महाराष्ट्रात जन्मलेल्या, वाढलेल्या आणि पुढे परदेशात जाऊन तिथे भक्कमपणे पाय रोवून स्वतःची नवीन ओळख निर्माण करणाऱ्या सिंगापूरच्या मोहना, नेदरलँडची प्रणिता यांच्या प्रेरक कथा आपण याआधी वाचल्या. याच मालिकेतील पुढील नायिका आहे, केमॅन आयलँडची शिल्पा तगलपल्लेवार …
शिल्पा तगलपल्लेवार गंपावार हिचा जन्म चंद्रपूर येथे झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिचे एम. ए. (अर्थशास्त्र) पर्यंतचे शिक्षण ही तिथेच झाले. चंद्रपूर आकाशवाणी केंद्राची ती लोकप्रिय निवेदिका होती.
चंद्रपूर मधील विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमात ती हिरीरीने सहभागी होत असे.
अशी ही शिल्पा गंपावार, अभियंता असलेल्या श्री संदीप तगलपल्लेवार यांच्याशी २००० मध्ये विवाहबद्ध झाली व चंद्रपूरहुन नागपूरला आली.

शिल्पा २००९ मध्ये पतीसोबत नागपूरहून केमॅन आयलँडला आली. इथे आल्यापासून ती विविध उपक्रम राबवित आहे. अनेक स्वयंसेवी संस्थामध्ये ती काम करतेय.

शिल्पाचा लहानपणापासूनच कलेकडे ओढा होता. त्यामुळे तिने मेहंदी टॅटू, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग या कला आत्मसात केल्या.
नवीन देशातील निसर्गरम्य वातावरणामुळे तिच्या अंगी असलेली कला चांगलीच बहरली. अनेक ठिकाणी तिच्या कलेची प्रदर्शने भरली. कुठलीही कला ही वैश्विक असते. त्यामुळे कलेला भाषेचे बंधन नसते. म्हणूनच शिल्पाच्या कलेने स्थानिक लोकांची वाहवा मिळवली.
कित्येक वाढदिवसाच्या व तत्सम कार्यक्रमांच्या सजावटीचे काम तिने केले. शिल्पाने २०१३ मध्ये युनिक आर्ट नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून ती अनेक प्रकारच्या कला समाजापर्यंत आणि विशेषतः पर्यटकांपर्यंत पोहचवीत असते.
अक्रिलिक पैंटिंग, ऑइल पैंटिंग, फेस पैंटिंग, कॉफी पैंटिंग, बॉडी आर्ट, डेकॉरेटिंग इंडियन इव्हेंट्स, डेकोरेटिव्ह कॅण्डल मेकिंग, हॅन्डीक्राफ्ट्स, हॅन्ड पैंटिंग, मेहंदी टॅटू, वूडन पैंटिंग इत्यादी सेवा तिच्या कंपनीच्या माध्यमातुन दिल्या जातात.
हीना आर्टस् मध्ये शिल्पा ही एकमेव तेथील इंटरनॅशनल प्रमाणपत्र धारक आहे हे इथे उल्लेखनीय आहे आणि आता तिथे तिची हीच प्रमुख ओळख झाली आहे.
तेथील विविध कलाविषयक उपक्रमात शिल्पाचा लक्षणीय सहभाग असतो. विविध भारतीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात ती नेहमी पुढे असते.शिल्पाला अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलं असून एका वेळी अनेक गोष्टी करण्यात तिचा हातखंडा आहे. तिला व्यवस्थापन पण उत्तम करता येते. ती कुठलीही गोष्ट अत्यंत मनापासून करते.
सेंट लगनाशियस कॅथॉलिक स्कूल मध्ये २०१७ साली १२ फूट बाय ४८ फूट आकाराचे म्युरल तिने तयार केले. एका बाजूला ट्रॉपिकल जंगल आणि दुसऱ्या बाजूला राजवाडा असे हे म्युरल ही तिची एक स्मरणीय आठवण आहे.
आंतर्राष्ट्रीय दिन कार्यक्रमात ती नेहमीच भारताचे सक्रिय प्रतिनिधित्व करीत असते. बेस्ट फूड, बेस्ट ड्रेस, बेस्ट कल्चर, बेस्ट डान्ससाठी तिला अनेकदा पुरस्कृत करण्यात आले आहे.
३० हजार प्रेक्षकांसमोर तिने पारंपरिक भारतीय पेहरावात केलेले नृत्य खूप लोकप्रिय झाले होते. रिझट कॅरतोन आर्ट गॅलरीत ती कलाकार म्हणून गेली ६ वर्षे तिची कला पेश करत आहे. तिचे ऍक्रिलीक पैंटिंग २०१७ साली प्रिन्स चार्ल्सला भेट देण्यात आले हा तिच्यासाठी आनंदाचा क्षण होता. काबू के मॅन २०१९ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात तिला पुरस्कार मिळाला आहे.
शिल्पाच्या कलेची विविध आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांनी दखल घेतली आहे.
विविध भारतीय सण, उत्सव आयोजित करण्यात तिचा सक्रिय सहभाग असतो. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून तिने काही प्रदर्शनातुन मिळालेले पैसे सामाजिक कार्यासाठी दिले आहेत.
मिळालेल्या संधीचे सोने केले पाहिजे अशी तिची धारणा आहे. समर्पण आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर आपलं ध्येय निश्चितच साध्य करता येते अशी शिल्पाची जीवन निष्ठा आहे.
शिल्पाला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800.
स्तुत्य उपक्रमशीलता