सिंगापूरस्थित, चतुरस्त्र, आंतरराष्ट्रीय लेखिका श्रीमती नीला बर्वे यांच्या ‘कोवळं ऊन’ या प्रथम कथा संग्रहाचे दिमाखदार प्रकाशन नुकतेच ज्ञानवृद्ध श्री एन. एन. श्रीखंडे यांच्याहस्ते संपन्न झाले.
समारंभाचे अध्यक्षपद व्यासंगी साहित्यिक श्री राजीव एन. श्रीखंडे यांनी भूषविले होते.

या सोहळ्यास प्रमुख अतिथी सर्वश्री जेष्ठ पत्रकार डॉ सुकृत खांडेकर, लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे, “कुटुंब रंगलय काव्यात” फेम प्रा विसुभाऊ बापट, कवयित्री सोनाली जगताप, न्यूज स्टोरी टुडेच्या प्रकाशिका सौ अलका भुजबळ, संपादक देवेंद्र भुजबळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्वलन करून सोहळ्याची मंगलमय सुरुवात करण्यात आली.
प्रकाशिका सौ अलका भुजबळ यांनी प्रास्ताविक करताना, नीलाताई यांच्याशी कशी ओळख झाली, त्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल साठी कशा लिहू लागल्या हे सांगून “कोवळं ऊन” या कथा संग्रहातील सर्व कथा आपल्याला आवडल्याने असे पुस्तक प्रकाशित करताना आनंद होत आहे, असे सांगितले.

आपले मनोगत व्यक्त करताना लेखिका नीला बर्वे यांनी कथा संग्रहामागील आपल्या ऊर्जादायी प्रेरणांचा उल्लेख केला. त्याचबरोबर कथा वाचकांना कोठेही ऐकता येतील, दृष्टिहीन व्यक्तीही पुस्तकाचा आनंद घेऊ शकतील म्हणून प्रत्येक कथेसोबत क्यूआर कोड दिल्याचे नमूद केले.
सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतात लेखिकेच्या लेखन वैशिष्ट्यांचा परामर्श घेतला.
श्री एन. एन. श्रीखंडे यांनी प्रत्येक कथेचे सुरेख रसग्रहण केले.
डॉ सुकृत खांडेकर यांनी या सर्व १६ कथांवर १६ चित्रपट होऊ शकतील, असे सांगितले.
श्री मुकुंद चितळे यांनी संस्था म्हणजे केवळ इमारत आणि कर्मचारी वर्ग नाही तर, समाजात बदल घडवून आणण्याचे ठिकाण असते असे सांगून पुस्तकाला शुभेच्छा दिल्या.
श्रीमती सोनाली जगताप यांनी नीला बर्वे यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य सांगताना, त्यांच्या लेखनात गोडवा असून शुद्ध लेखनाकडे त्यांचे विशेष लक्ष असते असे म्हटले.

अध्यक्षीय भाषणात श्री. राजीव श्रीखंडे यांनी, आपण प्रचंड वाचन करीत असल्याने या कथा संग्रहातील सर्वच कथा नीला बर्वे यांच्याच आहेत, अशी ग्वाही दिली. त्यांचा दुर्दम्य आशावाद, सहज सोपी ओघवती भाषाशैली आणि उठावदार व्यक्तिरेखा साकारण्याच्या वैशिष्ट्यांचाही त्यांनी खास उल्लेख केला.

श्रीमती स्वाती पोळ यांनी आपल्या मधुर आवाजात नेमकेपणाने सूत्रसंचालन करून कार्यक्रम बहारदार केला.

या श्रीमती सोनाली जगताप यांनी नीला बर्वे यांना शुभंकरोती परिवारातर्फे साहित्यरत्न हा पुरस्कार प्रदान केला. तर देवेंद्र भुजबळ यांनी त्यांचे लवकरच प्रकाशित होणार असलेले आणि नीला बर्वे यांचीही जीवनकथा त्यात समाविष्ट असलेले “माध्यमभूषण” हे पुस्तक त्यांना भेट दिले.

यावेळी लेखिका नीला बर्वे यांनी केवळ उपस्थित मान्यवरांनाच नाही तर, ज्यांनी ज्यांनी पुस्तक निर्मितीत आणि पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी सहाय्य केले, अशा सर्वांचा छानसे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

या कार्यक्रमासाठी अनेक व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे चार पद्मश्रींच्या पुस्तकासाठी शुभेच्छा लाभल्या. पद्मश्री प्रसाद सावकार यांचा ध्वनी संदेश रसिकांना ऐकविण्यात आला. तर पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर आणि पद्मश्री उदय देशपांडे यांचे शुभेच्छा संदेश वाचून दाखवण्यात आले. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा संदेश पुस्तकातच समाविष्ट करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर, आप्त, मित्रगण आणि रसिकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

— लेखन : जयश्री स. चौधरी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800