Sunday, July 6, 2025
Homeपर्यटनकोरोनानंतरची माझी अमेरिका वारी

कोरोनानंतरची माझी अमेरिका वारी

आम्ही विमानात बसलो आणि कोपऱ्यात दडलेली करोनाची भीती, सिंगापूर ते सॅनफ्रान्सिस्को हा १५ तासांचा भला मोठा प्रवास असूनही दूर झाली. सॅनफ्रान्सिस्कोला पोचलो. तिथला प्रशस्त विमानतळ सुंदर आणि अद्यावत दिसत होता. खाण्यापिण्याची चंगळ होती. या विमानतळावर आम्ही जवळजवळ ५ तास थांबलो होतो.

त्यानंतर युनायटेड क्लब चे डोमेस्टिक -स्थानिक विमान पकडून रिनोला जायला आम्ही सज्ज झालो. हा इतका मोठा प्रवास म्हणजे दोन संस्कृतीच्या मिलनाचा प्रवास होता. मंडळी, खरंच सांगते कधी अध्यात्मिक पुस्तक वाचत, तर कधी इंग्रजी सिनेमा बघत तर कधी चांगल्या प्रतीची शॅम्पेन चाखत पूर्ण प्रवास चुटकीसरशी संपला. थकवा काय तो जाणवलाच नाही.

लांबच्या प्रवासात समोरच्या घड्याळाचे काटे बघावेत. आपल्या देशात आता किती वाजले असतील याचा विचार करू नये. त्यामुळे जेट लॅग जाणवत नाही. मी वर्तमानाचा आनंद घेऊन लागले. मनातली कोरोनाची भीती पूर्णपणे काढून टाकली.

विमानतळावर उतरल्यावर सगळ्या फॉर्मॅलिटी बिनभोबाट पार पडल्या. मास्क लावणे सक्तीचे नव्हते. रिनो विमानतळावर आमची मुलगी तिची नवीन टेस्ला गाडी घेऊन आली होती. नेवाडा स्टेट, नेवाडा हे नाव ऐकल्यावर मला या नावाविषयी कुतूहल वाटले होते. गुगल केल्यावर कळले की नेवाडा या शब्दाचा अर्थ स्पॅनिश मध्ये=siera नेवाडा म्हणजे बर्फाच्छादित पर्वत असा होतो.

या राज्याच्या सभोवताली ओरेगॉन, कॅलिफोर्निया, ऍरिझोना आणि युटा ही राज्यं आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे सातव्या क्रमांकावर असलेले राज्य आहे. अमेरिकेत एकूण ५२ राज्ये आहेत. त्यातील नेवाडा राज्य हे वाळवंट आहे. आपल्या डोळ्यासमोर वाळवंट म्हटले की दूरवर पसरलेली वाळू येते. पण अमेरिकेतील हे वाळवंट बर्फाचे डोंगर, हिरवळ, तुरळक वनराई आणि सौन्दर्याने नटलेली भूमी यांनी बनले आहे.

नेवाडा राज्यात १८५९ मध्ये चांदीचा शोध लागला होता त्यामुळे नेवाडयाला सिल्वर स्टेट (चांदीचे राज्य) म्हटले जायचे. गम्मत म्हणजे इथे केवळ चांदीच नाही तर सोन्याच्या खाणी सुद्धा आहेत. जगातील सोने निर्माण करणाऱ्या राज्यात नेवाडा राज्याचा चौथा नंबर लागतो. अमेरिकेतील ७५ टक्के सोने एकट्या नेवाडा राज्यात मिळते.

रिनो- नेवाडा – कॅलिफोर्नियाच्या सीमेवर असलेले रिनो हे शहर ‘बिगेस्ट लिटल सिटी इन द वर्ल्ड’ मानले जाते. या शहरात सर्व सोयींनी युक्त विमानतळ असून अमेरिकेतील अनेक राज्यातून येणारी लहान लहान विमाने या विमानतळावर उतरतात.

फेब्रुवारीत आम्ही आलो तेव्हा इथले तापमान ८ डिग्री सेल्सिअस होते. पूर्ण महिनाभरात -३ ते १२ डिग्री दरम्यान तापमान असणार होते. सिंगापूरला किंवा भारतात मुंबईला राहिल्यामुळे माझ्यासाठी २० डिग्री पण डोक्यावरून पाणी गेल्यासारखे होते. त्यामुळे थंडीपासून रक्षण करण्यासाठी आम्ही बरेच गरम कपडे (थर्मल क्लोदज) घेऊन आलो होतो. अर्ध्यापेक्षा जास्त सामान गरम कपड्यांचेच होते.

रिनो शहर गॅम्बलिंग साठी म्हणजे कॅसिनो साठी प्रसिद्ध आहे. लास वेगास खालोखाल रिनो हे जुगाऱ्यांचा अड्डा आहे. अर्थात हे जुगारी अतिशय श्रीमंत असतात. या कॅसिनो मध्ये पैशाची उलाढाल मोठ्या प्रमाणात चालते. महामारी, आजार, मृत्यू या सर्वांचा इथे दुरूनही संबंध नसावा असे दिसते. लास वेगास च्या चकचकाटापुढे रिनोचे नाव थोडे फिके पडते.

