प्रख्यात बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी आपल्याला अंतर्मुख करण्यासाठी लिहिलेला एक छान लेख पुढे देत आहे. डॉ चांदोरकर इंडियन मेडिकल असोसिएशन, अलिबाग, रायगड बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष असून रोटरी क्लब, अलिबागचे विद्यमान अध्यक्ष आहेत. कोरोना, तिसरी लाट म्हणजे काय, मुलांमधील कोव्हीड, रोग प्रतिबंधन, लसीकरण, समज-गैरसमज या अनेक विषयांवर त्यांनी क्लिष्ट शास्त्रीय माहिती सोपी करून सांगितली आहे.
कोव्हीड 19 सध्या घराघरात पोचलाय. कोरोनाची पहिली लाट आपण अनुभवली, आता दुसरी अनुभवत असतानाच तिसऱ्या लाटेचे सूतोवाच सुरु झाले आहेत. हवा…. तिसऱ्या लाटेची केव्हाचीच चालु झालीये.
कोरोनाच्या विविध चाचण्यांविषयी, उपचार व लसीविषयी जनजागृती झपाट्याने होताना दिसत आहे. कोरोना, कोव्हीड 19 विषयी सध्या तरी काही विशेष आणि वेगळं सांगण्यासारखं नसलं तरिही कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या व येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटांचा आढावा घेण्याचा मोह मात्र आवरता येत नाहीये.
मागील वर्षी, मार्च महिन्यात कोरोना पँडेमिक चालु झाली. कोरोनाची पहिली लाट सुरु झाली होती. संपूर्ण जगाला हादरवून सोडणारि मनुष्यजातीची साडेसाती चालु झाली होती. चीन च्या बाहेर कोरोनानं आपलं साम्राज्य वाढवायला चालु केलं होतं. युरोप, अमेरिकेकडुन थेट भारताकडे त्याचा मोर्चा वळला होता व पाहता पाहता त्याने संपूर्ण जग व्यापून टाकलं होतं. जगभर कोरोना बाधितांचे आकडे वाढत होते. इटली, अमेरिकेत तर कोरोनाचं तांडव व मृत्यूचं थैमान चालु होतं. कोरोनाच्या या पहिल्या लाटेचं वैशिष्ट्य असं होतं कि बाधितांमध्ये ज्या व्यक्तींना मुळात काही व्याधी होत्या, त्यांचा नंबर अधिक होता. क्लासिक(नोव्हेल) कोरोना व्हायरसने मोठया माणसांना संसर्ग अधिक प्रमाणात होतो असे दिसून आले होते. संसर्गीत होण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये खुप कमी होते. याची बरीच कारणे पुढे येत होती.
लहान मुलांच्या श्वसनमार्गातील एसीइ रेसेप्टर्स ची अपरिपक्वता…ज्याद्वारे कोरोना विषाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतो, अधिक चांगल्या प्रमाणात असलेली सेल मेडियेटेड इम्म्युनिटी, लहान मुलांना वारंवार होणारे वेगवेगळे विषाणूजन्य आजार व त्यांना दिल्या जाणाऱ्या विविध लसी व त्यामुळे थोडयाफार प्रमाणात येणारे कोरोना विरोधी क्रॉस प्रोटेक्शन... इत्यादी कारणे पुढे आली. नाही म्हंटलं तरी या आधारे आम्हीही प्रात्यक्षिकरित्या कोरोनाचे खुपच कमी रुग्ण पहिले होते हि वस्तुस्थितीहि नाकारता येणार नाही.
आपल्या देशात कोरोनाची दुसरी लाट साधारणतः या फेब्रुवारी महिन्यात सुरु झाली. परंतु एव्हाना त्याने आपलं रूप बदललं होतं. कोरोना विषाणूमध्ये काही जनुकीय बदल होऊन जो मायक्रोस्कोपिक मॉन्स्टर पुढे येत होता तो “म्यूटन्ट स्ट्रेन” होता. अर्थात त्याचे हे ‘सिंगल म्यूटेशन’ आहे असं म्हंटलं जात होतं. लहान मुलांच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास या दुसऱ्या लाटेत त्यांच्यामध्ये बाधितांचे प्रमाण वाढताना दिसत होते. आजाराची लक्षणेहि किंचितशी वेगळी होती. ताप हे सर्वसामान्य लक्षण असले तरी सर्दी, खोकल्या बरोबर जुलाब, उलटी, पोटदुखी व अशक्तपणा इत्यादी लक्षणं समोर येत होती. विशेष म्हणजे “एम.आय. एस.सी”…. “MIS-C” नामक म्हणजेच “मल्टी सिस्टीम इम्म्युन सिंड्रोम इन चिल्ड्रेन” किंवा “MIS-N” म्हणजेच “मल्टी सिस्टीम इम्म्युन सिंड्रोम इन न्यूबॉर्न” हा एक विचित्र आजार तीन चार आठवड्यापूर्वी लागण झालेल्या मुलांना दिसून येत होता व या विचित्र आजारासाठी मात्र अतिदक्षता विभागातच उपचार घ्यावे लागत होते/लागत आहेत.
बरं… बऱ्याच मुलांमध्ये लक्षणं एवढी सौम्य असतात कि काही दिवसांपूर्वी लागण झालेली होती कि नाही हेही आईवडिलांना/नातेवाईकांना सांगता येत नाही आणि अचानक एका सिरिअस आजारास या चिमुकल्यांना सामोरं जावं लागतंय हि या पँडेमिक मधील एक शोकांतिकाच म्हणावी लागेल कारण या विचित्र सिंड्रोम मध्ये मुलं वाचण्याची शक्यता कमी असते.
अर्थात कोरोनाच्या पहिल्या लाटेत हा आजार आढळून आला नव्हता असे नव्हे पण तेव्हा मात्र त्याचे प्रमाण नक्कीच कमी होते.
बरं रेमडेसिव्हिर, टॉसीलुझुम्याब, प्लाझमा थेरपी इत्यादी उपचार पद्धती ज्या मोठ्या व्यक्तींमध्ये सर्रासप्रमाणे वापरात होत्या त्या ‘एव्हीडन्स बेस्ड स्टडीज’ कमी असल्याने लहान मुलांमध्ये वापरण्यात अडचणी येत आहेत. प्लाझमा थेरपी एव्हाना आऊटडेट होतीये. रेमडेसिव्हिर देखिल बारा वर्षांवरिल मुलांमध्ये वापरायचं असं असतानाच त्याच्या वापरावरहि सावट यायला लागलं. लहान मुलांची कोव्हीड 19 विरोधी उपचार पद्धती म्हणजे एक गहन गूढ होत चाललंय एवढं मात्र नक्की !!
…..आणि आता वेळ आली आहे ती येऊ घातलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची !!….. जाणकरांचं म्हणणं असं आहे कि या तिसऱ्या लाटेत लहान मुलं भरडली जातील….. बाधितांमध्ये बाजी मारतील. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलं संसर्गीत होण्याचं प्रमाण 2 – 3 % होतं, दुसऱ्या लाटेत ते वाढून 3 – 6 % झालंय व येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेत ते 10 – 12 % असेल असा अंदाज तज्ज्ञांकडुन वर्तवला जातोय. आता यास तितकासा शास्त्रीय पुरावा नसला तरी दुसऱ्या लाटेमध्ये काही सिंगल जनुकीय बदलांमुळे विषाणूनं आपलं रंग, रूप बदलल्यामुळे लहान मुलांच्या प्रतिकारची वर लेखात नमुद केलेली कारणं दुसऱ्या लाटेत कमी प्रभावी ठरताहेत असे दिसून येत आहे व कोरोना विषाणूमध्ये जर डबल जनुकीय बदल झाले तर हि चिमुकली मंडळी खरा ट्रबल फेस करतील व त्यांच्या प्रतिकारची सर्वच शस्त्रास्त्रे कुचकामी ठरतील याची शक्यताही नाकारता येत नाही….. परंतु तशी परिस्थिती लहान-मोठया सर्वांवरच येईल असे वाटते. पण मग तसे झालेच तर आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण पेलण्यास आपण समर्थ आहोत का ?….. याचा मागोवा घेणं तितकंच महत्वाचं, कुतूहलाचं व रहस्यमय ठरेल.
कोरोनाची दुसरी लाट येईल…. दुसरी लाट येईल, अशा वावड्या जेव्हा उठल्या तेव्हा आपण गाफिल राहिलो होतो व जेव्हा खरंच हि दुसरी लाट आली त्यावेळी मात्र आपल्या तोंडाशी फेस येतोय/आलाय. रेमडेसिव्हिर, टॉसीलुझुमॅब व ऑक्सिजनचा तुटवडा हा विषय चर्चेचा आणि तितकाच गंभीर्याचा बनुन गेला. लाईफ सेव्हिंग गॅस च्या तुटवड्यामुळे कित्येकांनी आपलं लाईफ गमावलं !!…. गाफिल राहील्याचीच हि सजा, दुसरं काय ?…..
म्हणतात पुढच्यास ठेच मागचा शहाणा !!…. आणि हि ठेच लागल्यानंतर मात्र आम्ही आता ‘ताकही फुंकून पिणार आहोत’. प्रशासनाने तिसऱ्या लाटेचं फारच मनावर घेतलंय…. कदाचित त्याहीपेक्षा जास्त मनावर घेतलंय ते बालरोगतज्ञ डॉक्टरांच्या संघटनेनं व सर्व बालरोगतज्ञांनीहि !!....
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी एक महत्वाचं पाऊल उचललं आणि ते म्हणजे या तिसऱ्या लाटेचं गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या राज्याचा एक “पेडियाट्रिक टास्क फोर्स” तयार केला. राज्यातील काही नावाजलेल्या व दिग्गज बालरोगतज्ज्ञांचा त्यात समावेश केला व पेडियाट्रिक कोव्हीडशी दोन हात कसे करायचे याचा एक आराखडा तयार केला. त्यांच्यासामवेत राज्यातील सर्व बालरोगतज्ञानी वैयक्तिक संवाद साधला. हे येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेतील व कोव्हीड पँडेमिकमधील लहान मुलांच्या कोव्हीड 19 समस्यांबाबतीत एक ऐतिहासिक पाऊल ठरले.
त्यानंतर त्याच धर्तीवर आय. ए. पी महाराष्ट्र व नंतर आय. ए. पी रायगड व जिल्हा पातळीवर लहान मुलांमधील कोव्हिड 19 आजाराचा सामना कसा करायचा यावर सरकारी गाईड लाईन्सचा बराच काथ्याकुट झाला. जिल्हा रुग्णालयात, तालुका स्तरावर छोटे छोटे का होईना पेडियाट्रिक कोव्हिड हेल्थ सेंटर्स उभे करण्याची संकल्पना पुढे आली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर्स इत्यादिंसाठी ट्रेनिंग चालु झाले आणि यात जिल्हा प्रशासनाने प्रशंसनीय भूमिका घेतली व निभावली.
आता मात्र पब्लिक व प्रायव्हेट दोन्ही सेक्टर्स लहान मुलांमधील कोव्हीडशी दोन हात करण्यासाठी सुसज्ज झाले होते. येथे मात्र शिवाजी महाराजांच्या काळातला ‘गनिमी कावा’ आठवला नसता तरच नवल !!
आता उपचारासाठी मुख्य आधारस्तंभ व पार्श्वभूमी तयार दिसतेय पण त्याचबरोबर इतरही काही गोष्टी तितक्याच महत्वाच्या व नमुद करण्यासारख्या आहेत आणि त्या म्हणजे लहान मुलांचा आहार, लसीकरण व कोव्हीड 19 रुग्णच्या संपर्कात आल्यानंतर लहान मुलांना कोव्हीड होऊ नये म्हणुन घ्यावयाची औषधे…..….हि सुद्धा एक प्रकारची कोव्हीड विरोधी ढाल व कोव्हीड विरोधी कवच कुंडलेच असतील नाही का ?…..
अर्थात विषाणू मुळे होणारे आजार हे सेल्फ लिमिटिंग असतात. म्हणजेच विशिष्ट कालावधीनंतर बऱ्याच रुग्णांचा संसर्ग कमी होतो व रुग्ण आपोआप बरे होतात. परंतु रुग्ण बरा होणं किंवा त्याचा आजार वाढणं, तो क्रिटिकल होणं हे मात्र त्याच्या प्रतिकारशक्तीशी निगडित/अवलंबून असतं. कोरोनाचंहि तसंच आहे. ज्यांची इम्म्युनिटी चांगली त्यांचा कोरोना विरुद्ध प्रतिकार चांगला. आपल्या शरीरात “सेल मेडीयटेड इम्म्युनिटी” व “ह्युमॉरल (अँटीबोडीज) संलग्न इम्म्युनिटी” असे दोन प्रकार असतात. आपली इम्म्युनिटी हि व्हिटॅमिन्स… म्हणजेच जीवनसत्वे (बी कॉम्प्लेक्स, ए, सी, डि व इ इत्यादी) तसेच मिनरल्स… म्हणजेच क्षार व खनिजे (झिंक, कॉपर, सेलिनिअम इत्यादी) वर अवलंबून असते. काही औषधांमध्ये हे व्हिटॅमिन्स व मिनरल्स असतात. परंतु जे पदार्थ आपल्या रोजच्या आहारातून/अन्नातून मिळु शकतात ते औषधांच्या स्वरूपात घेण्यात काय अर्थ ?…. म्हणूनच कोव्हीडला प्रतिकार करण्यासाठी आहाराला अनन्य साधारण महत्व आहे. हिरव्या पालेभाज्या, फळं व सुका मेवा यांत हे सर्व मुबलक प्रमाणात असतं व त्यामुळे समतोल आहारात त्यांचा जरूर समावेश असावा.
स्तनपान करणाऱ्या मातेने बाळाला सहा महिन्यांपर्यंत फक्त आणि फक्त अंगावरील दूध द्यावे. कोव्हीड झालेल्या मातेने स्वछतेची काळजी घेऊन, मास्क लावून आपल्या बाळास स्तनपान करण्यास हरकत नाही. सहा महिन्यांनंतर पूरक आहारात प्रथीने, जीवनसत्वे व क्षार-खनिजयुक्त पदार्थांचा समावेश असावा. हिरव्या पालेभाज्यांचं सूप, गाजर/बिट सूप, डाळीवरचं/भातावरचं पाणी, चिकन सूप, फळांचा रस, अंड्यातील पिवळं बलक यातून या सर्व गोष्टी मिळतील. या सर्वांतून मिळणारे प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स व मिनरल्स हे सहा महिने ते दोन वर्षापर्यंतच्या मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यास नक्कीच पुरेसे ठरतील.
प्रथीने….प्रोटीन्स आपल्या शरीरात चायापचयाच्या क्रियांत बदल घडवून आणतात व पेशिंच्या हीलिंगला मदत करून रुग्णाची रिकव्हारी लवकर घडवून आणतात. काही स्पेशल फॅट्स उदा. ‘ओमेगा फॅटी ऍसिड्स’ इम्म्युन सेल्सचं कार्य वाढवतात. ‘व्हिटॅमिन डी’… शरीरातील इजाकरक सायटोकाइन्स कमी करतात, आतड्यातील फायदेमंद गट फ्लोरा वाढवतात, विषाणू विरोधी काम करतात. ‘व्हिटॅमिन ए’… श्वसनमार्गातील व आतड्यातील पेशी हेल्दी ठेवण्याचं काम करतं, ‘व्हिटॅमिन इ’… अँटीऑक्सिडंट म्हणुन काम करतं, ‘व्हिटॅमिन सी’… पेशिंचं कार्य सांभाळतं तसेच शरीरात अँटीबॉडीज तयार करायला मदत करतं आणि ‘प्रोबायोटिक’… म्हणजेच शरीरातील स्पेशल फायदेमंद जिवाणू जे इम्म्युनिटी वाढवतात व ‘प्रीबायोटिक’… फायबरयुक्त पदार्थ जे आताडीतील प्रोबायोटिकचं प्रमाण वाढवतात. ‘व्हिटॅमिन B12’… सेल मेडियेटेड इम्म्युनिटी वाढवते, ‘व्हिटॅमिन B6’… सेल मेडियेटेड इम्म्युनिटी वाढवते व इजाकरक सायटोकाइन्स कमी करते.
आता वरील सर्व माहितीच्या आधारे दोन वर्षांवरील मुलांना जर समतोल आहार दिला तर त्यांच्यामध्ये कोरोना विरोधी प्रतिकारशक्ती नक्कीच निर्माण होईल….आणि हो, डोअरस्टेप, होम डिलिव्हरीतुन मिळणारं हॉटेल मधलं जेवण मुलांसाठी टाळलेलंच बरं !!. घरी स्वछतेची खबरदारी घेऊन तयार केलेलं ताजं अन्न, फ्रेश भाज्या व फळं मुलांना द्यावीत. त्यांना पाणीही मुबलक द्यावे. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील हानिकारक/टॉक्सिक पदार्थ वॉश आउट करता येतात. साधं पाणी, नारळ पाणी, लिंबू सरबत, ताक, फ्रेश ज्यूस याद्वारे मुबलक पाणी शरीरास गरजेचे असते.
प्रतिकारशक्ती हि लसीकरणाशीही संबंधित असते. मोठ्यांचं कोव्हीड विरोधी लसीकरण चालूच आहे, कासवाच्या गतीने का होईना ?…. परंतु लहान मुलांमध्ये एव्हीडन्स बेस्ड स्टडीज कमी असल्याने सध्या तरी ते तितकंसं शक्य दिसत नाहीये. तरी नागपूर, दिल्ली येथे बारा वर्षांवरील मुलांमध्ये प्रायोगिक स्तरावर अँटीकोव्हीड लसीकरण चालु झालंय हि एक जमेची बाजू म्हणावी लागेल.
आपले रूप, रंग बदलणाऱ्या या मायक्रोस्कोपीक मॉन्स्टर विरद्ध हे लसीकरण कितपत तग धरेल हेही सांगणं सध्या तरी कठीण आहे. पण म्हणतात ना, “समथिंग इज बेटर द्यान नथिंग”. येत्या एका वर्षभरात जरी 80-90 टक्के लसीकरण कव्हरेज झाले तरी काम भागु शकेल.
नियमित व्यायामाने देखिल इम्म्युनिटी बुस्ट होते. लहान मुलं…. व्यायाम ती काय करणार ??…. सध्या वॉकिंग, जॉगिंग व सायकलिंगचीही चोरी. पण मग अशा परिस्थितीत पाच वर्षांवरील मुलांकडुन आपण रस्सीउडी, पुल-अप्स, पुश-अप्स असे साधे व्यायामाचे प्रकार करुन घेऊ शकतो. तसेच फावल्या वेळात, म्हणजेच त्यांचा ऑनलाईन अभ्यास होण्यापूर्वी अथवा नंतर साधे साधे योग प्रकार/योगसाधनाही करण्यास त्यांना आपण उद्युक्त करु शकतो.
पँडेमिक मुळे लहान मुलांना अनेक मानसिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. चिडचिडेपणा, मोबाईल/टीव्हीचा अति वापर, अति झोप/कमी झोप, शाळेची/भविष्याची चिंता, निराशावाद इत्यादी इत्यादी….अशा मानसिकतेच्या सत्वपरीक्षेवेळी पालक व डॉक्टर्स यांनी मुलांना समजुन घेणं, त्यांचे समुपदेशन करणं गरजेचे बनुन गेले आहे. आई-वडिलांनी मुलांना वेळ देणे, त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणे, त्यांना अभ्यासाचा खुप ताण न देणे इत्यादी वर भर द्यावा तसेच डॉक्टरांनी सुद्धा मुलांची सध्याची मानसिकता समजुन घेऊन त्यांचे समुपदेशन करावे. त्यांना मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतंय का यावर सतत ध्यान द्यावा व मुख्यत्वेकरून त्यांच्यासाठी ऑनलाईन अथवा ऑफलाईन उपलब्ध रहावे.
डॉक्टर…. एक, दोन, तीन, चार…. दहा अशा कोरोनाच्या आणखीन किती लाटा येतील हो ? पौगांडावस्थेतील एका मुलाने मला विचारलेला लाख मोलाचा प्रश्न !!… खरं तर मन अगदी सुन्न आणि खिन्न करून टाकणारा !!…. याचं उत्तर समाजाच्या सामूहिक प्रतिकारशक्तीमध्ये दडलंय. जेव्हा समाजातील साधारणतः 60 – 80 % लोक एखाद्या जंतूसंसर्गाच्या आजाराने बाधित होतात तेव्हा हि सामूहिक प्रतिकारशक्ती येते व त्या जंतुसंसर्गाचा प्रसार हळूहळू थांबतो व पँडेमिक आपोआपच नियंत्रणात येते.
परंतु कोरोना व कोव्हीडच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा विषाणू क्षणा क्षणाला जनुकीय बदलाने (कधी अल्फा व्हायरस, कधी डेल्टा, कधी इंडियन स्ट्रेन, कधी साऊथ आफ्रिकन, कधी युके तर कधी ब्राझीलियन, कधी सिंगल म्यूटन्ट, तर कधी डबल म्यूटन्ट ) आपलं खरं रूप बदलतोय त्यामुळे सामूहिक प्रतिकारशक्ती येणार कुठून आणि लस तरी आपलं काम कसं करणार ? हा माझ्यासारख्या बालरोगतज्ञ व लसीकरणाशी निगडित असलेल्या डॉक्टरच्या मनात डोकावणारा हा गंभीर प्रश्न आहे !!……
सांगण्याचं तात्पर्य काय ?…..कि, ‘द मिस्ट्री डिसिज’… कोव्हीड19 आणि लबाड, लफंगा व लुच्च्या कोरोनाच्या आणखी किती लाटांना आपल्याला सामोरं जावं लागेल हा चर्चेचा नव्हे तर वादाचा विषय ठरेल व त्या वादात न पडता आपण आपली काळजी घेतलेली बरी, सुरक्षित राहिलेलं – लहानग्यांना सुरक्षित ठेवलेलं बरं…. SMS चा स्वीकार केलेला बरा(Social Distancing – सामाजिक/सुरक्षित अंतर, Masks – मास्क व Sanitization – सॅनिटायझेशन)……सरकारची कोव्हीड विरोधी नियमावली पाळलेली बरी, नाही का ??
– लेखन : डॉ राजेंद्र चांदोरकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
Important information for child, so thanks sir.
Thanks a lot,Madam.
Very very informative article… Too good.. Great job 👍