नमस्कार, वाचक हो.
केरळ देवभूमी म्हणून ओळखली जाते. साक्षात ईश्वराने निर्माण केलेली भूमी. निसर्गसौन्दर्य बरोबर इथली प्राचीन मंदिरे पाहताना आपणास जाणवते की काहीतरी खास आहे या भूमीत या राज्यात.
आज आपण पाहणार आहोत ते प्राचीन मंदिर, स्वतः परशुरामांनी निर्माण केलेले वडक्कूनाथन मंदिर – Vadakkunnathan temple. महादेवाचे हे मंदिर उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना आहे. शिल्पकला, रंगीत चित्रे, प्रसन्न करणारा परिसर मंत्रमुग्ध करतो. इथले शिवलिंग कैलास पर्वतावरील शिवलिंगाचे स्वरूप आहे. तुपाचा अभिषेक या शिवलिंगास केला जातो.
पहाटे ४ वाजल्यापासून ते दुपारी ११ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ४.३० ते ८.३० पर्यंत भाविकांना दर्शनासाठी वेळ आहे.
साधारण २०० वर्षांपूर्वी सुरुवात झालेला या मंदिराचा मुख्य महोत्सव म्हणजे त्रिशूर पूरम. एप्रिल किंवा मे महिन्यात पौर्णिमेला हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या दिवशी शिव शंकराचा पुनर्जन्म होतो असे मानले जाते. यावेळी केली जाणारी फटाक्यांची आतिषबाजी प्रेक्षकांना खिळवून ठेवते. फटाक्यांच्या प्रकाशाचा खेळ साऱ्या आसमंतात चैतन्य घेऊन येतो.
केरळवासियांचे हत्तीवरील प्रेम म्हणजे माणूस आणि जनावरामधील ऋणानुबंध दाखवून देणारे सुंदर उदाहरण. त्यांना दिला जाणारा मान, सन्मान हे सुद्धा या सोहळ्याचे एक विशेष आकर्षण आहे. अगदी भक्तीभावाने हत्तीना सजवून नटवून उत्साहात मिरवणूकीत नेले जाते. हत्तीची मिरवणूक म्हणजे फक्त भाविकांसाठीच नव्हे तर भारतातील, जगातील सर्व पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
त्रिशूरपूरम उत्सवात सर्व धर्मीय लोक भाग घेतात. तिथे कोणीच लहान मोठा, जातीय, परजातीय हा भेदभाव नसतो. ईश्वराची सगळी लेकरे सारखीच असतात.
पारंपरिक गीत, संगीत, नृत्य महोत्सवाची उत्कंठा शिगेला पोहचवतात. नाद, लय, ताल यांचा तिहेरी संगम ठेका धरायला लावतो.
८ दिवस चालणारा हा पारंपारिक सोहळा म्हणजे भक्तांच्या भक्तीचा,आस्थेचा, जल्लोषाचा अद्वितीय नमुनाच असतो. भक्तांची श्रद्धा पाहून देवांचे देव महादेव नक्कीच त्यांना आशीर्वाद देतात.

– लेखन : सौ.मनिषा दिपक पाटील. पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ.☎️ 9869484800