नमस्कार मंडळी.
ह्या कवितेतील मुलगी म्हणजेच चेडू, ही मीच आहे. कोकणातील आमच्या विरवाडी गावात त्यावेळी माध्यमिक शाळा नव्हती. त्यामुळे मी वाडा गावात हायस्कूलला जायला लागली. सर्व मुलांमध्ये मी एकटीच मुलगी होती. चार मैल पायी चालत जावून शाळा शिकले. माझ्या गावातील मी पहिली मुलगी आहे, जी एसएससी झाली.
इच्छा कोकणातल्या चेडवाची,
सपनात त्येच्या शाळा ।
हौस होती शिकूची,
गावात कसली शाळा ?
रोजच सांगना आयेचा,
शिकून काय मिळात ?
चूल नि मूल नशीब बाईचा !
रांदून वाढन्यात आयुष्य सपात ।
अकनात घातल्यान रडून,
दिसभर केल्यान उपास ।
फुगून ऱ्हवला हट्टान,
शिकूचो घितल्यान ध्यास ।
चार मैल कोसारचो,
रोजचो प्रवास पायी ।
घोळको सगळो झिलग्यानचो,
त्येनच्यात एकटी बाई !
शाळा होती भव्य,
मास्तर लयच शिस्तीचे ।
चेडवाक गावला दिव्य,
शिडये चढला शिक्षणाचे ।
मिणमिणत्या कंदिलाच्या उजेडात,
अभ्यास केल्यान रातदिस ।
बोर्डाच्या परीक्षेत,
चेडू झाला पास ।
बातमी पसारली गावागावात,
पयल्यानदा पोरगी धावी झाली ।
नवो पायंडो पडलो गावात,
लेकिन्का शिकवची जागृती इली ।

– रचना : सौ. वर्षा भाबल.
– संपादन : सौ.अलका भुजबळ. ☎️ 9869484800