प्रसिद्ध कंपनी टेस्ला ची गिगा फॅक्टरी रिनो मध्ये आहे. इथे जड सामान उचलण्यासारखी अनेक कामे रोबोटस करतात. हे माझ्या मुलीने जेव्हा सांगितले तेव्हा नवल वाटले. या रोबोटसना ज्या सूचना दिलेल्या असतात तेव्हढ्या ते तंतोतंत पाळतात. उदा. त्यांना एका ठराविक मार्गावर चालायचे ठरवून दिलेले असते. चुकून या मार्गावर दुसरा रोबोट आला तर ऍक्सीडेन्ट होऊ नये म्हणून दोघेही आपापल्या जागी ठप्प होतात, थांबतात. बघा हे निर्जीव (?) यंत्रमानव कसे शिस्तीत वागतात, काम करतात. माणूस दुसऱ्याला हे सहज शिकवतो पण स्वतःवर ही वेळ आली की मात्र नियम झुगारून देतो.

कोरोनाच्या कडक कायद्यामुळे आम्ही फॅक्टरीच्या आत जाऊ शकलो नाही. पण फॅक्टरीचा प्रचंड मोठा परिसर बाहेरून पाहायला मिळाला. टेस्ला ची ही फॅक्टरी रिनोच्या एका टोकाला आहे. जाताना मार्गात वाळवंट आहे. दोन्ही बाजूला उघडे बोडके तपकिरी रंगाचे रखरखीत डोंगर दिसतात. त्यावर खुरट्या झाडांची वाढ नक्षी काढल्यासारखी दिसते. दूरवर चक्क बर्फाची शाल ओढलेले निळसर पर्वत दिसतात.

निसर्गाच्या या अजब चमत्काराला मी दिग्मूढ होऊन पाहत राहिले. एका बाजूला वाळवंट तर दुसरीकडे बर्फाळ डोंगर. अमेरिकेत अशा परस्पर विरोधी गोष्टी अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. गिगा फॅक्टरीबाहेर प्रचंड मोठ्या आकाराची गोदामे आहेत. त्यांची बांधणी, व्यवस्था उत्कृष्ट आहे. वस्तूंची, अन्नाची उत्तम तर्हेने साठवणूक करून त्याचे व्यवस्थित वितरण करणे ही महत्वाची गोष्ट राज्याची आर्थिक स्थिती सुधरवते.

रिनोला आल्यावर गोठवणारी थंडी काय असते याचा अनुभव आला. पण प्रतिकूल परिस्थितीतही माणूस किती आरामात राहू शकतो हे सुद्धा शिकायला मिळाले. इथे दिवसभरात तापमान सतत बदलत असते. रात्री उणे २, ३ होते. दिवसाही तापमान अचानक वाढते, कमी होते. हवा कोरडी असते. तर कधी वाऱ्याचा जोर वाढतो. वारा अंगाला झोंबतो. रस्त्यावर चालणे कठीण होते. म्हणूनच अमेरिकन माणसे रस्त्यावर कमी चालताना दिसतात.

परंतु त्यांच्या उन्हाळ्यात लोक आनंदाने नाचतात, फिरतात, बीचवर गर्दी करतात. पर्वतारोहण करतात. पण उन्हाळा जास्तीत जास्त ५-६ महिन्याचा असतो. बाकीच्या वेळी थंडी असते. अर्थात या थंडीचे प्रमाण प्रत्येक राज्यात बदलते. त्यामुळे कमी जास्ती थंडी वाजणे ही वस्तुतः प्रत्येकाच्या सवयीवर अवलंबून आहे.

मुंबईत आपल्याला रोज सकाळी सूर्य महाराज न कंटाळता दर्शन देतात. थंडी ठरलेल्या वेळी पडते, उन्हाळा व्हिटॅमिन डी देऊन जातो आणि नेमेचि येतो पावसाळा म्हणी प्रमाणे पावसाळा ठरलेल्या महिन्यात येऊन जातो. हल्ली मात्र त्यांच्याही वागण्यावर पाश्चिमात्य ऊन पावसाचा वारा लागलेला दिसतो.

लेक टाहो
आम्ही रिनोला पोचलो आणि यावेळी मुलीला भेटल्यावर काय वाटले ते शब्दात सांगण्यासारखे नाही. सध्या सुरक्षित आणि हेल्दी असणे जास्त महत्वाचे वाटते. मुलीने हौशीने आणि प्रेमाने फिरण्याचा प्लॅन बनवला होता. तिच्या यादीत, सगळ्यात वरती लेक टाहो होते. त्यामुळे एका शनिवारी लेक टाहोला जायचा प्लॅन केला आणि पूर्ण प्रवासात जे निसर्ग सौन्दर्य पाहायला मिळाले ते कधीच विसरता येणार नाही.

