जगात सर्वांना जसा कोरोनाचा फटका बसला तसाच फटका भारतीय चित्रपट सृष्टीलाही बसला आहे. आपले विशेष प्रतिनिधी श्री शेषराव वानखेडे यांचा विशेष वृत्तांत…
भारतीय चित्रपट सृष्टीत हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली, मल्याळम, भोजपुरी, कन्नड आदी प्रादेशिक भाषातील सिनेसृष्टी समाविष्ट आहे.
दिड वर्षापासून चित्रपटांचे चित्रिकरण बंद असल्याने खूप मोठे नुकसान झाले असून कोरोनामुळे या क्षेत्रावर अवकळा आली आहे. परिणामी या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्यांची, त्यांच्या कुटुंबीयांची मोठीच अडचण झाली असून त्यांना अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे.
चित्रपट निर्मिती हा भारतातील मोठाच उद्योग आहे. तसेच जागतिक स्तरावर देखील हा व्यवसाय, उदयोग चालतो. भारतात या चित्रपटांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. दरवर्षी भारतात हिंदीसह अनेक प्रादेशिक भाषातील चित्रपटांची निर्मिती केली जाते. भारतात जवळपास १ हजार ते १५०० चित्रपट वर्षाला प्रदर्शित होतात. मात्र गेल्या दिड वर्षापासून हे सर्व ठप्प आहे. जवळपास १३ हजार ८०० कोटी रुपये इतका महसूल दरवर्षी या क्षेत्राकडून गोळा केला जातो. दरवर्षी त्यात अंदाजे ११.५ टक्क्यांची वाढ होत आहे. २०२० मध्ये २३ हजार ८०० कोटी रुपयांचा या क्षेत्राचा महसुल होता. यावरुन या क्षेत्राची व्याप्ती किती मोठी आहे, याची कल्पना येते.
मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून संबोधले जाते. तद्वतच मायानगरी म्हणूनही मुंबईचा उल्लेख केला जातो. एकदा माणूस मुंबईत आला की त्याला मुंबई सोडून जाण्याची इच्छा होत नाही. कामधंदा किंवा रोजगार सहज उपलब्ध होत असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण मुंबईत येतात आणि येथेच स्थिरावतात. तर तरुण- तरुणी करिअरच्या दृष्टीकोनातून मुंबईकडे पाहतात. इथे स्ट्रगल केला की काहीही साध्य होते, असे अनेकांना वाटते आणि ते खरेही आहे.
काहीजण मुंबईच्या मायानगरीत येऊन हिरो-हिरोईन बनण्याचे स्वप्न पाहतात. अनेकांच्या बाबतीत ते प्रत्यक्षात उतरले आहे. मुंबईच्या या मायानगरीत हिंदी चित्रपटांबरोबरच हिंदी मालिका, मराठी चित्रपट व मालिका तसेच अन्य भाषांमधील सिनेमांचे अथवा मालिकांचे सातत्याने चित्रिकरण सुरू असते. पण कोरोनाच्या महामारीमुळे सर्व काही थांबले आहे.
भारतातील हिंदी चित्रपट क्षेत्र म्हणजेच बॉलीवूड. एकटी हिंदी चित्रपटसृष्टी ४३ टक्के महसुल निर्माण करते. गुगलमधून जी काही आकडेवारी उपलब्ध झाली त्यात म्हटले आहे की, २०१५ मध्ये ५,९३४ कोटी रुपये इतका महसूल या क्षेत्राने निर्माण केला होता. तोच २०२० साली अंदाजे ६,६१७ कोटी रुपयांपर्यंत हा महसुल पोहचला. मल्याळम सिने क्षेत्राने २०१५ मध्ये जवळपास १४० चित्रपटांची निर्मिती केली होती. तर बाॅक्स ऑफिसला ५०० कोटींचा धंदा केला होता.
प्रादेशिक भाषांपैकी हिंदी भाषेनंतरचे भारतामध्ये तमिळ सिनेसृष्टीचे मोठे क्षेत्र आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या एकूण महसुलापैकी १९ टक्के वाटा तमिळ चित्रपटसृष्टीचा आहे. २०१५ मध्ये या क्षेत्राची वार्षिक उलाढाल अंदाजे २,६२२ कोटी रुपये होती तीच २०२० मध्ये अंदाजे २९२४ कोटी पर्यंत पोहोचली. कन्नड सिने क्षेत्राने २०१५ मध्ये ४०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल केली आहे. बंगाली चित्रपट क्षेत्राची २०१४ मध्ये वार्षिक उलाढाल १५० कोटी रुपये इतकी होती. मात्र बंगाली सिनेमांमधील कन्टेन्ट व हिंदी आणि इंग्रजी सिनेमाला प्रेक्षक वर्ग प्राधान्य देत असल्यामुळे या क्षेत्राची स्थिती तेवढी चांगली नाही. तेलगु चित्रपटसृष्टीने एकूण महसुलाच्या १७ टक्के वाटा उचलला आहे. प्रादेशिक चित्रपटसृष्टीपैकी देशातील तिसरा क्रमांक तेलगु चित्रपट क्षेत्राचा लागतो. मराठी चित्रपट सृष्टी आज २०० कोटींची झाली आहे. दरवर्षी जवळपास १२० सिनेमे मराठीतून प्रदर्शित होतात.
एकूणच भारतीय चित्रपटसृष्टी किती मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे याची कल्पना आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. मात्र कोविडच्या दिड वर्षाच्या कालावधीत भारतीय चित्रपट क्षेत्राचे कंबरडे मोडले असून ५००० कोटींचा किंवा त्यापेक्षा अधिक तोटा झाला असावा अशी शक्यता आहे.
मार्च २०२० च्या चवथ्या आठवड्यापासून सिनेमांचे चित्रिकरण बंद आहे. त्यामुळे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यापासून थांबले आहेत. संजय लिला भन्साळी यांचा ‘गंगुबाई’ आणि बोणी कपूर यांचा ‘मैदान’ या चित्रपटांचे सेट खाली उतरविण्यात आले आहेत. म्हणजेच ते उभे ठेऊ शकत नाही कारण तशी परिस्थिती नाही. चित्रपटगृहे उघडली पाहिजेत, प्रेक्षक सिनेमा बघण्यासाठी आले पाहिजेत पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती यामुळे या क्षेत्राची मोठीच हानी झाली आहे.
एप्रिल ते जून हा तीन महिन्यांचा पिक पिरियड असतो मात्र तो साफ झाला आहे. गुंजन सक्सेनाचा लक्ष्मी बाँब, सडक 2, सूर्यवंशी या व अशासारखे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहेत पण तसे वातावरण अद्यापही तयार झाले नाही. आणखी किती दिवस कोरोनात जातील आणि कधी वातावरण चांगले निर्माण होईल याचीच वाट अनेक निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, कलाकार व या क्षेत्रात काम करणारा प्रत्येकजण पाहत आहे.
चित्रपट सृष्टीच्या सद्यस्थितीबद्दल बोलताना जेष्ठ चित्रपट अभ्यासक, समीक्षक श्री दिलीप ठाकूर म्हणतात, “कोरोनामुळे चित्रपटसृष्टी पार कोलमडली असून या क्षेत्राची जी काही आर्थिक हानी झाली ती भरून निघण्यासाठी चार- पाच वर्षाचा कालावधी लागेल”.
चित्रपट क्षेत्र म्हणजे मनोरंजनाचा इतिहास आहे. यामध्ये चित्रपटांचे चित्रीकरण, माहितीपट, मालिका, इव्हेंट्स असे सर्व काही आले. हे सर्व कोरोनाच्या काळात डॅमेज झाले असून हे पूर्ववत होण्यास भरपूर वेळ लागणार आहे. मध्यम व लहान प्रेक्षकांच्या हातात पैसा नसल्यामुळे हा वर्ग चित्रपटगृहात कधी परतेल, हे सांगणे तसे कठीणच आहे. या क्षेत्राची नेमकी किती हानी झाली याबाबत मी काही सांगू शकत नाही. चित्रपटांची निर्मिती करणारे निर्माते, निर्मिती संस्था यांनाच या फायद्या-तोट्याचे गणित माहित असते.
चित्रपट सृष्टी पूर्ववत व्हावी याची आस सर्वांनाच लागली आहे, पण पुन्हा सुगीचे दिवस कधी येतील, हे आजतरी निश्चितपणे कुणी सांगू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

– लेखन : शेषराव वानखेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800