नमस्कार, वाचक हो.
निसर्ग सौन्दर्य, संस्कृती, आहार, याप्रमाणेच केरळची वेशभूषा आपली एक वेगळी ओळख, वेगळे अस्तित्व दाखवते.
शुभ्र पांढऱ्या, मोती रंगाचे नी सोनेरी वा रंगीत काठांचे मुंडू म्हणजे केरळचा पारंपरिक पोशाख. मुंडू म्हणजे थोडक्यात धोतरच. गरीब, श्रीमंत, कामगार, व्यावसायिक सर्व प्रकारचे लोक मुंडू वापरतात. स्त्रिया, पुरुष दोघेही मुंडू (धोतर, लुंगी) वापरतात.
घरोघरी जाऊन मासे विकणाऱ्या स्त्रियांही मुंडू लावतात इतकेच नाही तर मुस्लिम स्त्रियांही घरी मुंडू वापरतात. मुंड बांधण्याची त्यांची पद्धत उजवीकडून डावीकडे तर इतरांची डावी कडून उजवीकडे असते .
अखंड साडी हा प्रकार इथे पारंपरिक पोशाखामध्ये येत नाही.मुंडू, ब्लॉऊज, आणि मुंड नेरीयाथम (पदर किंवा ओढणी म्हणून) असा कासवू साडी म्हणजे स्त्रियांसाठी टू पीस साडी चा प्रकार येतो.
मुलींसाठी पट्टू पावाडा (pattu pavadai) उठावदार काठाचे घोळदार परकर पोलके विविध रंगात किंवा हलक्या सोनेरी रंगात सर्वांच्या आवडीचा असा हा सुंदर प्रकार. कपाळावर टिकली, केसात मोगऱ्याचा गजरा, डोळ्यात काजळ, हातात एक दोन सोन्याच्या बांगड्या, गळयात चेन घातलेल्या पारंपरिक पोशाखातील तरुणी खूप सुंदर दिसतात.
शुभ समारंभ, लग्न कार्य किंवा सणा वाराला आवर्जून पारंपरिक वेशभूषा केली जाते.
पुरुषांसाठी मुंडू (धोतर) आणि मेल मुंडू (थोडक्यात उपरण) असा पोशाख असतो. दोन्हीही सफेद किंवा मोतीया रंगांचे. शुभ्र रंग जणू शांततेचे, पवित्र्याचे प्रतीक सांगत असतो.
काही ठराविक जातींमध्ये मुंडू नेसून खांद्यावरती वस्त्र – उपरण्यासारखे घेतले जाते. पर्यटक तर आवर्जून इथून पारंपारिक कपडे खरेदी करून जातात.
केरळचा आकर्षक पारंपारिक पोशाख हा साधा, सुटसुटीत आणि स्त्री पुरुष भेद टाळून सर्वांनाच वापरता येण्यासारखा आहे आणि कदाचित अशा वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे आजही मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे.
मुंडू ट्रेंड फॅशनच्या दुनियेतही नाव कमावून आहे यातच त्याचा लौकिक दिसून येतो.

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील, पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800