Sunday, September 8, 2024
Homeलेखकेशवचा साक्षात्कार

केशवचा साक्षात्कार

केशव घाई घाईने घाम पुसत ऑफिस च्या दरवाज्यातून आत शिरला. आज खरे म्हणजे त्याला उशिरच झाला होता. सकाळी बाबांना थोडा थंडी ताप वाटायला लागल्यामुळे डॉक्टरकडे जावे लागले, तेथें खूप वेळ लागला. नशिबाने बायको ने ती जबाबदारी उचल्यामुळे त्याला थोडे हायसे वाटले होते. नाहीतर आज ऑफिस चुकणार होते हे नक्की.

केशव चा कंपनीतला उमेदवारी चा कालावधी संपून आता स्थिरता आली होती. प्रचंड काम अंगावर पडले होते आणि दिवस रात्र त्यासाठी कमी पडायला लागले होते. ऑफिसातून तो घरी आला तरी काम चालूच असायचे. केशव ग्लोबल कंपनीत काम करत असल्यामुळे हीच कामाची आणि वेळाची पद्धती अपेक्षित होती. तेव्हा पासून आतापर्यंत कामात आणि श्रमात काही कमी झाली नव्हती. झालीच तर चक्रवाढ व्याजाने वृद्धीच झाली होती. त्याच्या देशोदेशीच्या फेऱ्या व्यावसायिक हेतूपूर्तीसाठी सहज होत होत्या, परंतु कुटुंबासोबत एक साधी शांत संध्याकाळ एकत्र घालवणे दुरापास्त झाले होते. एकंदरीत काय तर केशव सारख्या अनेक नोकरदारांच्या बाबतीत व्यावसायिक काम हाच आयुष्याचा केंद्रबिंदू ठरत चालला होता आणि फॅमिली टाईम त्यात जिकडे जागा असेल तिथे गुरफटला गेला होता.

या सर्व पार्श्वभूमीवर ‘वर्क लाईफ बॅलन्स’ ची तुतारी सर्व माध्यमातून उच्चरवाने कळत नकळत केशवच्या कानी पडावयास लागली होती. परंतु वर्क लाईफ बॅलन्स वरती वाचले किंवा ऐकले आणि त्यानुसार सूचना पाळल्या की कोडे सुटेल असे वाटणे हा निव्वळ भ्रम आहे हे लवकरच त्याच्या लक्षात आले. जेवढे त्या विषयावर वाचाल, ऐकाल तेवढी वेगवेगळी मते आणि सल्ले पाहावयास मिळत होते. परंतु वास्तविकतेत दर रोज वापरता येईल असा ठोस उपाय किंवा दिशा कुठेच नव्हती. अगदी “एक ना धड भाराभर चिंध्या” च जणू. आता तर व्यावसायिक ‘ इमेल्स ‘ सर्व प्रत्येकाच्या मोबाइल वर आल्या होत्या आणि चोवीस तास केव्हाही त्या उपलब्ध होत्या. यामुळे कामाच्या वेळा आणि कौटुंबिक वेळ यातली सीमारेषा अजूनच धूसर झाली होती. जणू तंत्रज्ञानही त्यात नको तेव्हा आगीत तेल ओतण्याचे काम करीत होते.

कोविड च्या कालावधीनंतर केशवला घरून काम करण्यास मिळालेली जवळपास राजमान्यता ही ‘वर्क लाईफ बॅलन्स’ सुधारण्यास रामबाण तोडगा आहे असे वाटू लागले होते. परंतु लवकरच त्या पद्धतीतल्या त्रुटी ही समोर यावयास लागल्या होत्या आणि परत ‘येरे माझ्या मागल्या’ सुरु झाले. बाकी काही उपाय मिळो व ना मिळो, पण कुटुंबियांना फारसा वेळ देता येत नसल्यामुळे त्याच्या मध्ये अपराधीपणाची भावना वाढीस लागली होती आणि ही बाब मात्र गंभीर आणि अनावश्यक परिणाम करणारी होती.

