कोजागिरी जवळ आली की वेध लागतात मनमोकळ्या गप्पांचे, गाण्याच्यी मैफीलींचे. शरद ऋतूची सुरवात, आकाशात दिसणारा पूर्ण चंद्र आणि सोबत भेळ, दूध, आणि दिलखुलास गप्पा. वा ! आणखी काय हवं ? ☺️
रोजच्या धावपळीत, कटकटीत मनाला दिलासा देणारा, केशरी दूधाप्रमाणेच मनालाही थंडावा देणारा असा दिवस. चंद्राची शीतल किरणे दूधात प्रतिबिंबित करून, ज्याला अमृत किरण असंही म्हटलं जातं हे दूध त्या दिवशी प्यायलं जातं. शिवाय लक्ष्मी माता पृथ्वीवर येऊन कोजागर्ती असंही म्हणत असते. मग या साऱ्यात जागरण करताना अडचण नको म्हणून घराच्या अंगणात किंवा गच्चीत जमून वेगवेगळे खेळ, गप्पा, गाणी म्हणत बसणे व रात्री १२ नंतर ते आटवलेले दूध पिणे हा प्रघात.
याच पौर्णिमेला अश्विनी पौर्णिमा म्हणत असल्याने ज्येष्ठ अपत्त्याला औक्षण ही करण्यात येतं एकंदरीतच काय तर सर्व वातावरण सकारात्मक, उत्साही करणाऱ्याच या प्रथा. औक्षणाचेही खूप फायदे सांगितले जातात. मी काही या विषयातील तज्ञ नाही पण एक मात्र नक्की कोणाही व्यक्तीचे औक्षण केल्यावर त्याचा चेहरा उजळलेला दिसतो, प्रसन्न दिसतो.
प्रत्येक प्रथेमागे खोलात काही न काही अर्थ दडलेला असतो जो प्रत्येकाने आपापल्या परिने लावायचा प्रयत्न करावा अस मला वाटतं. आता सर्वजण एकत्र येऊन छान खात पित (दूधच बर का !🤣) बसले असतील तर आपसूकच एक प्रकारचं सहज वातावरण तयार होतं.
मनातल्या चार गोष्टी एकमेकांबरोबर बोलल्या जातात.
सर्वांनाच हलकं व्हायला मदत होते. आपल्या मनातलं आपल्या जवळच्या लोकांशी बोलणं आणि सोशल मिडीआवर फक्त कोजागिरीचा चंद्र आणि आटीव दूधाचे पेले पाठवून शुभेच्छा देणं यात फार फरक आहे. काही गोष्टी या समोरासमोरच बोलणं उचीत ठरतं.
यानिमित्ताने एकमेकांच्या आयुष्यात खरच काय चाललय हे समजतं. एक प्रकारचा सुंदर बंध निर्माण होतो.
मग तो कुटुंबातील व्यक्तींशी असेल वा जवळच्या मित्रमैत्रिणींशी. माणूस समाजप्रिय असल्याने अशा जवळीकीची खूप गरज आहे. कुटुंबाच्या दृष्टीने पाहिले तर सारं कुटुंब एकत्र येणं हे देखील आजकालच्या व्यस्त जीवनात खूप खूप महत्वाच आहे. ती मजाच काही निराळी आहे. चांदण्यात न्हाऊन निघत, निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या माणसांच्या सोबतीनं साजरा केलेला कोणताही सण मनाला उभारी देऊन जाणारच, याने एकोपाही निश्चितच निर्माण होतो.
या गप्पाटप्पांबरोबरच, काव्यमैफल, सांगितीक मैफल, धार्मिक मैफल असेल तर लाजवाबच. अशा वेळेला मग अनेक छुपे कलाकार बाहेर येतात. मुख्य म्हणजे काय खेळीमेळीच्या वातावरणात प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी मिळते. जी आजकालच्या तणावपूर्ण जगण्यात खूप महत्वाची आहे.
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.म्हणजे खगोलदृष्ट्याही महत्वाचा दिवस. याशिवाय कोकणात ही पौर्णिमा नवान्न पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. म्हणजे धार्मिक, आरोग्य, कृषी, वैचारीक तसच कलेच्या दृष्टीनेही हा फार महत्वाचा दिवस आहे. निसर्गाप्रती वाटणारी कृतज्ञताच या नवान्न पौर्णिमेच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. निसर्गाची कृपा आणि समतोल किती महत्वाचा आहे हे नव्याने सांगायला नकोच !
कोजागर्तीचा एक अर्थ कोण सजग आहे, सावध आहे असाही होतो. म्हणजेच रोजच्या व्यस्त जीवनशैलीतुन मानवाने हा प्रश्न स्वत:ला विचारून सावध होणं अपेक्षित आहे. सावध होणं हे मानसिक, शारिरीक, शैक्षणिक वा अध्यात्मिक कोणत्याही पातळीवरच असू शकत. म्हणजेच एक प्रकारे माणसाने अंतर्मूख होऊन स्वत:ला शोधायचे आहे. वेगवेगळ्या पातळीवर सजग व्हायचे आहे.
सध्याच्या परिस्थितीत, कार्यालयीन कामकाजाच्या वेळा सांभाळून हे सर्व पाळणं जरी कठिण असल तरी सर्व दृष्टीने सकारात्मकता मिळवण्याची ही नैसर्गिक संधी आहे असं समजून याचा पूरेपूर फायदा घ्यायला हवा. जमवायचं म्हटलं तर सर्व जमवता येतं. मनात फक्त इच्छा हवी.
माणसाची सारी धडपड जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी असते. या प्रयत्नांना निसर्ग भरभरून बळ देत असतो. आपण फक्त थोडं थांबून त्या त्या गोष्टींचा आस्वाद घ्यायला शिकल पाहिजे. सृष्टीच्या या सोहळ्यात सहभागी होता आलं पाहीजे. चंद्र जसा शीतलता देतो तसं आपणही कोणाच्या जीवनात शीतलता निर्माण करू शकलो तर ? किती समाधान मिळेल नाही ? या दिवशीच्या चंद्रासारखं शुभ्र आपलं मनही झालं तर ? निर्मळ, सुंदर धवल विचार जोपासायची एक संधी म्हणूनही या कडे पहायला काय हरकत आहे ?
एकाच दिवसाशी किती गोष्टी निगडीत आहेत पहा ! विचार केलात तर आणखीही काही सुचतील. चला तर मग आपली आपली कोजागिरी आपल्या आप्तेष्टांसोबत मजेत साजरी करू या. सध्याच्या परिस्थितीत एकत्र येणं शक्य नसेल तर निदान ॲानलाईन तरी भेटूया ! पण मनातल बोलूया हो !

– लेखन : शिल्पा कुलकर्णी, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ +91 9869484800
कोजागिरीचे सर्व दृष्टिकोनातून सुंदर वर्णन केले आहे. शिल्पा, तुमची लेखनशैलीहि नेहमी मनाला भावते.
खुप छान माहिती मिळाली .