नमस्कार, वाचक हो.
सृष्टी सौंदर्य, खाद्य संस्कृती, समुद्र किनारा, वनसंपत्ती आणि विलोभनीय मंदिरे या सोबत केरळमधील अजून गोष्ट आपणास आकर्षित करते आणि ती म्हणजे विश्वविख्यात असणारा केरळ मधील आयुर्वेद.
केरळमध्ये राहणीमान, आहार यामध्येही फरक आहे. सर्व प्रकारच्या फळ भाज्यांचा वापर, शक्यतो तिन्ही ऋतुत गरम पाणी पिणे यातच कुठेतरी आयुर्वेदाचा पाया तयार होतो असे वाटते.
इथे पुरातन काळापासून आयुर्वेदाची परंपरा चालू आहे आणि हल्ली आयुर्वेद, पर्यटन दृष्टीनेही हे फायद्याचे ठरत आहे.
आयुर्वेदिक उपचारामध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, योग व्यायाम या गोष्टी महत्वाच्या मानल्या जातात. अभ्यंग, पंचकर्म अशा पद्धतीने उपचार केला जातो. आजारानुसार चूर्ण, काढा, चाटण, घृत, गोळ्या मधून औषधे खाण्यासाठी तर गरजेनुसार तेल लावायला दिले जाते. सांगितलेली असतील ती पथ्य पाळून आयुर्वेदाच्या उपचाराने रोगी पूर्ण बरा होऊ शकतो.
नागार्जुन आयुर्वेद, कोट्याकल आर्य वैद्यशाळा,आर्य वैद्य निलायम, केरळा आयुर्वेद असे विविध उत्कृष्ट आयुर्वेदिक दवाखाने आपल्याला केरळमध्ये पाहायला मिळतात. Sreedhareeyam eye hospital हा नेत्र चिकित्सासाठी आयुर्वेदिक दवाखाना आहे. भारतातूनच नाही तर विदेशातूनही बरेच जण डोळे आणि त्या संबंधित आजारावर उपचार घेण्यासाठी इथे येत असतात.
केरळ दर्शनासाठी पर्यटक तर येतातच पण आयुर्वेद उपचार करून घेण्यासाठीही लोक आवर्जून केरळला येतात. असे म्हणतात की आयुर्वेद उपचार पद्धती रोग बरा करण्यास वेळ घेते पण रोग मुळापासून उखडून टाकण्याची ताकद आयुर्वेदमध्ये नक्कीच आहे.

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील
पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800