या सर्व गदारोळात केशवच्या कंपनीतले अतिशय आदरार्थी व्यक्तिमत्व ‘राम’ याच्या एका परिसंवादाला जाण्याचा त्याला योग आला. राम चे प्राथमिक काम खरे मानव संसाधन विभागात असायचे. परंतु त्याऊपर हा प्राणी गाढ तत्ववेत्ता आणि अतिशय विचारवंत म्हणून गणला जायचा. राम ने त्याच्या परिसंवादाची सुरुवात नेहमीच्या मानव संसाधनाच्या मुद्यांवर केली. आपल्या भाषणात पहिल्या पाचच मिनिटात त्याला बहुधा जाणवले की केशवसकट सर्व श्रोते अतिशय कंटाळवाणा चेहरा करून त्याचे व्याख्यान ऐकत आहेत. ते चित्र बघितल्याक्षणी त्याने चक्क कॉम्पयुटर बंद केला आणि सर्वांना संबोधून म्हणाला, “बहुतेक मी सांगतो त्या गोष्टी तुम्हाला नव्या नाहीत. तुमच्या मनात काही वेगळेच घोळत आहे असे मला वाटते. मला सांगा कदाचित मी काही मदत करू शकेन. “त्यानी असे म्हटल्यावर श्रोतृवृंदात जणू चेतना जागृत झाली आणि पुढच्याच क्षणी केशवच्याच एका सहकाऱ्याने त्याला प्रत्येकाच्या मनात घोळत असलेला प्रश्न विचारला. ‘वर्क लाईफ बॅलन्स ‘ वर त्याचे मत विचारले. नुसताच प्रश्न विचारला नव्हे तर वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे काय ह्याविषयी प्रत्येकाच्या मनातील वेगवेगळ्या अपेक्षा आणि त्यामुळे उडणारा वैचारिक गोंधळ, द्विधा मनस्थिती आणि अपराधीपणाची भावना राम ला विस्तृतपणे विशद केली. अगदी मनातले बोलल्याप्रमाणे केशव सहकाऱ्यांवर खूष झाला आणि उत्सुकतेने पुढे रामचे उत्तर ऐकू लागला समस्या सविस्तर ऐकल्यानंतर राम ने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग विचारपूर्वक बोलायला सुरवात केली. त्याच्या विचारांचा गोषवारा अंदाजे असा होता….

“जेव्हा तुम्ही ‘ वर्क लाईफ बॅलन्स ‘ शब्द उच्चारता, तेव्हा कुठली प्रतिमा वा चित्र तुमच्या डोळ्यासमोर येते ?” राम चा प्रश्न जमलेल्या श्रोत्यांसाठी होता. अर्थातच ‘तराजू’ चे चित्र ! अगदी समान पातळीवर तोललेला समसमान दोन्ही बाजू दाखवणारा तराजू. सर्वांचे एकमताने उत्तर ! “मित्रांनो इथेच खरी गोम आहे“- विजयी स्वरात राम उत्तरला. “आपल्या अंतर्मनाने बघितलेले हे समान पातळीवर दोन्ही परडी असणारे तराजूचे चित्र आपल्याला सांगत असते की वर्क आणि लाईफ – कामाच्या वेळा आणि कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या वेळा ह्या समसमान असल्या पाहिजेत किंवा अगदी मापदंडाने मोजल्या तर ५० % विभागल्या गेल्या पाहिजेत. परंतु खऱ्या आयुष्यात कामाच्या वेळा आणि कुटुंबासमवेत घालवण्याच्या वेळा ह्या सारख्या विभागल्या कधीच जात नाहीत. वास्तविक आयुष्य एवढे समतोल कधीच नसते. एवढेच काय नजीकच्या भविष्यात येऊ घातलेल्या कामाच्या आणि तंत्रज्ञानाच्या पद्धती या सुद्धा समान वेळा पाळण्यास पूरक नाहीत. जेव्हा आपल्याला अपेक्षित असलेली परिस्थिती किंवा चित्र बघावयास मिळत नसते तेव्हा मग आपल्यावर अन्याय होतो आहे अशी भावना विनाकारण मनात मूळ धरू लागते. तेव्हा ‘समान पातळीवर परडी असलेला तराजू’ – हे चित्र आधी मनातून समूळ काढून टाका” राम आपला मुद्दा ठासून सांगत होता.

