Sunday, July 6, 2025
Homeपर्यटनकेरळची "कॉफी"

केरळची “कॉफी”

नमस्कार, वाचक हो.
स्वतःच्या खास वैशिष्टपूर्ण चवीने संपूर्ण जगाला भुरळ पाडणारे एक अतिप्रसिद्ध पेय म्हणजे कॉफी.

कॉफी मळ्यासाठी आवश्यक असणारे वातावरण, भौगोलिक रचना यामुळे केरळमध्ये चहा बरोबर कॉफीचे मळेही मुन्नार, नेन्मारा, इडकी, वायनाड या भागात पाहण्यास मिळतात.

भारतामध्ये सोळाशे सत्तरच्या आसपास कर्नाटकमध्ये कॉफी लावली गेली आणि त्यानंतर केरळमध्ये साधारण सतराव्या शतकापासून कॉफीचे उत्पादन घेणे सुरु झाले. भारतातील एकूण कॉफी उत्पादनापैकी कर्नाटकात ७१%, केरळमध्ये २१% आणि तामिळनाडूत ५% उत्पादन घेतले जाते.

कॉफीची रोपे वाढण्यासाठी सावलीची गरज असते त्यामुळे उंच झाडाच्या सावलीत कॉफी छानपैकी वाढवली जाते. आणि याबरोबरच दुसऱ्या काही पिकांचेही उत्पन्न घेतले जाते. कॉफी, चहा, मसाल्यांची एकत्र लागवड केली जाते.

मलबार भागातील कॉफीला मान्सून मलबार कॉफी म्हणून ओळखली जाते. तिथल्या वातावरणामुळे कॉफीत आलेले खास वेगळेपण कॉफी प्रेमिकांना भुरळ घालते.

कॉफीची छोटी फळे म्हणजे त्याच्या बिया. त्या वाळवून भाजून दळतात. आणि तयार होते कॉफी पावडर.

आजकाल बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी पावडर बघायला मिळतात. प्रत्येक कंपनीची स्वतःची एक वेगळी खासियत आहे, वैशिष्ट्य आहेत. कॉफीच्या गुणवत्तेतही फरक दिसतो. इन्स्टंट कॉफी आपल्याला माहित आहेच. रोज कमी जास्त प्रमाणात आपण इन्स्टंट कॉफी आवडीने पीत असतो.

पण दक्षिणेत फिल्टर कॉफी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे दैनंदिन जीवनात आवडीने फिल्टर कॉफी घेतली जाते. हॉटेल्स मधूनही इन्स्टंस्ट कॉफीपेक्षा फिल्टर कॉफीच जास्त मिळते.

केरळमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्टर कॉफीच्या नावाजलेल्या कंपन्या आहेत. त्या कंपनीच्या दुकानात गेल्यावर कॉफी बिया लगेच दळून देतात. तिथे थांबल्यावर कॉफीचा जो सुगंध येत असतो त्या सुगंधानेच तरतरी येते, मन ताज होतं.. पण ज्याला कॉफी आवडते त्यालाच फक्त हा बदल जाणवू शकतो.
या दळलेल्या कॉफी पावडर मध्ये आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात चिकरी पावडर (chicory powder) ग्राहक घालून घेतात. चिकोरी घालून केलेल्या कॉफी पावडरमुळे फिल्टर कॉफीला जरा घट्टपणा येतो, स्वादातही फरक पाडतो.

फिल्टर कॉफी बनवण्यासाठी खास प्रकारचे पारंपरिक भांडे असते, त्याला कॉफी फिल्टर म्हणतात. हा फिल्टर स्टीलचा किंवा पितळेचाही मिळतो. त्यामध्ये कॉफी पावडर टाकून वरून गरम पाणी ओतायचे. ते कॉफीचे पाणी हळूहळू फिल्टरच्या खालच्या भांड्यात पडत राहते. त्या कॉफी मिश्रित पाण्याची मग दुध, साखर किंवा गूळ घालून कॉफी बनवली जाते.

फिल्टर कॉफी बनवणे म्हणजे वेळ खाऊ काम.. पण तरीही रोज न चुकता फिल्टर कॉफी आवडीने पिली जाते. अगदी माझ्या घरातही फिल्टर कॉफीला वरचे स्थान आहे.

तर एकदा तरी येणार ना, केरळमध्ये केरळच्या कॉफीचा आस्वाद घ्यायला ? ☺️

मनीषा पाटील

– लेखन : सौ.मनिषा पाटील. पालकाड, केरळ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments