Friday, December 27, 2024
Homeलेखकेरसुणीची लक्ष्मी

केरसुणीची लक्ष्मी

मला केर काढायला फार आवडतो. शाळा-कॉलेजमध्ये शिकताना मला आईने कधीच घरकाम करायला सांगितले नाही पण हा उद्योग मी स्वतःहून अंगावर घेतला होता. आमचे घर मध्यवर्ती दादरमध्ये आणि आम्हा सर्वांचे खूप उद्योग व ओळखी.

घर मुंबईच्या मानाने ठीक होते – दोन खोल्या आणि वेगळे मोठे स्वयंपाकघर. तिथे कायमच पाहुणे मित्र-मैत्रिणी अशी लोकांची ये-जा असायची. संध्याकाळी एकदाचा आला-गेला संपला आणि जेवणे झाली की मी आधी सर्व तक्के, उशा बाजूला करून सगळ्या पलंगांवरच्या चादरी जोरात झटकायची. रात्रीच्या स्वच्छ चादरी घातल्या की मग कोणाला काही वेळ जमिनीवर पाय ठेवायची परवानगी नव्हती. कारण तेव्हा मी अगदी कानाकोपऱ्यातून दोन्ही खोल्यांचा बारीक केर काढायचे. पायांनी आलेली धूळ व कचरा, काही कागदाचे तुकडे आणि खाताना पडलेले अन्नकण असे सगळे माझी केरसुणी शोधायची आणि हुसकून बाहेर काढायची. हा केर भरून बादलीत टाकला की मला माझ्या लॅबमध्ये केलेल्या यशस्वी प्रयोगापेक्षाही जास्त समाधान मिळायचे. हा रात्रीचा केर ही कायम माझीच मक्तेदारी होती – त्यात कोणी बदल करायचा प्रयत्न केला किंवा मी केर काढताना कोणी खाली उतरले तर मी अतिशय रागवायचे.

आपण मोठे होतो, घरापासून दूर जातो आणि मग हे सगळे नियम व रुटीन काळाच्या ओघात विरून जातात. नंतर कधी तिथे परत गेलो तरी ते पूर्वीसारखे नसते. मी अमेरिकेतून त्या जुन्या घरी कित्येकदा भेट द्यायला आणि राहायला गेले पण पुन्हा तिथे कधी केरसुणी हातात घेतली नाही.

अमेरिकेत पहिली अनेक वर्षे मी midwest च्या भागात राहिले. तिथे थंडी अफाट. त्यामुळे अपार्टमेंटमध्ये व नंतर घरातही सगळीकडे कार्पेट असायचे. ते साफ करायला केरसुणीचे परदेशी यांत्रिक स्वरूप म्हणजे vacuum cleaner वापरणे आवश्यक होते. पण मला कधी ते यंत्र हातात धरण्याची आवड वाटली नाही. मग मी चलाखपणे ते काम माझ्या नवऱ्याकडे सोपवले. गंमत अशी की त्याने ही जबाबदारी मस्त निभावलीच पण पुढे जाऊन vacuum cleaner चे वेगवेगळे प्रकार आणि कार्यक्षमता यांचा अभ्यास करून त्याने इतकी माहिती जमवली की लोक त्याला कुठले मॉडेल घ्यावे याचा सल्ला विचारायला लागले. मी आणि माझी मुलगी याबद्दल खूप हसत असतो. असो. म्हणतात ना कुणाचे काही तर कुणाचे काही. मी मात्र घर स्वच्छ राहतेय यामुळे खुश होते.

आम्ही न्यू जर्सीला आल्यावर ही परिस्थिती बदलली. इथे आम्ही पहिल्याने मनासारखे प्रशस्त घर घेतले आणि त्यात माझी सगळ्यात आवडीची जागा म्हणजे भरपूर मोठे स्वयंपाकघर. पश्चिम आणि दक्षिण दिशेला खिडक्या त्यामुळे आकाशात कुठेही सूर्य असला की इथे भरपूर प्रकाश असतो आणि याच खिडक्या मला बाहेरच्या ऋतूंप्रमाणे बदलणाऱ्या निसर्गाची सुंदर रूपे दाखवीत राहतात आणि मला आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे स्वयंपाक करायच्या व जेवणाच्या या सगळ्या भागात छान लाद्या बसवल्या आहेत.

आपण सगळेच इकडच्या आयुष्यात सतत धावत असतो. ऑफीस आणि घरकाम सांभाळताना निवांत बसून चार प्रकार करून खाणे हे सहसा जमतच नाही. पण मी अगदी ठरवून बरेचदा रविवारी सकाळी जेवणाचा खास मेनू बनवते. या दिवशी प्रत्येक वस्तू ताजी आणि निगुतीने करायची. ताटाची उजवी-डावी बाजू म्हणजे चटणी, कोशिंबीर, एखादी उसळ, रस्सा भाजी आणि दूधीच्या खिरीसारखे काहीतरी गोडसुद्धा. आताचे इथले कुटुंब लहान – इन मीन तीन माणसे. तरीही सर्वांनी एकत्र बसून केलेले व्यवस्थित जेवण हे फक्त पोटच नाही तर मनसुद्धा तृप्त करते. पण या सात्त्विक आणि शारीरिक आनंदामुळे वस्तुस्थिती थोडीच बदलते ? इतका स्वयंपाक करतांना पसारा पुष्कळ होतो जो आपल्यालाच आवरायचा असतो. नवरा आणि मुलगी यांचे जडावलेले डोळे बघून मीच त्यांना नंतरच्या या कामातून माफ करते.

आता मला चेव चढतो – हे पुढ्यातील आव्हान जिंकण्याचे. उरलेले अन्न आणि जिन्नस उचलून ठेऊन डिश वॉशर लावला तरी अजून मनासारखी स्वच्छता दिसत नाही. मग मी रिकामे केलेले सगळे ओटे पुसते आणि माझे शेवटचे अस्त्र म्हणजे माझी आवडती केरसुणी बाहेर काढते. ती फ्रीझ आणि कूकिंग रेंजच्या बाजूने, पॅन्ट्रीच्या आतून आणि टेबल-खुर्च्यांच्या खालून फिरवताना स्वयंपाक करताना झालेला कचरा निघतोच पण कित्येकदा मागच्या काही दिवसात हरवलेल्या वस्तूही सापडतात. आठवडाभर रोजच्या कामाच्या व्यापात अशी शोधाशोध करायला वेळ कुठे मिळतो ? अचानक सामोरी येते केसातून निसटलेली क्लिप, घरंगळत गेलेले औषधाच्या बाटलीचे झाकण किंवा हातातून पडून अदृश्य झालेली कानातल्या कुडीची फिरकी. या फिरकीने तर मला किती तरी वेळा फिरवून ताप दिलाय. कितीही बघितले तरी पडते तेव्हा नेमकी मिळत नाही आणि मग मिळायची आशा सोडून दिल्यावर जेव्हा अशी पटकन पुढ्यात येते तेव्हा अगदी अत्यानंद होतो.

केरसुणी सगळे स्वयंपाकघर साफ करते. कचरा भरून डब्यात जातो. या धावपळीत थोडा श्वास फुलतो आणि अलीकडे जरा पाठही भरून येते. नीटनेटक्या स्वच्छ जमिनीवर कौतुकाने एक नजर टाकून मी केरसुणी परत ठेवायला वळते तेवढ्यात ढगांमागून आलेली सूर्याची किरणे स्वयंपाकघरात डोकावतात. त्या प्रकाशात उजळलेले घर लक्ष्मीचा हात फिरल्याप्रमाणे सोनेरी प्रसन्न दिसते. मी गृहलक्ष्मी मनोमन समाधान पावते आणि केरसुणीची लक्ष्मी जागी परत ठेवते.

डॉ सुलोचना गवांदे

— लेखन : डॉ सुलोचना गवांदे. न्यू जर्सी, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. छान लेख सुलोचनाताई !
    हल्ली रुंबा आल्याने केर काढण्याचे प्रमाण कमी झाले पण एकदा आपण हात फिरवला की वेगळेच समाधान लाभते. सहमत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९