“याऐवजी असा विचार करा की या आठवड्यात कंपनीचे अगदी निकडीचे काम आले आहे आणि तुम्ही रात्रीचा दिवस करून सपाटून काम केले आहे. त्याकरता कुठल्या वेळेला तुम्ही काम करता आहात तिकडे तुमचे अजिबात लक्ष जात नाही. पुढच्या आठवड्यात मात्र तुम्हाला कौटुंबिक समारंभाला हजर राहायचे आहे आणि त्याकरता काही दिवसांची सुट्टी सुद्धा घ्यायची आहे. तुम्ही सहज तुमच्या सहकाऱ्यांकडे कामाची सूत्रे सुपूर्द करू शकता. वाजवी कारण असल्याने कोणीही अधिकारी वर्ग तुम्हाला अडवत नाही. तुम्हाला लागेल त्या दिवसांची सुट्टी घेण्यास पूर्ण मुभा आहे. तुम्ही तशी सुट्टी घेता, समारंभ सुखनैव आटपून तुम्ही परत कामावर रुजू होता आणि मागल्या राहिलेल्या कामाची सूत्रे परत आपल्या सहकाऱ्यांकडून आपल्या हातात घेता. वर्तुळ पूर्ण होते.”

बोललेले श्रोत्यांच्या पचनी पडावे म्हणून काही क्षण राम थांबला आणि मग पुढे म्हणाला “कामाचा वेळ आणि कुटुंबासाठी दिलेला वेळ हा काही दर दिवशी अगदी समान विभागलेला तुमच्या वाटेला येऊ शकत नाही. परंतु जेव्हा गरज लागेल तिथे (कामात किंवा कुटुंबाकडे) संपूर्ण वेळ लक्ष देण्याची मुभा असणे आणि कंपनीच्या पद्धती त्याला पूरक असणे हीच त्या कल्पनेतल्या तराजूची संकल्पना आहे. तराजूच्या पारड्या या दृष्टीने बघायच्या आणि समजून घ्यावयाच्या असतात.” आकाशवाणी व्हावी त्या स्वरूपात रामच्या बोलण्याला आता धार आली होती. त्याचे शब्द न शब्द केशवच्या मनात पुरेपूर उतरत होते…..” आणि आपल्या कंपनीत कुटुंब किंवा काम, जिकडे गरज लागेल तिकडे संपूर्ण लक्ष देण्याची पुरेपूर सूट आहे हे ही विसरू नका”- रामने अगदी मानव संसाधन विभागाच्या मुरलेल्या प्रतिनिधींच्या आवेशात डोळे मिचकावून अखेरीस सर्वांना आठवण करून दिली.

परिसंवादाच्या श्रोतृवर्गामध्ये कमालीची शांतता पसरली. त्यादिवशी केशवसारखे अनेक जण थोड्या हलक्या मनाने त्या परिसंवादातून बाहेर येत होतो. खरे पाहता किती सोपे तत्वज्ञान होते वर्क लाईफ बॅलन्स चे ? फक्त आपला बघण्याचा चष्मा बदलण्याची गरज होती. त्या कल्पनेवर उभारलेल्या प्रतिमा, समान तोललेली पारडी असणारा तराजू हे सर्व मनातून काढून टाकले की त्या शब्दांची नवीनच ओळख होत होती. अनेक वाद, परिसंवाद, लेख हे सर्व वाचल्यानंतर केशवचा रामशी बोलण्याचा योग आला परंतु त्याच्याबरोबर घालवलेला वेळ सत्कारणी लागला होता. ‘देर आए पर दुरुस्त आए’ अशीच भावना सर्वांची होती.

केशवच्या मनातली अपराधीपणाची भावना आता नाहीशी होऊ लागली होती. त्या शब्दांभोवतीचे अंधाराचे जाळे हळूहळू फिटत होते. त्याचे आकाश जणू मोकळे होऊ लागले होते….!

— लेखन : उपेंद्र कुलकर्णी. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. Work Life Balance या क्लिष्ट विषयावर सोप्या आणि समर्पक पद्धतीने केलेले प्रबोधन.
    फार छान.
    असेच नवनवीन विषयांवरील तुझे लेख वाचायला आवडेल.

  2. बहुत ही सुंदर ढंग से आज के कॉर्पोरेट जीवन का चित्रण किया गया है!
    ‘वर्क लाईफ बॅलन्स’ की सही परिभाषा या अर्थ क्या है, ये बहुत सरल शब्दों में लेखक ने समझाने का सफल प्रयास किया है!
    श्री उपेन्द्र कुलकर्णी जी को इस लेख के लिए बँधाई देना चाहूँगा! अगले प्रेरक लेख की अभिलाषा में!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments