आज आम्ही अत्यावश्यक सामान कसेबसे दोन कार्स मध्ये कोंबून सायंकाळी पाच वाजता मिसीसागा येथील शेजारच्यांचा भावपूर्ण निरोप घेऊन बाय बाय केले आणि शिकागो कडे प्रयाण केले. हवेत मस्त गारवा होता, पावसाची हलकीशी सर येऊन गेली होती. मध्येच इंद्रधनुष्याची कमान चमकून गेली. मला बालकवींची श्रावण मासी हर्ष मानसी कविता आठवली.
परदेशात बायरोड लाँग ड्रायव्हिंग करताना दोन तासानंतर कम्फर्ट ब्रेक घ्यावाच लागतो. आम्ही नायगारा नदीवरील रेनबो ब्रिज क्रॉस करून न जाता सार्नीया बाॅर्डर वरून जाण्याचे ठरविले होते. दोन तास झाले होतेच. त्यामुळे पहिला ब्रेक, थोडी पोटपूजा, काॅफीपान, सारे कसे छान ! आठ वाजले होते तरीही लख्ख प्रकाश होताच.
सार्नीया बाॅर्डर जवळ येत होती. आमची पासपोर्ट, कागदपत्रे तयार ठेवली होतीच. इमिग्रेशन ऑफीसरचे संभाव्य विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची उत्तरे आठवित होतो.
आम्ही कॅनडातील सार्नीया क्रॉस करून डेट्रराईड अमेरिकेन बाजूने प्रवेश केला. रितसर तपासणी झाली. प्रत्येकी 13 अमेरिकेन डाॅलर फी भरावी लागली. राहुल, पारूल, अवनी, नीवाकडे कॅनडीयन पासपोर्ट असल्याने त्यांना फक्त औपचारिकता पूर्ण करावी लागली.
कॅनडातून बायरोड अमेरिकेत प्रवास हा एक विलक्षण न् अद्भुत अनुभव होता. आमच्या कारचा स्पीड कमीत कमी 120/ 130 एव्हढा असायचा. रस्ता नाकासमोर, सरळमार्गी, कुठेही वाकडेपण नाही, चढउतार नाही, मैलोनमैल प्रवासात एक साधासा, छोटुसा खड्डा दिसू नये !
मिशीगण स्टेटच्या डेट्रराईड मधून प्रवास सुरू झाला होता. आता डिनर साठी थांबणे गरजेचे होते. त्यासाठी दहापर्यंत मॅकडोनाल्डला पोहोचणे आवश्यक होते. आम्ही ऑनलाईन बुकिंग करून ऑर्डर दिलीच होती. यावेळी “लकी” कंटाळून गेला होता. तो भू भू करून आपली नाराजी व्यक्त करीत होता. अजूनही आमच्या डेट्रराईड मधील मुक्कामाचे डेज इन् हाॅटेलात पोचण्यास अवधी होता. हाॅटेल रिसेप्शनीस्टला आम्ही पोचत असल्याचे कळविले आणि रात्रौ बारा वाजण्याच्या आतच मुक्कामी पोचून चेक इन केले.
दिवसभरातील राहुल नि पारूलची धावपळ पुन्हा ड्रायव्हिंग, प्रवासात आम्हास काय हवे ते पाहाणे इत्यादी बाबींमुळे खूपच दमछाक झाली होती. त्याचवेळेस कांचन, चेतनचा फोन आल्यावर त्यांना आजचे अपडेट देऊन गाढ झोपी गेलो.
क्रमशः
– लेखन : डाॅ.भास्कर धाटावकर,
निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800