लेक टाहो हा नेवाडा आणि कॅलिफोर्निया या राज्यांच्या मध्ये असलेला प्रसिद्ध तलाव आहे. इथल्या थंडीत आणि उन्हाळ्यात खेळले जाणारे खेळ लोकांना आकर्षित करतात. गाडीत हिटर होता तोपर्यंत ठीक होते पण उतरल्यावर, थंडी चारी बाजूने आम्हाला बिलगायला बघत होती. आकाशात संध्याकाळची केशरी, गुलाबी किरणे पसरायला लागली होती. वातावरणात एक प्रकारचा फ्रेशनेस होता.

क्षणोक्षणी नवनिर्मितीची चाहूल आकाशातील प्रत्येक रंग देत होता. कानडिअन बदके एका रांगेत आवाज करीत उडत चालली होती. आकाशात क्षणोक्षणी होणारी नवीन रंगांची उधळण मला खिळवून ठेवत होती. या दृश्याकडे अनिमिष नेत्रांनी बघता बघता मला जगाला विसरल्यासारखे झाले.

इतक्यात डोळ्यांना स्वच्छ पांढऱ्या रंगाचा आणि करड्या रंगाची किनार असलेला लेक टाहो दिसायला लागला. शांत, तृप्त असलेल्या तपस्वी सारखा तो मला भासला. नुकतीच त्याची समाधी लागली असावी. आजूबाजूला काठावर विखुरलेले शुभ्र बर्फ जणू त्याच्या जटा होत्या. त्याच्या पाण्यात बदके खेळत होती. ते जणू त्याचे बाल्य शिष्य वाटले. अनेक प्रवासी, तरुण तरुणी आपल्याच नादात या तपस्व्याच्या सान्निध्याची अनुभूती घेत होती.

संपूर्ण वातावरण मनात साठवून घेत मी जवळच्या भव्य ‘रिवा ग्रिल’ या रेस्टोरंन्टकडे पावले वळवली. कारण थंडी वाढू लागली होती. स्वादिष्ट जेवणाचा वास पोटातील भूक चाळवत होता. हे रेस्टोरंट भव्य आहे. देखणे आहे. आणि जेवणाची व्यवस्था तर अप्रतिम आहे. ताजे, चवदार मासे हे इथले वैशिट्य आहे. पण आपल्यासारखे कालवण, फिश करी किंवा त्याबरोबर भाकरी,वाफाळता भात अशी कल्पना इथे करायची नसते. इथे ताज्या फडफडीत माशांचे मेक्सिकन, आशियाई जिवांचे प्रकार अमेरिकन पद्धतीत खायला मिळतात.

रिवा ग्रिलची अंतर्गत मांडणी सोयीची आणि आकर्षित करणारी आहे. आमचे टेबल आम्ही आधीच आरक्षित केले होते. कारण आयत्या वेळेस जागा मिळत नाही. आत पाऊल ठेवल्यावर उबदार वाटले. पूर्ण हॉल माणसांनी भरला होता. गप्पा गोष्टींना ऊत आला होता. अमेरिकन माणसे धिप्पाड आणि खादाड. मोठ्याने हसण्याचे आवाज घुमत होते. मद्याचे ग्लास ओठाला लावीत स्त्री पुरुष हसत खिदळत होते.

तसेच टीव्ही च्या मोठ्या पडद्यावर फुटबॉल खेळ चालू होता. तो बघताना बसलेल्या लोकांच्याही अंगात फुटबॉल संचारत होता. हे दृश्य अमेरिकेत अनेक ठिकाणी दिसते. बाहेरच्या थंडीतून आत आल्यावर इथला उबदारपणा हवासा वाटत होता. आम्हाला भूक लागली होती, त्या वातावरणात ती अधिक चाळवली. वेटर देखणा पोरगेला होता. आमची फर्माईश टॅब्लेटवर घेऊन त्याने अगदी काही मिनिटात जेवणाचे पदार्थ आणले. इथल्या ताज्या, माशांच्या पदार्थांवर आम्ही आडवा हात मारला. कधी काट्याने, कधी चमच्याने तर कधी चक्क बोटांनी.

या वातावरणात काचेतून दिसणारे दूरवर पसरलेले पाणी आणि त्यावरील धुके मनावर वेगळीच धुंदी चढवत होते. लेक टाहोवरची ती संध्याकाळ मी कधीच विसरू शकणार नाही.

मोहना कारखानीस

– लेखन : मोहना कारखानीस. सिंगापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. वाह मोहनाताई कोरोना नंतरची तुझी अमेरीका वारी फार सुंदर वर्णन केले आहेस.

  2. वा!! मस्त.
    नेवाडाची सफर आनंददायी…

  3. वाह मोहनाताई…! सुंदर लेख आहे… तुम्ही मध्ये ‘लेक टाहो’ या शीर्षकाखाली जे लिहू लागलात, त्यात मला आधी वाटलं की तुम्हाला पाहिल्यावर तुमची लेक टाहो फोडू लागली, असं काहीसं तुम्ही लिहिणार आहात …!
    पण छानच वर्णन आहे…
    … प्रशांत थोरात,पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
    9921447007

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments