कोविड-१९ पश्चात, म्युकर किंवा काळ्या बुरशीचा आजार या गोष्टी एव्हाना तुमच्या कानावर किंवा वाचण्यात आल्याच असतीलच.
म्युकरमायकोसीस हा काही नवीन आजार नाही. मग आत्ताच याचा प्रादुर्भाव का वाढला? या पासुन बचाव करण्याचे काही उपाय आहेत का?
नियंत्रणात नसलेला डायबेटीस म्हणजे अगदी सुपीक जमीन. कुठल्याही जंतुचा, विषाणुचा किंवा बुरशीचा संसर्ग लगेच होऊ शकतो. कोविड-१९ चा संसर्ग हा मुळातच आपल्या साखरेवर परिणाम करणारा असु शकतो. त्यातच बऱ्याच वेळा कोविड रुग्णांना स्टिरॅाइड सारखी औषधे दिली जातात. यामुळे आपली रक्तातील साखर तर वाढतेच शिवाय प्रतिकार शक्तीवर सुद्धा परिणाम होतो. मग यातुनच म्युकर किंवा काळ्या बुरशीचा संसर्ग होतो.
अर्थात याचे प्रमाण देखील कमी असले तरी हा आजार प्राणघातक ठरु शकतो. कोविड-१९ च्या संसर्गात ज्यांची रक्तातील साखर जास्त आहे, ज्या रुग्णांना खुप जास्त मात्रामध्ये स्टिरॅाइडची औषधे दिली गेली आहेत, ज्यांना व्हेंटिलेटर ची गरज लागली होती, टोसिलिझुमाब सारखी औषधे लागली होती किंवा दीर्घकाळ जे रुग्ण ॲाक्सीजन वर होते , ज्यांना कोविड सोबतच कॅन्सर आहे अशा रुग्णांमध्ये म्युकरचा धोका अधिक असतो.
या आजारात नाकामध्ये चोंदल्यासारखे होणे, नाकातुन, दातातुन रक्त येणे किंवा काळा स्राव येणे, डोळ्याभोवती, तोंडावर सूज येणे, डोकेदुखी, अर्धांगवायु, फीट येणे या सारखी लक्षणे दिसु शकतात. वेळीच उपचार केले नाहीत तर मृत्यू देखील ओढवु शकतो. सीटी स्कॅन, एम आर आय आणि इन्डोस्कोपी द्वारे याचे निदान होते.
शस्रक्रिया करुन म्युकर काढुन टाकणे हाच सर्वोत्तम उपाय ! यासाठी ॲम्फोटेरेसिन किंवा पोसाकोनाझोल यासारखी औषधे पण वापरली जातात जी साधारणत: ३-४ महिने घ्यावी लागतात.
एकुणच काय तर केवळ कोविड-१९ मधुन बरे झालात म्हणजे सारे काही मिळवले असे नाही. म्युकर हा कोविड पश्चात आढळणारा एक संसर्ग आहे. याचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नसेल तर डायबेटीस अत्यंत प्रमाणात ठेवणे आवश्यक आहे. उपाशीपोटी १०० च्या आसपास, जेवणानंतर १५० च्या आसपास व एचबीए१सी ७% असणे आता काळाची गरज आहे.
नियमित आणि संतुलीत आहार, भरपूर व्यायाम आणि वेळोवेळी किंबहुना घरच्या घरी साखरेची वारंवार तपासणी ही त्रिसुत्री कामी नक्कीच येईल. गरज पडल्यास रुग्णाने अल्पावधीसाठी इन्सुलिनचा वापर करावा. तुमचे डॅाक्टर यामध्ये मार्गदर्शन करू शकतात.
आम्ही कोविडच्या रुग्णांना १४ महिन्यापासुन उपचार करत आहेत. म्युकर हा एक कोविड पश्चात होणारा आजार आत्ता दिसुन येत आहे. हीच वेळ आहे आपल्याला आत्मावलोकन करण्याची आणि आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची अन्यथा कोविड मधुन तर आपण बाहेर निघू, पण ईतर संसर्गांच्या विळख्यात सापडू.
म्हणून काळजी घ्या. कोविडच्या नियमांचे पालन करा आणि सावध राहा. उपचारापेक्षा अटकाव कधीही चांगलाच !
– लेखन : डॅा व्यंकटेश शिवणे.
मधुमेह व रक्तदाब तज्ञ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800