्यावर राहुलनी नायगरा फाॅल्सला जाण्याचे ठरविले. फटाफट सर्वजण तयार झाले. पारूलने लंचचे पार्सल ऑर्डर केले. “लकीला” सोबत न्यायचे ठरले.
मिसीसागाहून नायगारा फाॅल्स दिडएक तासाच्या अंतरावर आहे. प्रवास सुरू झाल्यानंतर लक्षात आले कि जोडून सुट्टया असल्याने ट्रॅफिक जॅम झाले होते. जसे काही सारेच मिसीसागातील निवासी नायगारा फाॅल्स पाहाण्यासाठी निघाले होते !
आम्ही एका विशाल सर्व सोयी युक्त पार्क मध्ये लंच घेतले. तेथेही गर्दी होतीच. हिंदी, पंजाबी गाण्यावर भारतीय वंशाचे पर्यटक ताल धरून डोलत होते. नाचत होते. “जरासा झूम झूम ले” चालले होते.
आम्ही आज प्रथम विनीयार्ड, वायनरी, द्राक्षांचे मळे, पेर फळांच्या, मेपल वृक्षांच्या किलोमीटर लांबीच्या हिरव्यागार बागा, त्या शेतकऱ्यांचे टुमदार बंगले, वायनरी, पर्यटकांना तेथेच राहाण्याची करून दिलेली सोय. ताज्या फुलांच्या, फलांच्या विक्रीचे स्टॉल्स, त्यांचे हसत मुखाने विक्री करणार्यां मुली ! मला काही फोटो घ्यायचे होते पण येथे खाजगी प्रापर्टीचे फोटो मालकाच्या परवानगीशिवाय घेता येत नाही. त्यामुळे तो हिरव्यागार शालू नेसलेल्यागत दृष्टीस सुखावणारी नजारा डोळ्यात साठवून ठेवला.
त्यानंतर नायगाव व्हिलेजला भेट आणि काऊज आईस्क्रीमचा आस्वाद घेऊन ऑटोंरियन लेकच्या तटावर पारदर्शी पाण्यात पाय सोडून तेथील माशांना न्याहाळणे झाले.
पुढील आमचा पडाव होता तो नायगारा नदी, जेथे बर्यापैकी आकार घेते तेथे झाला. त्या ठिकाणाला “बेंड” असे म्हणतात. हिरव्यागार वनराजीचे वरदान तर अख्या कॅनडाला लाभले आहे. जगाचा वीस टक्के पाणीसाठा त्यांच्या वाटेला आला आहे.
अखेर त्या निसर्ग निर्मित, जगभरातील रसिकांचे आकर्षण ठरलेल्या आणि लाखो पर्यटक ज्याला भेट देण्यास आतुर असतात त्या नायगारा फाॅल्स जवळ, अमेरिकेन बाजूने दिसणाऱ्या रेनबो ब्रिज जवळ आम्ही पोचलो. त्याचवेळी नायगारा नदीवर बांधण्यात आलेल्या महाकाय लोखंडी ब्रिज वरून अमेरिकेन बाजूने रेल्वे धडधडत आली.
अमेरिका आणि कॅनडा या दोन राष्ट्रांची सीमारेषा या नायगारा नदीमुळे नैसर्गिक रित्या झाली आहे. हीच सीमारेषा आहे या नायगारा नदीवर अनेक रेल्वे पूल आणि बायरोड मार्गाने जाण्यासाठी अनेक पूलांची निर्मिती करून त्या माध्यमातून दोन्ही देशांचे दळणवळण जोडण्यात आले आहेत आणि दोन्ही राष्ट्रांकडून चांगल्या प्रकारे ताळमेळ ठेवण्यात आला आहे.
आज येथे जनसागर उसळला होता. सर्वात अडचण कार पार्कींगची होती. म्हणून आम्ही उतरून कॅनडातील हाॅर्सोई फाॅल्स कडे चालत राहीलो. नीवाच्या हाती आम्हा आजी, आजोबा नि नाना, नानीचे नेतृत्व होते. ती कार पार्कींगच्या शोधात असलेल्या राहुल, पारूलला आमचे लोकेशन देत होती. अवनी लिश मध्ये बांधलेल्या लकीला सांभाळीत होती. थोड्या वेळाने त्यांनी ही जबाबदारी आपसात बदलून घेतली.
