उन्मेषाच्या रंगत गेल्या अश्र्विनातील नवरात्री
टिपूर चांदणे पुनवेचे नभी चमके कोजागिरीरात्री
केशरयुक्त दुधाच्या चरव्या गच्चीगच्चीवर होत्या
निरखित शशीबिंबाला परी चांदणेच प्राशीत होत्या
खेळ मनोहर खेळती नाना तसेच गप्पाष्टक रंगले
कुठे नेत्र नेत्रांना भिडले, हसरे यौवन गाली फुले
पृथ्वीवरी या काय चालले पाहू म्हणती शिवपार्वती
भ्रमण यानातून करतांना पृच्छा एकच ते करिती
‘को जागर्ति’, ‘को जागर्ति ‘एकच स्वर येता कानी
तडफदार तो बालशिवाजी वदला ‘अहं जागर्मि ‘
जागृत राहून कार्य तयाने ‘छत्रपतींचे’ हो केले
यमसदनी यवनांस लोटूनि स्वराज्य संस्थापित केले
अर्थपूर्ण कोजागिरी सजली इतिहासाच्या पानात
हाच प्रश्र्न परी प्रत्येकाने कां न पुसावा आपणांस ?
लांचलुचपत, चोरी, दरोडा, बलात्कार नि खून किती
अमुच्या उघड्या डोळ्यांनाही अनाचार हे ना दिसती
मुर्दाड, कोरड्या मनांत नाही माणुसकीचा गहिवर
तिथे नांदतो फक्त उसासा, भीती, जरब ती भयंकर
आतषबाजी, झगमगाट तो वैभव ओसंडून वाहे
पुनवेच्या त्या बिंबालाही डाग काजळीचा आहे
‘कोजागर्ति’ अर्थ जाणूनि साजिरी करा कोजागिरी
बेबंदशाहीला वेसण घालुनी धवल चांदणे शुभ्र करी
— रचना : स्वाती दामले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अतिशय सुंदर आहे कोजागिरी काव्य खरोखरचा जागृतीचा जो उपदेश केलेला आहे तो अतिशय वास्तव आणि यथार्थ
सुंदर सुंदर