किती अंतर चालायचे आहे ते समजत नव्हते. पाय थकले होते. पण मन मात्र त्या फेसाळलेल्या पाण्याच्या तुषारांनी आनंदाने न्हावून निघत होते. त्यामुळेच दमल्या, थकल्याचे भान नव्हते. अनेक जण बेभान पणे आनंद लुटत होते. एकीकडे नायगारा नदीच्या विशाल पात्रातून रेड निशाण कॅनडाचे आणि ब्लू निशाण लावलेले क्रुझ डौलाने चालत होते. क्रुझवरील प्रवाशांचे रेनकोटही त्या त्या देशाच्या निशाण प्रमाणे दिले जातात. काही ठिकाणी हे दोन्ही देशांचे क्रुझ एकमेकांच्या हद्दीत विना पासपोर्ट फक्त क्रुझ मध्ये बसून प्रवास करू शकतात.
तर आम्ही कॅनडातील मुख्य हाॅर्सोई फाॅल्स जवळ पोचलो आणि तो नजारा, ती इंद्रधनुष्याची पडणारी नि आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करणारी कमान, उडणारे तुषार, मध्येच रंगांची होणारी उधळण, सारेच अद्भुत !
येथे सूर्य लवकर विश्रांती घेत नाही. कदाचित येथे आलेल्या लाखो लाखो रसिकांना जास्तीत जास्त लेट ड्युटी करून प्रकाश देत असतो. आम्ही सारे डोळ्यात साठवून ठेवत होतो. तसेच मोबाईलच्या कॅमेर्यात कैद करून ठेवीत होतो. मन तृप्त होऊन गेले होते.
ग्रुप फोटो झाले. काही आठवणी साठी नायगारा संबंधित सोविनियर विकत घेतले. आणि वेलकम पार्क मध्ये पोचलो. इनक्लायीन लिप्ट मधून प्रचंड मोठ्या कॅसीनोत प्रवेश केला.
आता रात्रीचे साडेआठ वाजले होते. आम्ही पॅरामाउंट हाॅटेलात डिनर घेतले. येथेही खूप गर्दी होतीच. पुन्हा डिक्लाईन लिफ्टने खाली आलो. या दोन मिनिटात खाली, वर येणारे लिफ्टचे तिकीट फक्त पन्नास कॅनडीयन डाॅलर, साधारणत: तीन हजार रूपये मात्र होते.
आता आम्ही रात्री कॅनडाने जेथून मुख्य (हाॅर्सोई, हार्स शू आकारात) धबधब्याच्या पाठीमागे अंधार राहील पण तेथे जी रोषणाई केली आहे, तिच्या विविध रंगाची उधळण तुषारांवर पडेल. हे पाहून मी धन्य झालो. राहुलला अनेक धन्यवाद दिले. पुन्हा कार पार्किंग पर्यंत स्वतःलाच ओढीत नेले.
आज मी सकाळपासून ते आता पर्यंत हातावरच्या घड्याळातील किती चाललो ह्या दाखविणाऱ्या दर्शिकेनुसार आठ किलोमीटर चाललो होतो. माझा महिन्याचा कोटाच झाला होता.
परतीचा प्रवास सुरू झाला. भन्नाट वेगात सव्वातासात एकशे तीस किलोमीटरचे अंतर कापून आम्ही घरी पोचलो. रात्रीचे बारा वाजून गेले होते. आज मला डायरी लिहीण्याची क्षमता राहिली नव्हती. मी बेडरूम मध्ये तो कॅनडातील बाजूने पुन्हा पाहिलेल्या नायगारा फाॅल्स नजरेसमोर आणीत नकळत झोपेच्या स्वाधीन झालो.
– लेखन : डाॅ.भास्कर धाटावकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800